Category: होम

मतदान बंद झाल्यानंतर मतटक्केवारीत वाढ होते कशी?

जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न ठाणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते. परंतु मतमोजणीत तसे झाले नाही, असे सांगत राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे. तसेच मतदान बंद झाल्यानंतर म्हणजेच सायंकाळी ६ ते ११ यावेळेत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी आणि वाढीव मतदान येते कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी कळवा येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१४ पासूनच मी मतदान यंत्राच्या धोक्याबाबत बोलत आहे. आताही आमच्या लोकांना मी हेच सांगत होतो की, छोटी राज्य देतील आणि मोठी राज्य ताब्यात घेतील. त्याकडे आमच्या लोकांचे दुर्लक्ष झाल्याचे आव्हाड म्हणाले. मतदान यंत्र हे मानव निर्मित असल्यामुळे त्यात बदल करणे शक्य आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये मतदानाचा आकडा लगेचच उपलब्ध होतो. तरीही मतदानाची आकडेवारी देण्यास उशीर कसा काय होतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजेच सांयकाळी ६ ते रात्री ११ या कालावधीत राज्यात तब्बल ७६ लाख मते वाढली असल्याचा दावाही त्यांनी केली. जास्तीत जास्त दिड ते दोन टक्के मतदान सहा नंतर वाढू शकते. मात्र काही जिल्ह्यात तब्बल १० टक्यापर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदान बंद झाल्यानंतरही म्हणजेच सांयकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी, वाढीव मतदान येते कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते जवळपास एकसारखीच मिळाली असून एखाद्या पॅर्टनशिवाय हे शक्यच नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. नांदेडमध्ये लोकसभेची जागा आम्ही जिंकतो आणि विधानसभेच्या सहा जागांवर पराभव होतो. असे वेगळे निकाल एकाच जिल्ह्यात कसे लागू शकतात, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणे अपेक्षित होते. परंतु मतमोजणीत तसे झाले नाही. प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणुकींचे निकाल द्यायचे असतील तर संविधान आणि लोकशाहीचा काय उपयोग आहे. अशाने लोकशाही संपुष्टात येईल आणि भारताचा रशिया होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. उतरत्या वयात शरद पवार यांना आत्मक्लेश होईल अशा पद्धतीने एकटे पाडले जात आहे. मातोश्रीबाबतही तीच रणनीती आखली जात असल्याचे ते म्हणाले.

नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद

गळणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात पाणी पुरवठ्यातील समस्यांवरून निवडणुकीआधी बराच गदारोळ उडाल्यामुळे आचारसंहिता संपताच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पाणी वितरणाशी संबंधित विविध कामे शनिवारी करण्यात येणार असून त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नाशिक स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपा पाणी पुरवठा वितरण विभाग यांच्यातर्फे विविध जलशुध्दीकरण केंद्र आणि सहायक केंद्रांवर प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे यासह इतर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रात उच्चदाब खांब स्थलांतरीत करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात प्रवाह मीटर बसविणे, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे, शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या शिवाय सहायक जलशुध्दीकरण केंद्रात याच स्वरुपाची कामे केली जातील. सातपूर विभागातील मुख्य वाहिनीवर व्हॉल्व्ह आणि पाणी मापक मीटर बसविणे, सातपूर प्रभाग क्रमांक नऊमधील कार्बन नाका येथील वाहिनीची गळती थांबविणे, प्रभाग १० मधील अशोकनगर येथे गळती लागलेल्या ९०० मिलिमीटर वाहिनीची दुरुस्ती, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील जलवाहिनीची दुरुस्ती, पाथर्डी फाटा येथील व्हॉल्व्ह दुरुस्ती, कशिश हॉटेलजवळील जलवाहिनीवरील व्हॉल्व्हची गळती बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंदनगर कुंभाच्या वाहिनीवरील गळती बंद करणे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत वासन नगर, राणेनगर, पाथर्डी फाटा येथील जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसविणे व तत्सम कामे केली जातील. नाशिकरोड विभागातील उपनगर येथील संजय गांधी नगर वाहिनीतील गळती आणि पवारवाडी जलकुंभ भरणाऱ्या वाहिनीची जेलरोड सिग्नलजवळ गळती बंद करण्याची कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन व्यापक स्वरुपातील कामांमुळे शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत शहरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाहूी. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. शनिवारी दिवसभर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 000

शहापूरमध्ये बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील गावांमध्ये सौरकुंपण,

शहापूर वनविभागाचा पथदर्शी प्रकल्प कल्याण : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. बिबट्याचा अधिकप्रमाणात वावर असलेल्या एकांतांंमधील घरांमधील कुटुंबीय, पशुधन यांना बिबट्यापासून धोका आहे. अशा संवेदनशील एकांतात असलेल्या शेतशिवार, माळरानांवरील घरांभोवती सौरकुंपण लावण्याचा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव शहापूर वनविभागाने तयार केला आहे. शासन मंजुरीच्या आवश्यक त्या पूर्तता झाल्यावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, माळेशज, कसारा घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. जंगलात लाकूडफाटा, वनोपज गोळा करणे, शेतकरी, गायी, शेळ्यांच्या गोरक्षकांवर यापूर्वी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्या आणि मानवी वस्तीमधील हा संघर्ष वाढत चालला आहे. भक्ष्य शोधण्यासाठी अनेक वेळा रात्रीच्या वेळेत बिबटे गाव हद्दीतील गोठ्यांमध्ये येऊन पशुधन, भटक्या श्वानांवर हल्ले करतात. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी मनुष्य, पशुधन हानी रोखण्यासाठी शहापूर वन विभागाने शहापूर तालुक्यातील बिबट्यांचा वावर, चलत मार्ग असलेल्या काही गावांंमधील एकांतात असलेली घरे निश्चित केली आहेत. बिबट्याचा वावरामुळे या घरांचा परिसर संवेदनशील म्हणून जाहीर केला आहे. अशा एकांत वस्तीत बिबट्याने शिरकाव केला तर त्याला वेळीच सुरक्षितपणे, कोणत्याही प्रकारचा त्रास न होता अटकाव व्हावा या उद्देशातून वन विभागाने संवेदनशील घरांंभोवती सौरकुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वन विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. सौरकुंपण प्रस्ताव सौरकुंपण प्रस्तावाप्रमाणे एक एकर शेती परिसरात घर, गुरांचा गोठा असेल तर त्याला संरक्षित करण्यासाठी ३० हजार रुपये खर्च येतो. या निधीतील ७५ टक्के रक्कम शासकीय अनुदानातून शेतकऱ्याला दिली जाईल. उर्वरित २५ टक्के रक्कम शेतकऱ्याने स्वता उभारून हा प्रकल्प आकाराला आणायचा आहे. या प्रकल्पासाठी देखभाल दुरुस्तीसाठी नियमितचा खर्चही असणार नाही. बिबट्याचा वावर असलेल्या एकांतामधील घर, गोठ्याला कुंपण घातले जाईल. त्या कुंपणाच्या आतील भागात सौरपट्ट्या बसविल्या जातील. सौरपट्यांमधून तयार होणारी सौर वीज विजेरीमधून (बॅटरी) कुंपणात सोडण्यात येईल. अचानक दिवसा, रात्री अन्य वन्यजीव किंवा बिबट्या एकांतामधील घर परिसरात भक्ष्यासाठी आला. त्याचा स्पर्श सौरकुंपणाला झाला की वन्यजीव किंवा बिबट्याला शाॅक बसेल आणि त्याचवेळी सौर यंत्रणेवर चालणारा भोंगा वाजण्यास सुरुवात होईल. शाॅक बसल्याने बिबट्या पळून जाईल आणि भोंग्यामुळे शेतकरी जागा होईल. या प्रकल्पामुळे बिबट्या पण सुरक्षित आणि शेतकऱ्याचे कुटुंब, पशुधन एकांतात असले तरी सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे, असे वनाधिकाऱ्याने सांगितले. या पथदर्शी प्रकल्पामुळे बिबट्या किंवा वन्यजीवांस कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही. त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होणार नाही याची विशेष काळजी या प्रकल्पात घेण्यात आली आहे. अलीकडे एकांतामधील घर परिसरात लोखंडी जाळीचे कुंपण करण्यासाठी दोन ते अडीच लाख खर्च येतो. त्याच जागी सौरउर्जेच्या माध्यमातून सौर कुंंपण उभारण्याचा प्रयत्न केला तर शासकीय आर्थिक साहाय्याने तीस हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे बिबट्या, मानवातील संघर्ष थांबविण्यासाठी राबविण्यात येणारा शहापूर वनविभागाचा हा प्रस्ताव आदर्शवत ठरण्याची शक्यता आहे.  

डोंबिवलीत कोपरमधील बेकायदा बांधकामावर कारवाई

डोंबिवली : येथील पश्चिमेतील कोपर गाव हद्दीतील चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील बाजूस दोन महिन्यांपासून काही बांधकामधारक कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता, रस्ता अडवून एका बेकायदा बांधकामाची उभारणी करत होते. यासंदर्भात तक्रारदाराने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यापर्यंत तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशावरून बुधवारपासून ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सुरू केली. डोंबिवली पश्चिमेत चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागे अधिकृत कृष्णा संकुलाच्या बाजुला तीन महिन्यांपासून बांधकामधारकांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता, एका बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली होती. या बेकायदा इमारतीच्या तक्रारी तक्रारदार विनोद जोशी यांनी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधुत तावडे, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केल्या होत्या. आयुक्त डॉ. जाखड यांनी विहित कार्यवाही करून हे बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी या बांधकामाच्या विकासकांना तातडीने बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आणि अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त झाल्याने या बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिका अधिकाऱ्यांना शक्य झाले नव्हते. पालिकेचा स्थगिती आदेश असताना बांधकामधारकांनी इमारतीचे काम सुरूच ठेवले असल्याची माहिती तक्रारदार जोशी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिली होती. निवडणूक संपताच तक्रारदार जोशी यांनी पुन्हा अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त तावडे यांची भेट घेऊन कोपर येथील बेकायदा इमारतीवर कारवाईची मागणी केली. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी तातडीने कोपरचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. आयुक्त, उपायुक्त तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त सावंत यांनी बुधवारपासून तळ अधिक एक मजल्याची नव्याने उभी राहत असलेली बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले. अतिक्रमण, फेरीवाला नियंत्रण पथकाचे कामगार, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही सुरू करण्यात आली. बुधवारी या बेकायदा इमारतीचा काही भाग तोडल्यानंतर गुरुवारीही इमारतीचा उर्वरित भाग तोडण्याची मोहीम साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सुरू ठेवली आहे. या इमारतीवर थातुरमातूर कारवाई न करता, ही इमारत भुईसपाट करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार जोशी यांनी केली आहे. कोट कोपर येथील चरू बामा म्हात्रे शाळेमागील नव्याने उभी राहत असलेली एक बेकायदा इमारत तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू केले आहे. या बांधकामाला यापूर्वीच स्थगितीचे आदेश दिले होते. आयुक्त डॉ. जाखड, उपायुक्त तावडे यांच्या आदेशावरून ही इमारत भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.

