पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक

शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनंती निवडणूक आयोगाने स्वीकारली

मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाची वेळ तीन तासांनी वाढवली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विनंती केल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या 3 जून 2024 रोजीच्या आदेशानुसार, मतदानाचा कालावधी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदानाचा कालावधी होता. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 28 मे रोजी आम्ही आयोगाला पत्र लिहून मतदारांसाठी वेळ योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बहुतेक मतदार हे नोकरदार वर्गातील असून ते नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा मतदान करण्यास प्राधान्य देतात, असे आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते ऍड अनिल परब यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत मतदानासाठी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही. त्यामुळे मतदारांना त्यांचा लोकशाही हक्क बजावणे कठीण झाले आहे. त्यांना मतदानाच्या त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवले जाईल. त्यामुळे निवडणुकीत मतदान कमी होऊ शकते. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवणे गरजेचे आहे असे आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचे परब पुढे म्हणाले.

8 मे रोजी निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *