नवी मुंबईत 104 मोठ्या सोसायट्यांमध्ये

नवी मुंबई : शहरे पर्यावरणपूरक असावीत यादृष्टीने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे उद्दिष्ट ठेऊन महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. अभियानात नवी मुंबई महानगरपालिकेने सुरवातीपासूनच उत्साहाने सहभागी होत आपले राज्यातील मानांकन कायम उंचावत ठेवले आहे. सन 2023 मध्ये ‘क’ वर्ग महानगरपालिकांत नवी मुंबई प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून नावाजली गेली आहे.

ही परंपरा अधिक उंचावण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात आणखी उत्तम कामगिरी करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैविध्यपूर्ण पर्यावरणशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात असून पर्यावरणपूरक कार्यक्रमांत प्रत्यक्ष लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने विभागनिहाय मोठ्या सोसायट्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येत आहे.

यादृष्टीने 21 मे ते 27 मे 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवित मोठ्या सोसायट्यांमध्ये पर्यावरण जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. याकरिता प्रत्येक विभागातील 13 म्हणजे 104 मोठ्या सोसायट्या निवडण्यात आल्या. त्याठिकाणी जाऊन स्वच्छता, ऊर्जाबचत, वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिक प्रतिबंध, वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना, पर्यावरणपूरक वाहनांचा वापर, जलबचत, सांडपाणी प्रक्रिया अशा पर्यावरणाशी निगडीत विविध विषयांवर नागरिकांशी थेट संवाद साधून प्रबोधन करण्यात आले.

एकूण 104 मोठ्या सोसायट्यांमध्ये राबविण्यात आलेल्या या पर्यावरण विषयक कार्यशाळांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या विशेष सप्ताहात नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद बघता आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार अशा प्रकारचे पर्यावरण जनजागृती उपक्रम महानगरपालिकेमार्फत सातत्याने राबविण्यात येतील असे अतिरिक्त आयुक्त तथा पर्यावरण विभागाचे प्रमुख श्री. शिरीष आरदवाड यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *