स्वाती घोसाळकर
मुंबई – लोकसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील महायुतीच्या पराभवाचे आत्मचिंतन सुरु झाले आहे. महायुतीत प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपाचे २०१९ मधिल २३ वरून यंदा ९ खासदारांपर्यंत झालेल्या घसरणीची गंभीर दखल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले आहे. महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेतल्यामुळेच राज्यात लोकसभेला फटका बसल्याच्या मत आरएसएसच्या वर्तुळात व्यक्त केले जात आहे. त्यामुले येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीची समीकरणे बदलणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याची झलक राज्यसभेची उमेदवारी भरताना दिसून आले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पक्षप्रमुख अजित पवार यांची पत्नी राज्यसभेचा अर्ज भरत असतानाही त्यांची उमेदवारी दाखल करताना भाजपा अथवा शिवसेनेचा कोणताही बडा नेता तेथे उपस्थित नव्हता. महायुतीत राष्ट्रवादी एकाकी पडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत असल्याचे राष्ट्रवादीतील एका वरिष्ठ नेत्याने सांगतिले. अजित पवरांच्या राष्ट्रवादीसोबत युती तुटण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अण्णा हजारे यांनी या सगळ्या पार्श्वभुमीवर् पुन्हा अजित पवार यांच्याविरोधात उघडलेली आघाडी हे त्याचेच संकेत असल्याची चर्चा आहे.
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सामिल झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती ४५ प्लसचा जागा जिंकेल अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. प्रत्य़क्षात महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन काय फायदा झाला, अशी चर्चा आता सुरु झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर या मुखपत्रातही यासाठी अजित पवारांनाच जबाबदार धरण्यात आले आहे. अजित पवारांसोबत वातावरण निर्मित करण्याचा हा भाग असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूट पाडून अजित पवार गटाशी हातमिळवणी करण्याचा भाजपचा निर्णय संघाला अजिबात पटलेला नाही. संघाची भूमिका ही अजित पवारविरोधी राहिली आहे. अजित पवार यांच्यावर सिंचन आणि राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचा आरोप आहेत. ‘लोकसभा निवडणुकीत भाजप-संघाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास तयार नव्हते हे स्पष्टपणे दिसलं. बऱ्याच ठिकाणी ते निष्क्रिय राहिले. कार्यकर्ते भाजपवरही नाराज होते. त्याचा परिणाम निकालाल दिसला. भाजप २३ जागांवरुन ९ वर घसरला,’ असं एका भाजप नेत्यानं सांगितलं. संघात हृयात घालवलेले स्वयंसेवक रतन शारदा यांनी ऑर्गनायझरमधील त्यांच्या लेखात अजित पवारांमुळे भाजपच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का बसल्याचं म्हटलं आहे. थोडक्यात येणाऱ्या काही दिवसात ही दरी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
