मतदान यंत्रांची ७ विधानसभा संघनिहाय पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण – किशन जावळे
अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ३२ रायगड आणि ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील ७ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार ई व्ही एम हीव्हीपॅट यंत्राची प्रथम सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. ही प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पध्दतीन ही सरमिसळ करण्यात आली.जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार २ हजार ७१९ मतदान केंद्र आहेत. सध्या रायगड जिल्ह्यासाठी ६ हजार ७८० बॅलेट युनिट, ३ हजार ७७४ कंट्रोल युनिट तर ३ हजार ९५२ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राच्या १३८ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट वाटप करण्यात येणार आहे. तर १४५ टक्के व्हीव्हीपॅट वाटप करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदार संघनिहाय मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येणार आहे. सध्या ही यंत्र जिल्हास्तरावर स्ट्रॉँगरूम मध्ये आहेत.
राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा
रायगडच्या बबन, गणेशची निवड मुंबई : येत्या ८ ते १२ एप्रिल दरम्यान पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या वतीने हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रायगडच्या बबन बाबू झोरे (वाघेश्वर- कर्जत, जे व्ही आर जिम)आणि गणेश संजय तोटे (फिटनेस ऑन जिम, तक्का – पनवेल) यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत १५० पेक्षा जास्त पुरुष आणि १०० पेक्षा जास्त महिला खेळाडूंचा सहभाग अपेक्षीत आहे. त्यांच्या निवडीबाबत बबन झोरे यांना जे व्ही आर फिटनेसचे संचालक विनोद येवले (कर्जत) आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार (फिटनेस ऑन जिम, संचालक, पनवेल) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बबन, गणेश यांना प्रशिक्षक विशाल मुळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडच्यावतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी केली असल्यामुळे ते पदक विजेते होतील असा विश्वास माधव पंडित यांनी व्यक्त केला आहे.
१३ एप्रिलपासून ठाण्यात समता संस्कार शिबिर
ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा १३ एप्रिल पासून १६ एप्रिल पर्यंत समता विचार प्रसारक संस्थेतर्फे येऊर येथे समता संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० वी च्या परीक्षेला बसलेल्या आणि कॉलेज मध्ये जाणाऱ्या १८ ते २५ वयाच्या युवक युवतींसाठी असलेल्या या निवासी शिबिरात शरीर विज्ञान, माध्यमांचा प्रभाव, मोबाईल चा विवेकी वापर, आकाश दर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर रंजकपणे, खेळांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. डॉ. संजय मंगला गोपाळ, वंदना शिंदे, प्रशांत केळकर, राजू बहाळकर, हर्षदा बोरकर या सारखे मान्यवर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर शॉर्ट फिल्म दाखवून त्यावर चर्चा करण्यास सुप्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक संतोष पाठारे येणार आहेत. मुलांना शिस्तीचे धडे देत व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबर त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत व्हाव्या हा मुख्य उद्देश हे शिबिर भरवण्यामागे आहे. येऊर येथील निसर्गरम्य वातावरणात संपन्न होणार्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येंने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी सचिव अजय भोसले (८१०८९४९१०२) यांना संपर्क करावा. जागा मर्यादित आहेत.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
ठाणे, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या यशासाठी पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी शिवानी पवार यांची प्रेरणा व केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे यांचे केंद्रातील दरमहा परीक्षा नियोजन व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. या परीक्षेत शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे, केंद्र ठुणे या शाळेने घवघवीत यश संपादन करत यशाचा चौकार लगावला आहे. शाळेचे तब्बल चार विद्यार्थी कु. हरिचंद्र रवि वाख, कु. प्राची लक्ष्मण विशे, कु. साई वाळकू झुगरे आणि कु.वैभव गुरूनाथ विशे या गुणी विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झाली आहे. शैक्षणिक वर्षे २०२३ – २०२४ या वर्षाची नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षा २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल दि.