Category: होम

प्रदूषणाची गंभीर स्थिती असतानाही नैसर्गिक तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाचा महापालिकेचा आग्रह का? – पर्यावरण प्रेमीची नाराजी

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील मांडली तलावासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये प्रदूषणाची गंभीर परिस्थिती यापूर्वीच शासकीय यंत्रणांच्या निदर्शनास आलेली असतानाही, महापालिकेकडून गणेशमूर्ती तसेच इतर सण-उत्सवांच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याची पद्धत सुरू ठेवली जात असल्याबाबत पर्यावरणप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या अहवालानुसार मांडली तलावाच्या पाण्यात Dissolved Oxygen केवळ १.८ mg/L, BOD १४ mg/L आणि COD ४८ mg/L आढळून आले होते. पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर निरीक्षणेही नोंदविण्यात आली होती.  अशा परिस्थितीत याच नैसर्गिक तलावांमध्ये पुन्हा मूर्ती विसर्जन करून प्रदूषणाचा भार वाढवायचा का? असा सवाल पर्यावरणप्रेमी हर्षद ढगे यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने २०२6 साठी प्रसिद्ध केलेल्या विसर्जन यादीमध्ये नैसर्गिक स्रोत, कृत्रिम तलाव आणि पार्टिशन करून तयार केलेले कृत्रिम तलाव अशा स्वतंत्र श्रेणी केल्या आहेत. मात्र, एखाद्या नैसर्गिक जलस्रोतामध्ये केवळ पार्टिशन किंवा तात्पुरती विभागणी केली म्हणून तो जलस्रोत कायदेशीर व तांत्रिकदृष्ट्या कृत्रिम तलाव ठरतो का, हा गंभीर प्रश्न आहे.  शहरामध्ये स्वतंत्र कृत्रिम विसर्जन तलाव मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देता येत असताना नैसर्गिक तलावांचे प्रदूषण का वाढवायचे? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेने प्रत्येक प्रभागात किंवा आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरते/स्थायी कृत्रिम विसर्जन तलाव, टाक्या किंवा योग्य जलरोधक संरचना उपलब्ध करून द्याव्यात. या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची स्वतंत्र व्यवस्था करून विसर्जनानंतरचे पाणी, गाळ आणि मूर्तीचे अवशेष यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. “कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्याची क्षमता आणि पर्याय उपलब्ध असताना नैसर्गिक तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करून त्या जलस्रोतांचे प्रदूषण वाढवणे हा कोणत्याही परिस्थितीत योग्य पर्याय असू शकत नाही. प्रशासनाने उत्सव व्यवस्थापनासोबत पर्यावरण संरक्षणालाही समान महत्त्व दिले पाहिजे,” असे हर्षद ढगे यांनी म्हटले आहे.

दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरी समस्या व विकासकामांना गती मिळण्याची नागरिकांची अपेक्षा दिवा, दि. ७ सप्टेंबर (आरती परब) : दिवा प्रभाग समितीचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर महापौर पिंपोळकर यांनी जाधव यांचा सत्कार करून त्यांना अध्यक्षपदाची खुर्ची ग्रहण करण्यास सांगितले. यावेळी दिवा शहरप्रमुख तथा नगरसेवक रमाकांत मढवी आणि उपशहरप्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांनी दीपक जाधव यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नगरसेवक, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. दिवा शहरातील वाढत्या नागरी समस्या, प्रलंबित विकासकामे तसेच भविष्यातील विविध विकासकामांना गती मिळावी, यासाठी प्रभाग समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नव्या अध्यक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचून त्या मार्गी लागतील, अशीही अपेक्षा आहे. दरम्यान, दिवा प्रभाग समितीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अध्यक्ष दीपक जाधव यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ठाणे महापालिका सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नूतन कार्यालयाला भेट देऊन दीपक जाधव यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिवा विभागातील मूलभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि विकासकामांना प्राधान्य देत काम करण्याचे मोठे आव्हान दीपक जाधव यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात दिव्याच्या विकासाला कितपत गती मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जिजामाता नगर गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

