ठाणे : श्रमिक जनता संघ युनियनची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रविवारी २ जून २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे पार पडली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची युनियनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महासचिव पदावर सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालीया, उपाध्यक्ष पदी डॉ संजय मंगला गोपाळ, खजिनदार म्हणून अविनाश नाईक, सह खजिनदार पदावर सुदर्शन साहू, सचिव पदावर सुनील कंद आणि संजय चौहान यांची पुढील काळासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
कार्यकारी समिती सदस्य म्हणून अर्चना पवार, अनिता कुमावत, गणेश चव्हाण, संतोष देशमुख, बापू ओव्हाळ, सूरज वाल्मिकी, गौतम सहानी, पुजा पंडित, रोशन गायकर सुखेंदु मडैया, दुर्गेश खवसे राजकुमार दुबे, रामसुशील विश्वकर्मा, संतोष गुप्ता, बैजनाथ यादव, कृपाशंकर मिश्रा , चंद्रकांत चौधरी, विरेंद्र सावंत, नवीन मिश्रा आदी आणि कार्यालयीन सचिव म्हणून अजय भोसले यांची निवड करण्यात आली.
कल्याण येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान मंगल कार्यालय येथे १ व २ जून रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा आणि राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी भूषविले. महासचिव जगदीश खैरालिया यांनी प्रास्ताविक केले तर डॉ संजय मंगला गोपाळ यांनी सूत्रसंचालन केले.
अधिवेशनात सरकारने चार लेबर कोड रद्द करून सर्व कामगार कायदे पुन्हा अंमलात आणावे, मैला सफाईचे काम यांत्रिक पद्धतीने करावे, मैन्युअल स्कैवेंजिंग प्रतिबंध कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, खाजगीकरण – कंत्राटीकरण पध्दत बंद करून कायम नोकरी द्यावी, समान कामाला समान वेतन अदा करा, कमीत कमी किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळालेच पाहिजे, वर्षानुवर्षे मछली विक्री व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करून अनुज्ञप्ती पत्र/ लायसन्स द्यावे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, गीग कामगारांसाठी कामगार कायदे लागू करा, ग्लोबल वार्मिंग आणि वाढत्या उष्णते पासून कष्टकरी श्रमिकांना सुरक्षा सुविधा पुरविल्या जाव्या, मध्यप्रदेश येथील सेंच्युरी, मराल आणि पीडीपीएल कारखान्यातील श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठींबा देत विविध ठराव ही मंजूर करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या २०१५ पासूनच्या किमान वेतनाचा फरकाची सुमारे सात कोटी रक्कम त्वरित अदा करा, ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक मनोरूग्णालय, मध्य रेल मधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर युनियनच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्धार अधिवेशनात समारोप सत्रात करण्यात आला.
शनिवारी १ जून रोजी कार्यशाळेत ज्येष्ठ अधिवक्ता रवींद्र नायर, सुधा भारद्वाज आणि एनएपीएमचे कार्यकर्ते श्री भार्गव यांनी युनियनचे प्रमुख कार्यकर्त्यांना विविध श्रमिक अधिनियम आणि श्रमिकांचे अधिकार या बाबतीत मार्गदर्शन केले होते. युनियनचे कार्यकारिणी सदस्य नविन मिश्रा यांनी प्रेरणादायी क्रांतीगीतं सादर करून सर्वांची मने जिंकली.
वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके, अन्नसुरक्षा अभियानचे कार्यकर्ते विशाल जाधव आणि भारत जोडो अभियानच्या वरिष्ठ कार्यकर्त्या गुड्डी एस. एल., आणि घर बचाओ घरं बनाओ आंदोलनच्या संयोजिका पूनम कनौजिया यांनी समारोप सत्रात श्रमिक जनता संघाच्या मागण्यांना पाठींबा जाहीर केला.
कल्याण युनिटचे प्रमुख आणि युनियनचे सचिव सुनील कंद यांच्या नेतृत्वाखाली शिबीर आणि अधिवेशन यशस्वी होण्यासाठी बापू ओव्हाळ, समीर दरेकर, शाम गायकवाड, हरेश ढमाले, सुनील दिवेकर, अजय भोसले, रुपेश जाधव, राधा किसन पांजगे, सुनिल भालेराव, दत्तात्रय जाधव आणि संदिप थूल आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले.
