Author: bittambatami.com

ठाण्यातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डींग्जवर निवडणूक काळातही कारवाई करा – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जचे पेव फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेने यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. घाटकोपर येथे अवाढव्य होर्डींग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच  धोकादायक होर्डींगचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे महापालिकेने देखील याबाबत मागे राहू नये. निवडणूक असली तरी प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करावी, अशी मागणी आ. संजय केळकर यांनी केली. चौकट एखाद्या होर्डींगमुळे मेट्रोचे काम रखडले असेल  आणि ते अनधिकृत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरावा करेन.अनधिकृत बांधकामांवर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली, पण संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आ. संजय केळकर यांनी केली.

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न अजित नैराळे, डॉ. शीतल रसाळ, आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न अशोक गायकवाड कर्जत : देशाच्या १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. मावळ मतदारसंघात ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार,( दि. १३ मे )रोजी पार पडले. यामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० मिनिटांच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सायंकाळी बाहेर पडणारा मतदार पाऊसामुळे अडकून पडला. दरम्यान, पावसाच्या विघ्नामुळे मतदानाच्या टक्क्यांवर देखील परिणाम झाला आहे.ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली. मावळ मतदारसंघात गेले काही दिवस प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या. अशात दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने असल्याने लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर सोमवार,(दि. १३ मे) रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तर शहरी भागात साधारण ११ नंतर तुरळक मतदार दिसत होते. ११ नंतर उन्हाचा तडाखा बसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील किरवली, हलिवली,कर्जत दहीवली, कशेळे, धामोते, नेरळ दहीवली, कोठिंबे आदी भागात दुपारी देखील मतदार गर्दी करून होते. तर धामोते, कर्जत दहीवली येथील मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले. तसेच नेरळ येथील ८१ क्रमांक आनंदवाडी केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले होते. दरम्यान, १८९ कर्जत मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.१५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.२७ %, दुपारी १ वाजेपर्यंत २९.४७ %, दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.०३% तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान पार पडले. अशात दुपारी ३.३० वाजता अवकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे ऊन कमी झाल्यावर बाहेर पडण्यासाठी थांबलेला मतदार अडकून पडला. साहजिकच याचा फटका हा उमेदवारांना बसणार आहे. मावळ मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवार, दि.१३ मे) रोजी मतपेटीत बंद झाले आहे. येत्या ४ जून रोजी निकाल असणार आहे. तेव्हा या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांना पथक निहाय एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३४९ कंट्रोल युनिट आणि ३४९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप केले होते. ही प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी  विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघात 39 सूक्ष्म निरीक्षक दाखल

ठाणे : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 39 सूक्ष्म निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून ते केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्यासाठी काम करणार आहेत. मतदारसंघात दाखल झालेल्या या सूक्ष्म निरीक्षकांना आज त्यांच्या कर्तव्याबाबत, मतदान यंत्र हाताळणीबाबत, तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन, निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, पदनिर्देशित अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते उपस्थित होत्या. सूक्ष्म निरीक्षक दि. 20 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा अहवाल निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. मनोज जैन यांना सादर करतील.

ठाणे रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग घ्यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे अशी जनजागृती आज ठाणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१४ मे) ठाणे  रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात युवावर्ग,स्त्री -पुरुष ,दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. ठाणे शहरात २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आणि लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन स्वीप पथकाने केले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिक हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होवू नये यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे त्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही शंका, स्पष्टीकरण आणि तक्रारींसाठी नागरिक 1950 वर कॉल करून आपल्या शंकाचे निरसन करु शकतात असेही यावेळी सांगण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन करीत उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे  महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राजभवनातील अधिकारी व  कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई,  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा…