प्रथमच उभारला आठ थराचा मानवी मनोरा राजेंद्र साळसकर मुंबई- भगवान श्रीकृष्णाच्या बाललिलांच्या स्मरणाच्या उत्सवाचा सण म्हणजे गोपाळकाला. हा सण  अभुतपूर्व व मोठ्या जल्लोषात संपूर्ण देशभरात साजरा झाला. विविध  राजकीय पक्षांच्या  आणि नेत्यांच्यावतीने लाखो रूपयांच्या बक्षिसांच्या दहिहंडीचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या वतीने ठाणे येथील संकल्प प्रतिष्ठानच्य हंडीसाठी दक्षिण मुंबईतील पहिले आणि महाराष्ट्रातील दुसरे डबल दुरीचे ३ एक्के करत ८ थर रचण्याचा ऐतिहासिक विक्रम* काळाचौकी येथील जिजामाता नगर गोविंदा पथकाकडून करण्यात आला. या ऐतिहासिक कामगिरीचे विशेष कौतुक म्हणजे, जिजामाता नगर गोविंदा पथकाच्या इतिहासातील पहिले २०११ चे ७ थर आणि मंडळाच्या इतिहासातील पहिले ८ थरांची रचना मंडळाचे प्रमुख प्रशिक्षक तसेच अध्यक्ष  चेतन मोरेश्वर पवार यांच्या कार्यकाळात झाली आहे.  ही ऐतिहासिक कामगिरी म्हणजे जिजामाता नगर गोविंदा पथकाच्या शौर्य, जिद्द, एकजूट, मेहनत आणि संघभावनेचा अभिमानास्पद विजय! जिजामाता नगर गोविंदा पथकाचया या गोविदा पथकाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्गल जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुशील साळसकर यांनी अभिनंदन केले असून संपूर्ण काळाचौकी परिसरातून या गोविंदा पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिजामाता नगर गोविंदा पथकाच्या कामगिरीमुळे या पथकातील सर्व गोविदांचा विश्वास दुणावला असून पुढील वर्षी नऊ मानवी मनोरा रचण्याचा मनोदय  मंडळाचे अध्यक्ष तसेच प्रशिक्षक चेतन पवार यांनी व्यक्त केला आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांचा नव्या शैक्षणिक पर्वाला प्रारंभ

डोंबिवली : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान करणाऱ्या जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते तथा कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नव्या शैक्षणिक पर्वाला…

प्रभाग २९ मध्ये आरोग्य केंद्र सुरू, दीड लाख नागरिकांना दिलासा

  आरती परब दिवा : दिवा प्रभाग समितीअंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मधील खान कंपाउंड, दोस्ती आणि शिबली नगर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका…

 सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा!

 कर्ली खाडी –तारकर्ली मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सेवा; दोन तासांचा प्रवास १५ मिनिटांत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) — सिंधुदुर्गातील अंतर्गत  जलवाहतूक अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्ताव असून  प्रायोगिक तत्वावर अशी सेवा सुरु करण्यात येणार आहे.  मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. कर्ली खाडी –तारकर्ली मार्गावर सुरुवातीला  प्रायोगिक तत्त्वावर फेरीसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या रस्त्याने या भागात पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. फेरीसेवा सुरू झाल्यास हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मोठा फायदा होणार असून सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासालाही  चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला कर्ली खाडी–तारकर्ली, कर्ली खाडी –मोबार -देवबाग, देवबाग–निवती, विजयदुर्ग–अणसुरे–दांडे आणि आरोंदा–किरणपाणी या पाच संभाव्य मार्गांचा विचार करण्यात आला आहे. तिम मार्ग निश्चित करण्यापूर्वी जेटींची उपलब्धता, पाण्याची खोली, प्रवासी व वाहनांची मागणी तसेच अन्य तांत्रिक बाबींचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. चारचाकी, दुचाकींसह  वाहतूक  प्रस्तावित फेरीबोट सुमारे २० मीटर लांब व ७.५ मीटर रुंद असणार आहे. या फेरीबोटीत प्रवाशांसह चारचाकी व दुचाकी वाहून नेण्याची क्षमता असेल. एका फेरीबोटीच्या बांधणीसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. फेरीबोटीचे बांधकाम शिपयार्ड किंवा सक्षम संस्थेमार्फत तांत्रिक निकषांनुसार करण्यात येणार आहे. संचालन, मनुष्यबळ आणि देखभालीची जबाबदारी संबंधित ऑपरेटरची राहणार असून, मार्ग, वेळापत्रक व भाडे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर शासनाचे नियंत्रण राहणार आहे. मंत्री राणे यांनी मार्ग निश्चितीपूर्वी जेटी, चढ-उतार व्यवस्था,  पाण्याची खोली तसेच प्रवासी व वाहनांची मागणी याबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. फेरीसेवा सुरू झाल्यास सिंधुदुर्गातील जलवाहतुकीला आधुनिक पर्याय मिळण्याबरोबरच पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

अनिल ठाणेकर ठाणे, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशभक्तांच्या वाहनांना पथकर…

थकीत ५८ लाख रुपये ठाणे मनोरूग्णालयातील सफाई कामगारांच्या बॅंक खात्यात जमा

  अनिल ठाणेकर ठाणे, सहा महिन्यांच्या थकीत वेतन फरकाच्या रकमेच्या दुप्पट दंडासहित एकूण ५८ लाख रुपये ४५ दिवसांत ठेकेदार यांनी अदा करावे. ठेकेदार यांनी सदरील रक्कम अदा केली नाही तर…

आरसीएफ व्हॉलीबॉल निवडचाचण्या ११ व १२ सप्टेंबर रोजी

  मुंबई, ८ सप्टेंबर: आरसीएफ स्पोर्ट्स क्लबतर्फे मुंबईत होणाऱ्या स्थानिक स्पर्धांमध्ये आरसीएफ व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठीच्या संघासाठी खेळाडूंच्या निवडचाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचण्या चेंबूर येथीलआरसीएफ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर…