Author: bittambatami.com

डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांचे सर्वेक्षण तात्काळ थांबवा

उद्योजकांची एमआयडीसी अधिकऱ्यांकडे मागणी डोंबिवली : डोंबिवलीतील सरसकट सर्व कंपन्यांचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) सुरू करण्यात आलेले सर्वेक्षण तात्काळ थांबवा. अमुदान कंपनी स्फोटाची दुर्घटना दुखदायकच आहे. या स्फोटानंतरची परिस्थिती सावरण्यासाठी आणि यापुढे अशी कोणतीही दुर्घटना घडणार नाही, याविषयी प्राधान्याने उद्योजकांबरोबर चर्चा करावी. त्यानंतर सर्वेक्षण, कंपन्या स्थलांतर या विषयांपर्यंत पोहाचावे, अशा मागण्या ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (कामा) शुक्रवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन केल्या. अमुदान कंपनीतील स्फोटानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाने एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी, सर्वेक्षण सुरू केले आहे. या अचानक सुरू करण्यात आलेल्या प्रकाराने उद्योजक त्रस्त आहेत. कंपनी उत्पादन, त्याची पाठवणी, माल खरेदीदारांबरोबरच्या बैठका याविषयासाठी वेळ देण्याऐवजी डोंबिवलीतील उद्योजकांना अमुदान कंपनी स्फोटामुळे विविध तपास यंत्रणांना सामोरे जावे लागत आहे. शासन आदेशाप्रमाणे एमआयडीतील अतिधोकादायक, कंपन्या स्थलांतराच्या हालचाली प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केल्या आहेत. या प्रकाराने हवालदिल झालेल्या ‘कामा’ संघटनेच्या सदस्यांनी ‘कामा’चे अध्यक्ष राजू बेलारे, माजी अध्यक्ष अध्यक्ष देवेन सोनी यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीचे उपअभियंता राजेश मुळे यांची भेट घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता हर्षे, कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड उद्योजकांबरोबरच्या बैठकीला अनुपस्थित होते. अमुदान कंपनी स्फोटाची दुर्घटना दुर्देवी आहे. अशा दुर्देवी घटना पुन्हा एमआयडीसी भागात घडू नयेत यासाठी सर्व उद्योजक आपल्या पध्दतीने काळजी घेतील. प्रत्येक जण आपल्या कंपनीत औद्योगिक सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यासाठी कटिबध्द आहे. बहुतांशी कंपन्यांमध्ये अशाप्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे सरसकट सर्वच कंपन्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांना स्थलांतरासाठी राजी करू नये. एमआयडीसीने गेल्या तीन दिवसात रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ज्या रासायनिक कंपनीत उत्पादन प्रक्रिया, कामगार सुरक्षा आणि उत्पादित माल, साठा केंद्रे, रासायनिक भांडार कक्ष याविषयी काही त्रृटी आढळल्या असतील तर त्या कंपनीच्या मालकांना एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम आहे त्या त्रृटींचे अनुपालन करण्यासाठी अवधी द्यावा. त्या अवधीत त्याने ते काम केले नाही. त्यांच्या कंपनीत काही दुर्घटना घडली तर त्या कंपनीचे स्थलांतर करण्यासाठीची प्रक्रिया जरूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी. कामा संघटनेचे सदस्यही या कामासाठी शासकीय यंत्रणांना सहकार्य करतील, असे आश्वासन अध्यक्ष राजू बेलूर यांनी एमआयडीसीला दिले आहे. एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला उद्योजकांकडून जे सहकार्य लागेल ते देण्याची आपली तयारी असेल असे आश्वासन कामाच्या सदस्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले. डोंबिवली एमआयडीसीत सुरू असलेले सर्वेक्षण तात्काळ थांबविण्यात यावे. ज्या रासायनिक कंपन्यांमध्ये सर्वेक्षणाच्यावेळी त्रृटी आढळून आल्या आहेत. त्यांना एक वेळ सुधारण्याची संधी द्यावी. त्यानंतर काही दुर्घटना घडली तर या दोन्ही यंत्रणांनी संबंधित कंपनीबाबत योग्य निर्णय घ्यावा. त्याला ‘कामा’चे सहकार्य असेल असे आश्वासन एमआयडीसीला दिले आहे. -राजू बेलूर, अध्यक्ष, कामा.

