एमबीएमसीचे सर्व विभाग सज्ज – आयुक्त राधा विनोद शर्मा
मिरा-भाईंदर : आगामी गणेशोत्सव शांततेत, भक्तिभावाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या सर्व विभागांची तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने सुसज्जित व्यवस्था केली आहे.
कृत्रिम तलावांची पाहणी: शहरातील विविध विसर्जन स्थळांवर कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. आयुक्तांनी स्वतः पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत या तलावांची पाहणी केली. तलावांची खोली, पाणी, सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली.
पर्यावरण संरक्षण हा उद्देश: पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था: विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, लाईट, मंडप आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा भक्तीचा उत्सव आहे, तो स्वच्छता राखून आणि पर्यावरण जपून साजरा करूया, असे आवाहन आयुक्त शर्मा यांनी शेवटी केले.
