Category: होम

मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचे लोकार्पण

अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचे उदघाटन शुक्रवारी पार पडले. सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा-भाईंदरच्या धर्तीवर घोडबंदर येथील नळपाडा येथे १५० बेडचे सुपर स्पेशालिटी “मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक” या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी खासदार नरेश मस्के, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मा. नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभागप्रमुख भगवान देवकाते, युवासेनेचे सिद्धार्थ पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कॅशलेस रुग्णालयाचा फायदाओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशन साठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुवात होणार आहे. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूना सेवा देणार आहे.  हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासणी पासून, विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू न दिल्याने हे हॉस्पिटल आजपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार असून हे हॉस्पिटल म्हणजे गरीब – गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महापालिकेच्या माध्यमातून बनविण्यात आलेली असून या इमारतीत ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी  कॅशलेस हॉस्पिटल सुरू करावे यासाठी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून होणारी वैद्यकीय मदत दिड लाखापासून पाच लाखापर्यंत नेण्यात आल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, तसेच घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले.ठाणे शहरातील हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे शहरातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील तिसरे सरकारी कॅशलेस हॉस्पिटल आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे कॅशलेस हॉस्पिटल चालणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व उपचार, कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्त तपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, 2डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग इ. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार असून या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे.

हरित लवादाने १०२ कोटींचा व उच्च न्यायालयाने विकासक आणि ठामपाला दोन लाखांचा दंड ठोठावला!

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांवर कारवाई करावी – नितीन देशपांडे अनिल ठाणेकर ठाणे : महापालिका स्थापन झालेल्या ४३ वर्षाच्या पदार्पणादिवशीच पुणे हरित लवादाने, ठाणे महापालिकेच्या ठाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाला १०२.४ कोटीची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे. देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात, प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यातबद्दल ठामपास हा दंड ठोठावला आहे. त्यानंतर केवळ आठ दिवसांनी ठाण्याचा प्रसिद्ध कोरम माॅलचे नाल्याच्या जागेवर बांधकाम नियमित करण्याचा २००५ सालचा तत्कालीन ठामपा आयुक्तांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द करून विकासक आणि ठाणे महापालिकेला दोन लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. ठामपाने नाल्यावर बांधलेले बांधकाम थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर आदेश झुगारून बेकायदेशीरपणे माॅलचे बांधकाम चालूच ठेवले. काही भाग पाडल्यानंतर ही तेथे नव्याने बांधकाम करण्यात आले.अशी परिस्थिती असताना फेब्रुवारी २००५ आयुक्तांनी विशेषाधिकार वापरून बांधकाम नियमित केले. सार्वजनिक सुविधांशी तडजोड करून खाजगी विकासाचा फायद्यासाठी अधिकार वापरले, हा हेतू फारच भयानक आहे.मात्र, कायद्याने महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार देण्यात आले असले, तरी महापालिका आणि तिच्या आयुक्तांना त्यांच्याकडील या विशेषाधिकाराचे मालमत्तेचे विश्वस्त या नात्याने केवळ महापालिकेच्या आणि जनतेच्या हितासाठी वापर करणे बंधनकारक आहे. असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. मात्र याबद्दल आपण काहीही कार्यवाही केलेली नाही, आपले सरकार इतके असंवेदनशील आहे का ? ठामपाच्या बेकायदेशीर कृतीमुळे प्रामाणिक करदात्यांवर भुर्दंड का ? कायदे नियम वगैरे जनतेचा सुरक्षिततेसाठी केले आहेत याची विश्वस्त म्हणून आयुक्तांना माहिती असूनही सदर बाब कायदेशीर कसूरीची सर्वोच्च कळस पार करणारी आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री असलात तरी ठामपाचे करदाते प्रथम आहात. दंड भरण्याची रक्कम प्रमाणित करदात्यांच्या करातून जाणार आहे. यासाठी वरील बाबतीत आपण कठोर पावले उचलून ठामपा व कायदेशीर कर्तव्यात कसूरी करण्यावर तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा राज्याची प्रतिमा जनतेसाठी नव्हे तर बेकायदेशीर बाबींचे सरंक्षण करणारी उभी राहील आणि याला आपली मान्यता आहे असे समजले जाईल. ठामपाच्या वरील बेकायदेशीर बाबींवर उघड्यावर आल्यामुळे ठामपाच्या गेल्या दोन दशकातील अश्या अनेक बाबींची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.

अन् मातेसह वाचले नवजात अर्भकाचे प्राण

मर्जिया पठाण यांनी दिला मानवतेचा धडा ठाणे : आज माणसे एवढी निग्गरगट् झाली आहेत की शेजारील माणूस वेदनेने तळमळत असतानाही ढुंकूनही पहात नाहीत  मात्र  मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी रस्त्यावर वेदनेने तळमळणाऱ्या गर्भवतीला ओळखपाळख नसतानाही उचलून रूग्णालयात दाखल केले अन् तिचे बाळंतपण केले. मर्जिया यांच्या या मानवतावादी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतूक होत आहे. मुंब्रा येथे राहणारी रोशनी काळे ही गर्भवती महिला मित्तल रोड परिसरात काही कामानिमित्त आली होती. मात्र अचानक तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. प्रचंड वेदना होऊ लागल्याने रोशनी रस्त्यावर पडली मात्र आजूबाजूला कोणीही मदतीसाठी धाऊन गेले नाही. त्याचवेळेस आपल्या अमृतनगर येथील कार्यालयात बसलेल्या मर्जिया शानू पठाण यांना ही माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मित्तल रोड गाठले. तिथे पोहचताच मर्जिया पठाण यांनी आधी रोशनी यांना धीर दिला. स्वतः गाडीमध्ये उचलून बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेदनेमुळे रोशनी हिस गाडीत बसणे अशक्य होत असल्याने एक रिक्षा थांबवून त्यातून रोशनी हिला कौसा रूग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांना पाचारण करून रोशनी हिचे बाळंतपण केले. रोशनी हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला असून मुलीचे वडील कस्तूर यांच्या विनंतीवरून मर्जिया यांनी मुलाचे शिवा असे नामकरण केले आहे. दरम्यान, डोक्यावर सूर्य आग ओकत असल्याने आणखी उशीर झाला असता तर गर्भवती महिला आणि तिच्या बाळाच्या जीवावर बेतले असते. मात्र, मर्जिया पठाण यांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळेच रोशनी आणि तिच्या मुलाचे प्राण वाचले असे डाॅक्टरांनी सांगितले.  

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कॅन्सरग्रस्तांना अन्नदान वाटप

मुंबई, : –  मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण मध्य-मुंबई जिल्हाध्यक्ष समाजरत्न डॉ. सिद्धार्थदादा टी.कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त चांदिवली तालुकाध्यक्ष सुरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली टाटा कॅन्सर हॉस्पिटलजवळ अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. याशिवाय कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला, यावेळी चांदिवली राष्ट्रवादी परिवाराचे प्रशांत बारामती (जिल्हाप्रमुख सामाजिक विभाग), अस्लम शेख जिल्हा सचिव, संतोष गवळी (162 प्रभाग अध्यक्ष) डॉ. ) सचिन वाकोडे (तालुका अध्यक्ष सामाजिक), आलोक राय युवक समाजसेवक आणि आनंद मार्ग युनिव्हर्सल रिलीफ टीम च्या दीदी सहित मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 00000

सरकारच्या विरोधात

 महाविकास आघाडीचा पंचनामा मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीकडून महायुती सरकार विरोधात गद्दारांचा पंचनामा करणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.  महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (श प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया धुळे, संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर घणाघाती प्रहार केला. पटोले म्हणाले की, गद्दारांचा पंचनामा आम्ही केला आहे. अडीच वर्षात यांनी कसं सरकार चालवलं याचा पंचनामा यात करण्यात आला आहे. ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तेचं लोक आज सत्तेत आहेत. त्याच लोकांच्या भ्रष्टाचारामुळे छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही या घटनेची माफी मागितली नाही. काल तर बाबा सिद्धकी यांची हत्या करण्यात आली. सत्ता पक्षातील नेते देखील सुरक्षित नाहीत. स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे.असे पटोले म्हणाले. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हत्या प्रकरणाची अद्याप योग्य माहिती आमच्याकडे आलेली नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे तपासावर परिणाम होईल, असं काही बोलणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील जनता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभेच्या निकाल काहींनी मान्य केला नाही, तेव्हा लोकांनी बदल हवा आहे हे सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांचा पंचनाम आम्ही केला आहे. महाराष्ट्राबरोबर यांनी गद्दारी केली आहे. येत्या दीड महिन्यात हे सरकार घालवायला हवं. मुंबई हे असं शहर आहे तिथं २ पोलिस कमिशनर आहेत. जे जे लाडके आहेत त्यांना कमिशनर करा. पाच कमिशनर करा. माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी गद्दाराना सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढा आणि लोकांसाठी वापरा. ही जबाबदारी गृहमंत्री यांची आहे. मोठं मोठे सध्या होर्डिंग लावतात. देवेंद्रजी म्हणतात उद्या गाडी खाली कुत्र आल तरी म्हणाल गृहमंत्री जबाबदार आहे. आता यावर त्यांचं काय उत्तर आहे. सध्या केवळ कलाकार सोबत घेऊन मोठ्या जाहिराती सरकार करत आहे असे ठाकरे म्हणाले.

 महायुतीच्या माध्यमातून शहापूरची विकसित शहराकडे वाटचाल

  माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शहापूर शहराची विकसित शहराकडे वाटचाल सुरू आहे. शहापूरात नागरी सुविधांसाठी विविध कामे सुरू असून, भविष्यात एक सुनियोजित शहर म्हणून शहापूरचा नावलौकिक होईल, असा विश्वास माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून शहापूरमध्ये सुमारे साडेआठ कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ७ मधील जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र, प्रभाग क्र. ११ मधील नगरपंचायत कार्यालयासमोर उद्यान, तहसील व पोलिस ठाण्याच्या आवारात हायमास्ट व स्वच्छतागृह, सोनार आळी येथे कॉंक्रिट रस्ता, भेंडी आळी येथे कॉंक्रिट रस्ता, प्रभाग क्र. १४ मधील डोंबिवली नागरी बॅंकेनजीक ओपन स्पेस वॉल कंपाऊंड बांधणे, जुना आग्रा रोड केणे आळी ते भारंगी नदीपर्यंत गटारांचे कॉंक्रिटीकरण, हायमास्ट बसविणे आदी कामांचे कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनक, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक नार्वेकर, नगरसेविका मिताली भोपतराव, योगेश महाजन, विनोद कदम, कामिनी सावंत, माजी नगरसेविका वैदेही नार्वेकर आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहापूर येथील पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी गायकवाड कुटुंबांने दानपत्रान्वये नगरपंचायतीला जमीन दिल्याबद्दल गायकवाड कुटुंबियांचे कपिल पाटील यांनी आभार मानले. तसेच या जलकुंभामुळे शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शहापूरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी मिळेल, असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला. 0000

‘जिथे नाही सन्मान तिथे  करणार नाही मतदान’