ठाणे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास

ठाणे: स्थानक परिसरात नेहमीच नागरिकांचा गजबजात पाहायला मिळतो. अनेकदा नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण होते, इतकी रहदारी याठिकाणी असते. परंतू, मध्य रेल्वेने शुक्रवार पासून घेतलेल्या मेगाब्लाॅकमुळे स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. नागरिकांची अगदी तुरळक गर्दी या ठिकाणी होती. नेहमी रिक्षाची वाट पाहत उभे असणारे प्रवासी आज हे चित्र बदललेले होते. रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले. ठाणे मध्यवर्ती शहर असून येथे लोकवस्ती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्याही जास्त आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून मोठ्यासंख्येने नागरिक दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे स्थानक परिसर सकाळ- संध्याकाळ गजबजलेला दिसून येतो. दररोज गावदेवी मंदिरापासून ते स्थानक पर्यंत प्रवाशांची रहदाळी पाहायला मिळत असते. परंतू, शुक्रवारी मेगाब्लॅाकमुळे हे चित्र बदलेले दिसून आले. ऐन शुक्रवार म्हणजेच कामाचा दिवस असून देखील स्थानक परिसरात नागरिकांची रहदारी नव्हती. स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मध्य रेल्वे महामार्गावरील काही महत्त्वाचे कामे करण्यासाठी शुक्रवार पासून मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे, अशी पूर्व सुचना मध्य रेल्वे मार्फत देण्यात आली होती. त्यानुसार, अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना या मेगाब्लाॅकचा त्रास होऊ नये यासाठी घरातून काम करण्याची सुचना दिली होती. तर, काही नोकरदारांनी स्वत:च्या वाहनांनी किंवा खासगी वाहनाने कार्यालय गाठले. तसेच नोकदारवर्गा व्यतिरिक्त काही इतर नागरिक कामानिमित्त बाहेर पडत असतात. ते देखील मेगाब्लाॅकमुळे घरा बाहेर पडले नाही. त्यामुळे रस्त्यावर फार तुरळक गर्दी दिसून आली. रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत ठाणे स्थानक येथील गावदेवी मंदिर परिसरात शेअरिंग रिक्षाचा थांबा आहे. या थांब्यालर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असतात. बदलापूर, कल्याण-डोंबिवली तसेच मुंबईतून ठाण्यात कामासाठी येणारे नोकरदार या थांब्यावरुन रिक्षा पकडतात. त्यामुळे येथे प्रवाशांची तसेच रिक्षा चालकांची मोठी गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळतो. नेहमी प्रवासी रिक्षा चालकांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येतात. मात्र, आज चित्र उलटे होते. रिक्षा चालक हे प्रवाशांच्या प्रतिक्षेत असल्याचे पाहायला मिळाले. या मेगाब्लाॅकमुळे अनेक नोकरदारांना घरुन काम करत आहेत. त्यामुळे आज प्रवाशांची संख्या घटली असून दररोज उत्पन्नात घट झाली असल्याची प्रतिक्रिया स्थानक परिसरातील एका रिक्षा चालकाने दिली.

महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात

मुंबई : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वरदान ठरणाऱ्या या उपक्रमामध्ये महावितरणने स्वतःपासून सुरुवात करून उदाहरण घालून द्यावे, असे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात ६०, गोंदियामध्ये १४६, वर्धा येथे ३०, भंडारा येथे १० आणि चंद्रपूरमध्ये ९५ अशा एकूण ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत. तसेच संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचे बंधन आहे. महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर नियमितपणे आपला वीजवापर समजेल. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, वेळेवर रिडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात. मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो. अत्यंत पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलाविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल. असे मीटर वापरणे काळाची गरज झाली आहे. देशामध्ये मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात स्मार्ट मीटरचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे व तेथील ग्राहक अचूक बिलिंग आणि वीजवापराची नियमित माहिती मिळणे या सुविधेचा वापर करत आहेत.

ठाणे आणि मुंबई महापालिकेकडून ५% पाणी कपात

५ जूनपासून होणार १० टक्के कपात ठाणे : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात ०५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही पाच टक्के पाणी कपात लागू झाली आहे. या कपातीचे प्रमाण बुधवार, ०५ जूनपासून १० टक्के होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून एकूण ५९० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी, ८५ एमएलडी पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ठाण्याला मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1. किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता पाच टक्के पाणी कपात लागू झाली असून पाच जूननंतर १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त रंजू पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

इंदोरच्या होळकर संस्थानकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर नर्मदेच्या जलाभिषेकसाठी ठाण्याला मान

ठाणे: देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धार  करणाऱ्या  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. आहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तीर्थ पाठविण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तिर्थाने अभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तिर्थ पाठविण्यात आले होते. राज्यात सांगली, पुणे,माळेगाव बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे,औंढा नागनाथ, अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोहचले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनश्चर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडुन युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तिर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी झाली. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे आहिल्यादेवीच्या मूर्तीवर शुक्रवारी सकाळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी व माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या हस्ते नर्मदा तीर्थानने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या.तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सोपान भाईक,वार्ड ऑफिसर आनंद पाटील,विकास मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे ,खजिनदार अनिल जरग,उपाध्यक्ष कुमार पळसे,राजेश वीरकर,प्रचारप्रमुख सचिन बुधे,उपखजिनदार सुरेश भांड,सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर,मनोहर वीरकर,प्रसाद वारे,गणेश बारगीर,अविनाश लबडे,दीपक झाडे,संतोष बुधे,संतोष दगडे,उत्तम यमगर,अंकुश उघाडे,उद्धव गावडे,महेश पळसे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर, सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे, उपसचिव सुजाता भांड, उपखजिनदार सुषमा बुधे, सल्लागर अर्चना वारे, मीना कवितके, शीतल डफळ, वंदना वारे, अमृता बुधे, सीमा कुरकुंडे, मनीषा शेळके, रंजना यमगर,स्मिता गावडे, शुभांगी उघाडे,षरिचा कुलाळ आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्यावारी हुकली 

ठाणे  : प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती. श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष, जादा गाड्या सोडल्या होत्या. आता काही महिने उलटल्यावर श्री रामचंद्रांच्या…

तंबाखू,खैनी, गुटखा,खर्रा खाणं घातकच परंतु खावुन थुंकणे महाघातक

विशेष रमेश कृष्णराव लांजेवार संपूर्ण जगातील लोकांना तंबाखू पासून मुक्ती मिळावी व आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने तंबाखू व धुम्रपान यापासून होणारा त्रास दुर करण्याकरीता तंबाखू निषेध दिवस साजरा केल्या…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

विशेष श्याम ठाणेदार आज ३१ मे, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी माणकोजी व सुशिलाबाई शिंदे…