माहेरवाशीण असलेल्या निता विचारेंनी मंत्रालय सचिवालयाची धमकी देवून सावंतांना मारहाणीसाठी केले प्रोत्साहित
राज भंडारी
रायगड : म्हसळा तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संदेरी येथील विचारे कुटुंबियांच्या चुलतीच्या नावे असलेल्या जमिनीचे मूळ वारसदार असलेल्या रामचंद्र किसन विचारे व अन्य चार भाऊ असे वारस असून त्यांच्या मालकीच्या या जागेत रमेश व संदीप सावंत यांच्या वडिलांना ४०० स्क्वेअर फूट जागा घर बांधून राहण्यासाठी सन १९६२ साली तोंडी व्यवहाराने देण्यात आली होती. याबाबत आता रामचंद्र विचारे आणि बंधूंची कोणत्याही प्रकारची हरकत नव्हती. मात्र कालांतराने रमेश व संदीप सावंत यांचे वडील श्रीधर सावंत यांनी सदर घराभोवती पुढील बाजूस पडवी तसेच मागील बाजूस एक पडवी बांधून अतिक्रमण करून जागा लाटली. त्यानंतर त्यांची मुले यावरच न थांबता ग्रामपंचायतीने बांधकामास मज्जाव घातलेला असताना देखील त्यांनी आता तर घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवरही बेकायदेशीर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करून चक्क पाच फूट उंचीची संरक्षक भिंतच उभारली. त्यानंतर रामचंद्र किसन विचारे यांनी या प्रकाराला विरोध केला असता सावंत कुटुंबातील संदीप श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत आणि निता यशवंत विचारे यांनी ६८ वर्षीय रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करीत आपल्या जिभेवरील ताबा सोडत अर्वाच्च शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यातच माहेरवाशीण असलेल्या निता यशवंत विचारे यांनी तर कहर केला, स्नेहा सावंत यांना अंगावर धावून जाण्यासाठी प्रोत्साहन करताना त्यांनी जिभेवरील ताबा सोडत “मी मंत्रालयात सचिवालयात कामाला आहे, तुझे कोण काहीही करू शकणार नाही. मी सर्व बघून घेईन” असे बोलून खतपाणी घातले. अखेर विचारे बंधूंनी पोलीसात दाद मागितल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. तसेच सदर प्रकारावर येथील लोकप्रतिनिधी यांनी हस्तक्षेप करून रविवारी (दि.२३ जून) रोजी यावर मार्ग काढण्यासाठी बैठक लावली. मात्र सदर बैठकीला सावंत कुटुंबीयांनी पुन्हा जैसे थे भूमिका घेत आपला गोंधळ घालण्यास सुरुवात करून सदरची बैठक धुडकारून लावली. यावेळी उपस्थितांनी त्यांना न्यायालयीन दणका देण्याची गरज असल्याचे सुचाविल्यामुळे रामचंद्र विचारे यांच्यासह पाचही बंधूंनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत रामचंद्र किसन विचारे यांनी बोलताना सांगितले की, गेली अडीच वर्षे सदर प्रकार सुरू आहे. आम्ही सर्व भाऊ हे नोकरीनिमित्त मुबई परिसरात राहतो. अडीच वर्षांपूर्वी आम्ही आमच्या जागेत लावलेली झाडे तसेच इतर पूर्वजांच्या काळातील दोन आंब्याची झाडे व एक नारळाचे झाड रमेश आणि संदीप सावंत यांनी कोणाचीही परवानगी न घेता तोडले व ते चोरुन विक्री केले. याबाबत पोलीसात तक्रार दिली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास विरोध करताना आपले वारस दाखले दाखवा असे सांगितले. त्यानुसार सदर वारस दाखल्यांचे काम सुरू होते. साधारण दीड महिन्यापूर्वी आम्हाला वारस दाखले मिळाले. पुन्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली झाली असल्यामुळे नव्याने आलेले सुर्वे या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आपली तक्रार घेता येणार नाही असे उत्तर दिले. या प्रकारामुळे संदीप आणि रमेश सावंत यांची हिम्मत अधिकच फोफावली. त्यानंतर त्यांनी आमच्या मोकळ्या जागेवर त्यांचीच जागा असल्याचे भासविण्यासाठी गेल्यावर्षी एका बाजूला संरक्षक भिंत बांधली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये तशी तक्रार दिल्यानंतर ग्रामपंचायतीने हे काम थांबविले आणि विना परवानगी आपण बांधकाम करू शकत नसल्याची त्यांना नोटीस दिली. मात्र मुजोरीचा कळस गाठलेल्या सावंत बंधूंनी मात्र प्रशासनाला केराची टोपली दाखवून दुसऱ्या बाजूला याच आठवड्यात दुसरी संरक्षक भिंत बांधून संपूर्ण जागा आपलीच असल्याचे भासवित