रमेश औताडे मुंबई : लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मतदानाचे परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे. मात्र जिथे मतदारांचा सन्मान होत नाही तिथे आम्ही मतदानच करणार नाही असा इशारा आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा चे  राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिला. नागपूर येथे धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित मतदार परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. मतदारांनी आपल्या मतांचा अधिकार जर, जात, धर्म, परंपरागत  पक्ष,घराणेशाही यात अडकवून ठेवला तर लोकशाहीला ते घातक ठरते असे बागडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिक बांगर, प्रमुख पाहुणे रेखा राणगावकर होत्या. देवेंद्र बागडे, उद्धव तायडे, पौर्णिमा पाईकराव, डॉ सुधा जनबंधू, विकास काटे, नामदेवराव निकोसे, न्यायाधीश सुरेश घाटे, उत्कर्षा थुल, सुनिता गायकवाड,  दिलिप कदम, इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरातत्व अधिक्षक नामदेवराव निकोसे यांनी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संघर्ष निधी म्हणून पांच लाख एकावन्न हजार रुपये देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यावेळी अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे असे नारायण बागडे यांनी सांगितले. वैशाली तभाने यांनी मान्यवरांचे स्वागत, सूत्रसंचालन प्रा.रमेश, आभार प्रदर्शन मामासाहेब मेश्राम यांनी केले.

आईच्या कुशीतून अपहरण झालेला ‘दादा’ सापडला..!

त्रिकूटाला अटक ठाणे: आईच्या कुशीत झोपी गेलेल्या पाच महिन्यांच्या ‘दादा’चे अपहरण करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांनी अटक करत, बाळाची सुखरूप सुटका केली, ठाणेनगर पोलिसांनी जेमतेम चार तासात गुन्हा उघडकीस आणला, अटक केलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश असून, यातील जावेद अजमत अली न्हावी याच्याविरोधात ठाणेनगर, राबोडी आणि कळवा या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली अपहृत बाळाला ताब्यात दिल्यावर मातेचे डोळे पाणावले राबोडी परिसरातील आवेद अजमत अली न्हावी (३५), सुरेखा राजेश खंडागळे (३४) आणि क्रिक नाका येथील जयश्री याकूब नाईक (४५) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाने नात आहे. ठाण्यातील जेल तलावजवळील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या वनिता पवार (३५) या शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पाच महिन्यांच्या ‘दादा’ला कुशीत घेऊन झोपी गेल्या, थोड्या वेळानंतर त्यांना आग आली तर कुशीत बाळ नसल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट ठाणेनगर पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, ठाणेनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पथक स्थापन करून त्या बाळाला शोधण्यास सुरुवात झाली. आई गहिवरली… पोलिस तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी निद्धी हॉलच्या समोरील ब्रिजच्या खाली बाळाला घेऊन गेले व त्याची आई वनिता पवार हिच्या हातात सुखरूप सोपवले, बाळाला पाहून ती गहिवरली. पोलिसांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळली. पोलिसांना काहीतरी बक्षीरा। द्यावं या भावनेनी तिने दमलेल्या पोलिसांसाठी कोल्डिंक्स तरी मागवा, असे पती राकेश यांना सांगितले. नौपाडा विभागाच्या सहायक आयुक्त प्रिया ढाकणे यांनी कोल्ड्रिंक्सला नम्रपणे नकार देत ‘बाळाला जपा’, असा सल्ला दिला. अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस • सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बाळाला नेणाऱ्यांची माहिती कळल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करत बाळाची सुटका केली. अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस आणला. हे त्रिकूट बाळाचे अपहरण करून ते कोणाला विकणार होते का? यापूर्वी त्यांच्या अशाप्रकारे गुन्हे केले आहेत का? यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले, ठाणेनगर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक खेडकर, हेडकॉन्स्टेबल विक्रम शिंदे, गांगुर्डे, पो. हवालदार तानाजी अंबुरे, सागर पाटील, प्रकाश जाधव, पंकज दाभाडे, संदीप चव्हाण यांनी कामगिरी केली. पोलिस उपनिरीक्षक भारत मास्कड तपास करत आहेत.

