ठाणे : आर्थिक दृष्ट्या वंचित पण कलागुणांनी समृद्ध अशा युवांचा कलाविष्कार अर्थात युवा नाट्यजल्लोष या वर्षी येत्या गुरुवारी १३ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर मधे संध्याकाळी ४ वाजता रंगणार आहे. ११ जून या साने गुरुजींच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने साने गुरुजी १२५ या अभियानांतर्गत हा कार्यक्रम सादर होत आहे. समता विचार प्रसारक संस्था आयोजित करत असलेल्या या उपक्रमात या वर्षी नाटकांची थीम असणार आहे ‘दीवार’ म्हणजेच ‘भिंत’! ठाणे परिसरातील खारटन रोड, अंबिका नगर, मानपाडा, किसन नगर आणि घणसोली अशा विभागातून युवा आपले विचार नाटकातून सादर करणार आहेत.
श्रेष्ठ साहित्यिक आणि नाटककार स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितांच्या रंगमंचाचे हे दहावे वर्ष आहे, असे संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले.
प्रतिभाताई मतकरी, प्रतिभा मतकरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी भाषा दूत, चिन्मयी सुमित, सिने दिग्दर्शक व टॅग सदस्य विजू माने, अभिनेता व टॅग सदस्य, उदय सबनीस, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया मतकरी विनोद, गणेश मतकरी, संपादक, दै. ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ, लघु चित्रपटकार, आंतरराष्ट्रीय किर्तीचे फिल्म ज्युरी, डॉ. संतोष पाठारे, थिएटर कोलाजची संचालिका, अभिनेत्री, निवेदिका, पल्लवी वाघ – केळकर,टॅग अध्यक्ष, महेश शानबाग, श्रीरंग खटावकर, पत्रकार आणि यू ट्यूबर रविंद्र पोखरकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
ठाण्यातील संवेदनशील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी हा युवांचा कलाविष्कार बघण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले (81089 49102) यांच्याशी संपर्क करावा.