बळकावण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळताच पाचही विचारे बंधू हे दिनांक ९ जून रोजी याठिकाणी आले. यातील मोठे बंधू रामचंद्र किसन विचारे यांनी त्यांना बांधकाम करताना अडविले असता रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत आणि माहेरवाशीण असलेली निता यशवंत विचारे हे याठिकाणी येवून ६८ वर्षीय वृद्ध असलेल्या रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करून परत अडवाल तर जिवंत राहणार नाही अशी धमकी देण्यास सुरुवात करू लागले. हे सर्व होत असताना याचा आवाज बाजूलाच असलेल्या विचारे बंधूंच्या कानावर गेल्यानंतर हे सर्व बाहेर आले. यावेळी माहेरवाशीण असलेली निता विचारे ही स्नेहा संदीप सावंत हिला पुढे करून “तू मार त्याला, मी मंत्रालय सचिवालयात कामाला आहे, तुझे कोणीही काहीही करू शकणार नाही. मी बघते सर्व” असे बोलून मारहाणीसाठी प्रोत्साहित करीत असल्याचे सर्व बंधूंनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ गोरेगाव पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. याबाबतचे सर्व चित्रफीत पोलिसांना दाखविल्यानंतर देखील पोलिसांनी सदर बाब ही सिव्हील मॅटर असल्याचे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. सरळ आणि साधेपणाने वागणाऱ्या विचारे कुटुंबाला न्याय तरी कोण देणार अशी स्थिती उद्भवली आहे. सावंत कुटुंबाच्या पाठीमागे कोणाचे हात दडले आहेत ? ते का प्रशासनाला जुमानत नाहीत ? पोलिसांचे देखील ते का ऐकत नाहीत ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
यापूर्वी देखील अशीच एक चॅप्टर केस २०२२ मध्ये दाखल करण्यात आली होती. यामध्ये संदीप श्रीधर सावंत, रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत, निता यशवंत विचारे आणि प्रसाद महादेव विचारे यांचा समावेश होता. त्या चॅप्टर केसनुसार एक वर्षे सावंत कुटुंब शांत राहिले आणि चॅप्टर केसची मुदत संपताच त्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. दिनांक ९ जून रोजी घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी तक्रार घेतली नसल्यामुळे रामचंद्र किसन सावंत यांनी गोरेगाव पोलिसांसह संदेरी ग्रामपंचायत, पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग, गृहमंत्रालयाच्या सचिवांना तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना एक पत्र तयार करून पाहिली प्रत गोरेगाव पोलिसांना शनिवार दिनांक २२ जून रोजी दिली. यावेळी सदर तक्रार अर्ज पोलिसांनी वाचल्यानंतर तत्काळ त्यांनी संदीप सावंत, स्नेहा सावंत, ऋतुजा सावंत आणि निता विचारे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलाम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला.
दरम्यान परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी विचारे कुटुंब आणि सावंत कुटुंबांची बैठक लावण्याचे प्रयत्न केले. रविवारी (२३ जून) रोजी सदरची बैठक देखील पार पडली. या बैठकीला काही राजकीय पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचारी देखील ग्रामस्थांसह उपस्थित होते. सुरुवातीला बैठकीमध्ये चर्चा सुरळीतपणे सुरू झाली मात्र काही वेळाने रमेश सावंत आणि अनेक गुन्हे दाखल असलेला प्रसाद विचारे यांनी याठिकाणी येऊन सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असलेल्या मध्यस्थांनी दिलेला पर्याय हा सावंत बंधूंनी धुडकावला. यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे प्रसाद विचारे याचे काम हे बिघडविण्याचे काम असल्याचे ग्रामस्थांमधून नेहमीच बोलले जात असते त्याची प्रचिती देखील या बैठकीमध्ये ग्रामस्थांना अनुभवण्यास मिळाली. मुळातच सावंत कुटुंबाची ही जागा नसताना देखील कामानिमित्त आपण बाहेर राहत असल्यामुळे त्यातील अर्धी जागा देऊन मार्ग काढण्यासाठी विचारे कुटुंबांनी एक पाऊल मागे घेतले होते. मात्र जागा बळजबरी करून लाटण्याचा घाट घालणाऱ्या सावंत बंधूंना हे मान्य नसल्यामुळे अखेर विचारे बंधूंनी आपण न्यायालयीन लढाई लढून सत्याचा विजय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
00000