‘कामाची गुणवत्ता पाहिल्यावर त्यासाठी निधी दिल्याचे समाधान वाटते’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण संपन्न अनिल ठाणेकर ठाणे : महापालिका क्षेत्रात विविध कामासाठी निधी दिला आहे. ती कामे प्रत्यक्षात झालेली पाहून, त्यांची गुणवत्ता पाहून त्यासाठी निधी दिल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी, आनंद योग कुटीर आणि हँगिंग गार्डन, रघुनाथ नगर, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचे विस्तारीकरण, किसन नगर, स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक रुग्णालय, नळपाडा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (०५ ठिकाणी), नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर (०६ ठिकाणी), मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन, हाजुरी, धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिका, कशिश पार्क,  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट, उपवन, ग्रीन यात्रेच्या मदतीने झालेलं जेल तलाव पुनरुज्जीवन, सेंट्रल मैदान, ओएनजीसीकडून तलाव साफसफाईसाठी मिळालेल्या यांत्रिक बोटी, राम मंदिर तलाव आणि मोघरपाडा तलाव येथे संगीतमय कारंजे या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, रहेजा जवळील उद्यानाचे भूमिपूजनही करण्यात आले. मुख्यमंत्री झाल्यावर आणि त्याआधी नगरविकास मंत्री असताना धोरणात बदल करून कायद्यात सुधारणा करून योजनांचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. योजनांचा फायदा नागरिकांना मिळावा यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच कोटी लोकांपर्यंत लाभ पोहोचवला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.याप्रसंगी व्यासपीठावर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, परिशा सरनाईक, गुरुमुख सिंग, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा,  उपायुक्त जी. जी. गोदेपूरे आणि उमेश बिरारी आदी उपस्थित होते. मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या विस्तारामुळे आणखी ८० रुग्ण खाटा उपलब्ध झाल्या आहेत. या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा परिसरातील नागरिकांना चांगला फायदा होतो आहे. अशा प्रकारचे कॅशलेस रुग्णालय प्रत्येक क्लस्टर प्रकल्पात असावे असे निर्देश आपण आयुक्तांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.मुख्यमंत्री शिंदे यांनी मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन येथे ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधला. एनयूएचएम व क्षयरोग विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात येते. त्यांना वेतनही शासनाकडून देण्यात येते. ती रक्कम कमी असल्याने त्यांना देय असलेल्या वेतनामध्ये १५ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता ठाणे महापालिका देणार असल्याची घोषणा याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणात २००१ मध्ये विस्थापित झालेल्या २९ कुटुंबियांच्या जागेचे स्वप्न साकार होणार आहे. त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, सदनिका देणार असल्याची पत्रे प्रदान करण्यात आली. तसेच, ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत स्टेट बँकेच्या सीएसआर फंडातून शाळा क्रमांक ९ आणि ६५ मधील विद्यार्थिनींना सायकल देण्यात आल्या. त्याचे वाटपही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर, शाळा क्रमांक १८ ला पाच लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली. ठाणे महापालिकेने रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी, ठाणे नॉर्थ आणि ठाणे ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोटरी नॉलेज एन्हान्समेंट अँड फॅकल्टी सेंटर’च्या माध्यमातून राबविण्यात येणारा ‘स्टुडंट डेव्हलपमेंट अँड हॅपिनेस इंडेक्स’ कार्यक्रम राबविण्यासाठी ठाणे पालिका शाळा क्र. १९ मध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. तसेच पालिका शाळेतील मुलांसाठी व्हर्चुअल रेडीओ सेंटरच्या माध्यमातून दोन व्हर्चुअल स्टुडीओ देखील शाळा क्र. १९ येथे रोटरीच्या सहकार्याने पुन्हा  सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे व व्हर्चुअल रेडीओ स्टुडीओचे उदघाटनही करण्यात आले. प्रवेश लॉबी, ध्यान