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १५ दुचाकी खाक

बदलापूर : वादळीवाऱ्याच्या पावसानंतर बदलापूर पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठेतील वैशाली सिनेमागृह परिसरात मंगळवारी सकाळी सहा वाजता आग लागण्याची घटना घडली. या आगीत १५ दुचाकींसह सात दुकानांतील तब्बल २० जणांचे स्टॉल जळून खाक झाले. महावितरणच्या रोहित्रामध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग महावितरणच्या दुर्लक्षामुळे लागली असल्याचे येथील गाळाधारकांचे म्हणणे आहे. बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेत वैशाली सिनेमागृह हे शहरातील मध्यवर्ती व गजबजलेले ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून दुचाकी पार्किंगचा व्यवसाय केला जातो. तर उर्वरित जागेत अनेक व्यावसायिक गाळे आहेत. ज्यात कपडे, चप्पल, मोबाईल कव्हर, ज्यूस सेंटर, फळे व फुले व्यावसायिक अशी सात ते आठ दुकाने होती. याच भागात महावितरणचा भला मोठा रोहित्र आहे. त्यात या रोहित्रामध्ये अनेक दिवसांपासून ठिणग्या उडत होत्या. याबाबतीत अनेकदा महावितरणकडे तक्रार केली होती, असे या गाळाधारकांचे म्हणणे आहे. तसेच सोमवारी (ता. १३) रात्रीदेखील या रोहित्रामधून फटाके फुटल्याचा आवाज आणि ठिणग्या बाहेर पडत होत्या. याबाबत तक्रार देण्यासाठी महावितरण प्रशासनाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी सकाळी सहा वाजता काही स्थानिकांनी या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती प्रशासनाला दिली, ही माहिती मिळताच संबंधित प्रशासन व अग्निशमन दलाला प्राचारण केले. तसेच महावितरणकडेदेखील यासंदर्भात तक्रार केली, मात्र महावितरणने कॉल उचलेपर्यंत वेळ निघून गेली होती, अशी खंत येथील गाळेधारकांनी व्यक्त केली. तसेच बाजारात गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी रोहित्र असू नये, यासाठी आम्ही वारंवार महावितरणकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र याकडेही महावितरणने अजूनपर्यंत लक्ष दिले नसल्याचे म्हटले. या संपूर्ण आगीत गाळेधारक व दुचाकीस्वार असे मिळून ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा दावा नुकसानग्रस्तांनी केला आहे. तसेच याची नुकसानभरपाई, महावितरण प्रशासनाने लवकरात लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कचऱ्याला लागलेली आग रोहित्रापर्यंत पोहोचली, त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. गेली अनेक वर्षे हा रोहित्र याच ठिकाणी आहे. जेव्हा कधी त्यात तांत्रिक बिघाड निर्माण होतो, त्यावेळी वेळीच लक्ष देऊन दुरुस्तीचे काम केले जाते. ही आग गाळेधारकांच्या निष्काळजीपणामुळे लागली आहे. त्याचबरोबर सध्या आम्ही या रोहित्रामधील जोडणी इतर ठिकाणी वळवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच या ठिकाणी ही आग कशामुळे लागली याचा तपासदेखील होणार आहे. -चांगदेव काळे, उपअभियंता, महावितरण, बदलापूर आम्ही वीस ते पंचवीस वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. येथे असलेल्या अनेक व्यावसायिकांचे हातावर पोट आहे. आमचा संसारदेखील याच ठिकाणी असतो. गेल्या अनेक वर्षांपासून या रोहित्राबाबत महावितरणकडे, आम्ही तक्रारी केल्या आहेत; मात्र महावितरणने या तक्रारींकडे कधीही सोयीस्कररीत्या लक्ष दिलेले नाही. पावसानंतर रात्री या ठिकाणी अनेकदा फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते. यासंदर्भातील आम्ही व्हिडीओदेखील आहेत. रात्री यासंदर्भात तक्रार देण्यासाठी महावितरणला सतत कॉलही केले, मात्र महावितरणकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही. -निहाल मलिक, व्यावसायिक

मनसेबरोबर युती करून भाजपाने गोरगरिब उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले.

प्रा. वर्षा गायकवाड यांचा बीजेपीवर हल्लाबोल उत्तर भारतीय समाज व काँग्रेस साथ साथ, लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात परिवर्तन करा. मुंबई : कोरोना काळात केंद्रातील भाजपा सरकारने अचानक लॉकडाऊन लावून जनतेला वाऱ्यावर सोडले. उत्तर भारतातून मुंबईत कामासाठी आलेल्या लोकांचे तर प्रचंड हाल झाले. या कठीण काळात सर्वात आधी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार या समाजाच्या मदतीला धावून आले. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्य व गरजेचे साहित्य घरोघरी पोहचवले. उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार त्यांना गावी पाठवण्यासाठी सर्व सुविधा पुरवल्या परंतु या काळातही भाजपा सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली होती, असा हल्लाबोल उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. सांताक्रूज येथे झालेल्या उत्तर भारतीय संमेलनात प्रा. वर्षा गायकवाड बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या की, उत्तर भारतीय समाज व काँग्रेस पक्षाचे संबंध नेहमीच गंगा जमुना संस्कृतीसारखे राहिले आहेत. काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांचा योग्य तो मान सन्मान राखला आहे. मुंबईचे महापौरपद, विरोधी पक्षनेता, मंत्री, आमदार व संघटनेतही महत्वाची जबाबदारी दिली. उत्तर भारतीय समाज मुंबईच्या संस्कृतीत मिसळला आहे. काँग्रेस सरकारने हॉकर्स पॉलीसी बनवून सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी दिली परंतु कामासाठी मुंबईत आलेल्या या गोरगरिब कष्टकरी समाजावर मनसेने हल्ले केले, मारहाण केली त्याच मनसेबरोबर भारतीय जनता पक्षाने युती करुन उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. उत्तर भारतीय लोक मुंबईत दुधाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात करतात. मुंबईतील जागा एका उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजापाने लावला आहे आता त्यांची नजर तबेल्यावरही पडली आहे. दुधावरही जीएसटी लावून लूट केली जात आहे. केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल यांनीच कोरोना काळात उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे सोडताना अडवणूक केली. गोयल यांनी मासळीचा वास सहन होत नाही म्हणून ते तोंडावर रुमाल बांधून फिरतात हे लोक तुमच्यासाठी काम करणार आहेत का? सवाल विचारून, ‘भाजपा सरकार हटानी है, काँग्रेस सरकार लानी है’, असा नारा वर्षा गायकवाड यांनी दिला. या संमेलनाला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, महारष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ कार्यक्रमाचे आयोजक अविनाश सिंह, संदिप शुक्ला आदी उपस्थित होते.