३१ मार्च रोजी जाहीर झाला आहे. दुर्गम भागातील एक छोटी शाळा असूनही नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थी व आष्टे शाळा तसेच शिक्षकवृंद आष्टे यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यामध्ये मार्गदर्शक शिक्षक भगवान वरकुटे व राजाराम वेखंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेच्या या घवघवीत यशात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळ आष्टे यांचे तसेच आदिवासी उन्नती मंडळ मुंबई, नॉलेज अकॅडमी शहापूर, जाणीव प्रतिष्ठान शहापूर, शिक्षक नेते स्व. काशिनाथ भोईरसर प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
दिलीप करंगुटकर स्मृती शालेय कॅरम स्पर्धा
३८ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे क्रीडा सल्लागार स्व. दिलीप करंगुटकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त ६ एप्रिलला भायखळा येथे होणाऱ्या विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत मुंबईसह विविध जिल्ह्यातील उदयोन्मुख ३८ खेळाडूंमध्ये विजेतेपद पटकाविण्यासाठी चुरस होणार आहे. १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या एकेरी कॅरम स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्यांना आकर्षक चषक-पदक व स्ट्रायकर देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाप्रेमी राजेश सुर्वे यांच्या तर बक्षीस समारंभ डॉ. विशाल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे परिसर व अविनाश स्पोर्ट्स यांचे स्पर्धेला सहकार्य लाभले आहे. क्रीडा व सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक पटकाविण्यासाठी आर्यन स्कूल-पुणेचा आयुष गरुड, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, इझाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा रुद्र भालेराव, एमपीएस-वरळीचा सिध्दांत मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय-वरळीचा समीर खान, पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्ना गोळे आदी उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरले आहेत. परिणामी कॅरम रसिकांना अटीतटीच्या लढती पाहण्यास मिळतील. पंचाचे कामकाज नामवंत राष्ट्रीय दर्जाचे पंच प्रणेश पवार तसेच क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, चंद्रकांत करंगुटकर पाहणार आहेत.
रविवारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा पुण्याला
मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणुक ७ एप्रिल रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खो-खो असोसिएशची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ७, एप्रिल रोजी ठीक १२:00 वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी, सभागृह, बालेवाडी पुणे आयोजित केली आहे. या विशेष सर्वसाधारण सभेत चौवार्षिक (२०२४ ते २०२८) निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. या सभेला सर्वांनी वेळेवर उपस्तीत राहण्याचे आव्हान चंद्रजीत जाधव – सहसचिव, भारतीय खो खो महासंघ व गोविंद शर्मा – सरचिटणीस, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी केले आहे. या सभेला सुधांशु मित्तल (अध्यक्ष – भारतीय खो खो महासंघ) व एम. एस. त्यागी (महासचिव – भारतीय खो खो महासंघ) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उपकार सिंग (सहसचिव, भारतीय खो खो महासंघ) व अनिल झोडगे (सहसचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन) हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘श्रीकांत शिंदेंच्या विरुद्ध नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ’
शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्या खासदारांच्या विरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण होते. त्या खासदारांच्या लोकसभेसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर त्या रद्द करण्यात आल्या. असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत असेल. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसेल, अशी टिपणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी येथे केली. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोषणा केली. यावेळी उमेदवार दरेकर यांना शुभेच्छा आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युवा नेते सरदेसाई यांनी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी सरदेसाई यांनी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले. खासदार डाॅ. शिंदे यांची उमेदवारी घोषित का केली जात नाही हे त्यांच्या पक्षाला विचारावे. पण एकंदर परिस्थिती पाहता शिंदे गटातील खासदारांची उमेदवारीसाठी नावे जाहीर होऊनही नंतर ती उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. अशा खासदारांच्या बाबतीत मतदारसंघात जे नकारात्मक वातावरण आहे. त्याचे हे परिणाम आहेत. अशीच परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वेक्षणातून पुढे आली असेल, त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यास माघार घेतली जात असेल. असे होऊ नये, असे वाटते, अशी सूचक टिपणी सरदेसाई यांनी केली. नियतीचा खेळ योग्यवेळी बदला घेतोच, असे सांगून सरदेसाई म्हणाले, शिवसेनेतील फुटीनंतर तेरा खासदार शिंदे गटा सोबत गेले. त्यांच्यामुळे सत्ता गेली. पक्षात फूट पडली. त्या तेरापैकी पाच खासदारांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापली आहे. आता या खासदारांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आठवण येत असेल. खासदारांच्या उमेदवारी जाहीर झाली की त्यांना सन्मानाने मातोश्रीवर बोलवले जायाचे. २०१४, २०१९ मध्ये या खासदारांनी त्याचा अनुभव घेतला आहे. या उमेदवार खासदारांचे ठाकरे कुटुंबियांकडून साग्रसंगीत स्वागत केले जात होते. रश्मी ठाकरे या खासदारांना विजयासाठी औक्षण करून त्यांना आशीर्वाद द्यायच्या. मग सन्मानाने निश्चित उमेदवारांंना एबी अर्ज दिले जायाचे. आता याच खासदारांना परिस्थिती बदलल्याने शिंदे यांच्या समोर उमेदवारीसाठी दहा दहा तास प्रतीक्षा करावी लागते. आपली उमेदवारी जाहीर होते की नाही याची धाकधूक या खासदारांना आहे. मातोश्रीवरचा मान आणि शिंदे यांच्या समोरील स्थान याची अनुभती आता हे इच्छुक खासदार घेत असतील. शिवसेना आम्ही जोमाने पुढे नेणार असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारीसाठी दोन आकडी उमेदवारीसाठी जागा मिळवता येत नाहीत. उमेदवारांची घोषणा करताना, जागा मिळविताना त्यांची होणारी तगमग आता जनता पाहत आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणताही विचार न करता २१ उमेदवारांची घोषणा केली आहे, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपशहर संघटक हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव, शरद पाटील, विवेक खामकर उपस्थित होते.
‘कोणतेही काम करा, आधी आयोगाची परवानगी घ्या’
मनपाकडून २२८ कोटींच्या कामाचे प्रस्ताव आयोगाकडे मुंबई : निवडणुकीच्या काळात लोकानुनय करणारी किंबहुना लोकांना खुश करून त्यांच्यावर प्रभाव टाकणारी कामे काढली जाऊ नयेत यासाठीच कोणतीही कामे करताना निवडणूक आयोगाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेला नियोजित कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाकडे सदर करावे लागले आहेत. खड्डे बुजवणे, नालेसफाई आदी कामांसाठीही आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. विविध कामांचे २२८ कोटी रुपयांचे प्रस्ताव पालिकेने मंजुरीसाठी आयोगाकडे धाडले आहेत. आपत्कालीन परिस्थिती किंवा पावसाळ्यापूर्वीची कामे निवडणूक काळात पूर्ण होणे अपेक्षित असतात. खड्डे बुजवण्याच्या कामासाठीही आयोगाची परवानगी का घ्यावी लागते, अशी विचारणा पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असता, कोणती कामे निवडणूक काळात करावीत, याचे स्पष्ट निर्देश आयोगाच्या आचारसंहितेत आहेत. आपत्कालीन काळातील कामाशिवाय अन्य कामे या काळात अपेक्षित नाहीत. त्यातही अत्यावश्यक कामे कोणती, ही कामे खरोखरच अत्यावश्यक आहेत का, याची छाननी आयोगाकडून केली जाते. त्यानंतरच परवानगी दिली जाते. त्यामुळे खड्डे भरणीच्या कामासाठीही परवानगी घ्यावी लागते. खड्डे भरण्याचे काम का करावे लागणार आहे, ते किती महत्त्वाचे आहे, हे पटवून द्यावे लागते. निवडणूक काळात लोकानुनय करणारी कामे काढून लोकांवर एका अर्थाने लोकांवर प्रभाव टाकणारी कामे काढली जाऊ नयेत, हे आचारसंहितेत अभिप्रेत आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. हिरवा कंदील मिळाल्यानंतरच निविदा १) पालिकेने याआधी ज्या कामांच्या निविदा काढल्या आहेत, ती कामे आयोगाच्या कचाट्यातून सुटली आहेत. मात्र, यापुढे जी कामे आवश्यक असतील त्या कामांसाठी आयोगाकडे जावेच लागणार आहे. २)आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्या कामांच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर कामांना सुरुवात होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत नालेसफाई, नाल्यांतील गाळ काढणे, त्याची विल्हेवाट लावणे, गाळ वाहून नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे या कामांना वेग येईल. ३) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची डागडुजीही पालिका हाती घेणार आहे. त्यासाठी आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
