ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटीच्या सेंट्रल मैदानाने गेल्या शंभर वर्षात ठाण्याच्या क्रिकेटची अनेक स्थितंतरे अनुभवली आहेत. मड, मॅट, आणि टर्फ अशा खेळपट्टयांवर क्रिकेटवेड्या ठाणेकरांनी आपले कौशल्य पणाला लावले. श्री आनंद भारती समाज संस्थेची स्थापना १९१० साली झाली. तर संस्थेची क्रिकेट शाखा १९१५ साली स्थापन झाली. स्पोर्टींग क्लब कमिटीच्या शताब्दी वर्षात आमच्या संस्थेच्या गौरव होत आहे त्याबद्दल आम्ही क्लबचे अध्यक्ष डॉ राजेश मढवी यांच्यासह स्पोर्टींग क्लब कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे आभारी आहोत असे भावपूर्ण मनोगत श्री आनंद भारती समाजाचे सचिव विवेक मोरेकर यांनी व्यक्त केले.
स्पोर्टींग क्लब कमिटीतर्फे सीकेपी सभागृहात शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा अनेक मान्यवर, क्लबचे सदस्य यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्याप्रसंगी सचिव विवेक मारेकरी बोलत होते. पुष्पगुच्छ, क्लबचे बोधचिन्ह असलेली टोपी, चांदीची मुद्रा यावेळी सर्वाना भेट देण्यात आली. यावेळी ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, माजी आमदार निरंजन डावखरे, क्लबचे जेष्ठ सदस्य दिलीप[ रणदिवे, मुकुंद सातघरे, क्लबचे माजी अध्यक्ष मुरलीधर मढवी, सुषमा मढवी, हेमांगी नाईक यांचे डॉ राजेश मढवी यांनी स्वागत केले. कार्यवाहक दिलीप धुमाळ, सहकार्यवाहक सुशील म्हापुसकर, अतुल फणसे, , किशोर रणदिवे, किशोर ओवळेकर, योगेश महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जेष्ठ सदस्य प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