कक्ष, स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह व चेंजिंग रुम, स्टेज, टेरेस हँगिंग गार्डन आदी सेवासुविधा उपलब्ध आहेत. मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयामध्ये विविध उपचारपध्दती मोफत उपलब्ध आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अत्याधुनिक यंत्रणा या ठिकाणी नव्याने बसविण्यात आले असून, जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालयाचा  विस्तार  करण्यात आला आहे. ८० रुग्ण खाटा वाढून आता एकूण १७० रुग्ण खाटा झाल्या आहेत. हे १०० खाटांचे रुग्णालय, घोडबंदर रोड, नळपाडा येथे नव्याने  उभारले  असून,  या  ठिकाणी  अद्ययावत  वैद्यकीय  सेवा  सुविधा  उपलब्ध  करुन  देण्यात  येणार  आहेत.  यामध्ये  स्वागत  कक्ष,  लॉबी,  ओपीडी,  युजीएस रुम,  पॅथॉलॉजी लॅब,  सीटी स्कॅन,  प्रतिक्षा विभाग,  सर्वसाधारण वॉर्ड,  विलगीकरण कक्ष,  व्यवस्थापक कक्ष,  कर्मचारी रुम,  शस्त्रक्रिया कक्ष,  आयसीयु,  कॅथलॅब  आदी  सुविधा  उपलब्ध असणार आहेत. गोरगरीब नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात यापूर्वी विविध ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. आता येऊर, गणेशनगर, पानखंडा, पातलीपाडा, कोलशेत या ठिकाणी नव्याने आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे.आपला दवाखान्याच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रात नेहरु नगर, साबे गाव, दातिवली, खिडकाळी, कोपरी, राऊत गार्डन येथे नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करुन पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येतील. येथे बाह्यरुग्ण सेवा व औषधोपचार, चाचण्या, गर्भवती मातांची तपासणी, समुपदेशन, लसीकरण, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन ई-सेवा असणार आहे. हाजुरी येथे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे  ज्येष्ठांचे नंदनवन या इमारतीचे ४५४० चौ.फुटांचे बांधकाम आहे. या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह, व्यायामशाळा, चेजिंग रुम, लॉकर्स रुम, योगा सेंटर इंडोअर गेम्स, वाचनालय, प्रसाधन गृह आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, ऍम्पिथिएटर, कॉन्फरस हॉल, संगणक, डिजीटल लायब्ररी, स्टोअर रुम उपलब्ध आहे.  या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांचा संग्रह तसेच विविध भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत. ६०५४ चौ.फुट जागेत हे ग्रंथालय आहे.बनारस घाटाच्या धर्तीवर घाटाची निर्मिती, या ठिकाणी बुरुज उभारुन, कारंजे, सुशोभिकरण, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  घाटाची लांबी १४० मीटर आहे. जेल तलावाच्या संवर्धनाचे काम मे.ग्रीन यात्रा या संस्थेच्या माध्यमातून मार्च ते जून २०२४ या कालावधीत करण्यात आले.  या तलावाचे क्षेत्रफळ ६.८१ एकर असून, यामधून ३० हजार मेट्रीक गाळ काढला आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने तलावाचा मध्यभागी लहान बेट तयार केले. पाण्याची गुणवत्ता सुधारुन याची खोली वाढण्यासही मदत झाली आहे. ठाण्यातील तलावांची  अत्याधुनिक  पध्दतीने  साफसफाई  व्हावी  यासाठी  मे. ओएनजीसी  यांच्यातर्फे ०६ रोबोटीक  बोट उपलब्ध  करुन देण्यात आलेल्या असून, या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येईल. एकावेळी २०० किलो इतका कचरा गोळा करण्याची क्षमता आहे. ६ फुट लांब व ३ फुट रुंद असलेल्या बोट बॅटरीवर चालणार  असून, चार्जिंग बॅटरी बसविण्यात आलेली आहे. १० ते १५  कि.मी. पर्यंतचा कचरा गोळा करण्याची क्षमता आहे. कासारवडवली येथील राम मंदिर तलाव आणि मोघरपाडा तलाव येथे सुशोभिकरण करुन या ठिकाणी संगीतमय कारंजे उभारण्यात आले आहेत.

ठामपा कर्मचाऱ्यांना २४,००० रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा अनिल ठाणेकर ठाणे : महापालिका कर्मचाऱ्यांना २५,००० रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद योग कुटिर येथे केली. याप्रसंगी व्यासपीठावर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे आणि उमेश बिरारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेने सन  २०२२-२३साठी २१५०० रुपये  इतके सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात २५०० हजार रूपयांची वाढ करून २४००० देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.