कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने

ठाणे : कोकण विभागातील ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये चिकू हे फळपीक मृग बहरासाठी अधिसूचित आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या १२ जून २०२४ रोजीच्या कृषि व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी 30 जून 2024 पूर्वी अर्ज करावे, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
ही फळपिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासंबंधी अथवा सहभागी न होण्याबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पीककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र (opt out) योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल व त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.
योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. कोकण विभागाकरीता प्रति शेतकरी सहभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे.) व बागेचे वय ५ वर्षे असणे आवश्यक आहे. मृग बहार सन 2024 मध्ये फळपिकनिहाय योजनेमध्ये शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था /बँक/आपले सरकार सेवा केंद्र/ विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे तसेच शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे, असे श्री. माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
चिकू फळपिकासाठी दि.०१ जुलै  ते ३० सप्टेंबर या कालावधी दरम्यान जादा आर्द्रता व जादा पाऊस (सततचा २० मिमी. पाऊस, ५ व १० दिवस, सापेक्ष आर्द्रता ९० % किंवा जास्त) या हवामान धोक्यांकरिता विमा संरक्षण मिळणार आहे. विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./ हेक्टर) : ठाणे व पालघर जिल्ह्यात चिकू फळपिकासाठी  चालू वर्षी विमा संरक्षित रक्कम रु. 70,000/-, विमाहप्त्यात शेतकरी हिस्सा ठाणेसाठी रु.12250/- व पालघरसाठी रु.3500/- असून विमा हप्त्यात घट – अनुक्रमे 30 व 80 टक्के झाली आहे.
ही योजना ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे मार्फत राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव, तसेच शहापूर तालुक्यातील किनवली, डोळखांब ही  महसूल मंडळे तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील डहाणू, चिंचणी, सायवन, मल्ल्याण, आशागड, आंबेसरी, वाणगाव, चारोटी; तलासरी तालुक्यातील तलासरी व  झरी, पालघर तालुक्यातील बोईसर, तारापूर, मनोर, सफाळे, आगरवाडी, पालघर, माहीम, लालोंडे व कोळगाव ; वाडा तालुक्यातील वाडा कंचाड, कोणे, खानिवली, मेट; विक्रमगड तालुक्यातील चिंचघर व  विक्रमगड ही  महसूल मंडळे अधिसूचित आहेत.
शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक/ वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी दि.12जून2024 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in व कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना कोणतीही शंका असल्यास बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा/ तालुका कार्यालय (टोल फ्री क्रमांक: १८००  २०९ ५९५९) किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *