शाळकरी विद्यार्थ्यांनाही घाण पाण्यातून करावा लागतो प्रवास
– तीन नगरसेवक असूनही समस्यांकडे दुर्लक्ष,
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद अरुणोदय शाखेजवळील गायकवाडवाडी परिसरातील गटारे, पायवाटा आणि रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, हजारो रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या समस्या कायम असून, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार कामे करण्याची आश्वासने दिली जात असतानाही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. गायकवाडवाडी परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने परिसरात चिखल आणि घाण पाण्याचे साम्राज्य निर्माण होते. गटारे तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून, नागरिकांना याच घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरातून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गणेश विद्यालय आणि भोईर जिमखाना हायस्कूलमधील सुमारे हजारो विद्यार्थी दररोज ये-जा करतात. शाळकरी मुलांना तसेच त्यांच्या पालकांना खराब रस्ते आणि साचलेल्या घाण पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागते.
शाळांच्या छोट्या वाहनांनाही या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गायकवाडवाडी हा डोंबिवली शहरातील जुन्या वस्तीचा भाग असून, येथे जुन्या चाळींसोबतच नवीन गृहसंकुलेही उभी राहिली आहेत. त्यामुळे परिसरात पादचारी, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र अनेक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या रस्ते आणि पायवाटांची योग्य देखभाल न झाल्याने त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रभाग क्रमांक २१ मधील स्थानिक नगरसेवक रवीना म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे आणि रेखा म्हात्रे यांच्याकडे गायकवाडवाडीतील रहिवाशांनी रस्ते, गटारे, कचरा, डास प्रतिबंधक फवारणी, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच गायकवाडवाडी नामकरण कमानीसह विविध समस्यांबाबत अनेक वेळा तोंडी आणि लेखी निवेदने दिल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र या समस्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रभागातील इतर भागांमध्ये गटारे, पायवाटा, रस्ते, फवारणी तसेच कमानीची कामे वेगाने सुरू असताना महात्मा फुले रोडवरील गायकवाडवाडी परिसराकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः महिला रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. गायकवाडवाडी परिसरातील नागरिकांच्या या मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
000