कल्याण डोंबिवली पालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर देयकांचा भरणा करता यावा म्हणून पालिका प्रशासनाने १ डिसेंबरपासून पालिकेची दहा प्रभाग हद्दीतील नागरी सुविधा केंद्रे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेसारखी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका हद्दीतील बहुतांशी करदाता हा नोकरदार, व्यावसायिक आहे. त्यांना कामाच्या दिवशी पालिकेत येऊन मालमत्ता कर भरता येत नाही. त्यामुळे नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक करदात्यांचा विचार करून प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके मालमत्ता करधारकांना पालिकेकडून वितरित करण्यात आली आहेत. मालमत्ता कराची चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीची कराची रक्कम ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी पालिकेत भरल्यास चार टक्के आणि ऑनलाईन भरणा केल्यास दोन टक्के सवलत देण्याचे पालिकेने यापूर्वीच जाहीर केले आहे. ज्या मालमत्ता करधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेले नाही. त्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. कर भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर पालिकेकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे. मालमत्ता कराच्या थकित रकमेवर दोन टक्के रकमेची दंडात्मक कारवाई करणे, इमारत, चाळी, आस्थापनेला असलेल्या नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. एवढ्या कारवाया करूनही थकबाकीदार मालमत्ता कर भरणा करत नसेल तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. विहित प्रक्रिया पार पाडून त्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. या दंडात्मक कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी मुदतपूर्व मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. मालमत्ता कराच्या देयकावरील क्युआर कोड स्कॅन करून, पालिकेच्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही नागरिक मालमत्ता कर भरणा करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वेतन न मिळाल्याने शासकीय सेवेतील कंत्राटी कामगारांची उपासमार – जगदीश खैरालिया

अनिल ठाणेकर ठाणे : प्रादेशिक मनोरूग्णालय, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्यापही न मिळाल्याने कामगारांची आर्थिक कोंडी होऊन कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना दरमहा सात तारखेच्या आत किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेले असतांनाही रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार मे. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि, पुणे कामगारांची पिळवणूक करीत आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे  सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जेटिंग गाड्यांवरील सफाई कामगारांना मे. एक.एम रामचंदानी, उल्हासनगर यांनी ही अद्यापही वेतन अदा केले नाही. इतकेच नव्हे तर या ठेकेदाराने कामगारांच्या वेतनातून दरमहा बेकायदेशीर कपात करून कामगारांची फसवणूक केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटागाडी प्रकल्पातील ठेकेदार मे. सेक्यूर वन सेक्युरिटी सर्व्हिसेस यांनी देखील सफाई कामगार आणि वाहनचालक यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा केले नाही. हे सर्व ठेकेदार बिलाची रक्कम मिळाली नसल्याचे कारण पुढे करून कामगारांना दरमहा वेळेवर वेतन अदा करत नाही. खरं तर वेतन प्रदान अधिनियम नुसार ठेकेदाराने कामगारांना सात तारखेच्या आत वेतन अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. करारनामा करतांना किमान दोन तीन महिने वेतन अदा करण्याची ठेकेदाराची क्षमता असल्याची अट असतांनाही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने सर्व कायदे गुंडाळून कंत्राटी कामगारांची पिळवणूक सर्रासपणे सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर देखील ठाणे मनोरूग्णालय प्रशासन यांनी कामगारांना वेतन अदा केले नाही. कंत्राटी कामगार कायद्याच्या कलम २१ (४) नुसार ठेकेदार यांनी कामगारांना वेळेत वेतन अदा केले नाही तर मूळ मालकाने कामगारांना वेळेत वेतन अदा करण्याची जबाबदारी बंधनकारक करण्यात आली आहे. कामगार उप आयुक्त ठाणे यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवली जात आहे. ठेकेदारांना राजाश्रय असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदार जुमानत नसल्याचा आरोप श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केला आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत भारतीय संविधानाचा मसुदा सादर करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणात सांगितले होते की, आज समाजात सामाजिक, आर्थिक विषमतेची दरी प्रचंड असल्याने शोषण ही प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे भविष्यात या संविधानातील मुल्यांची विधायिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका कशी अंमलबजावणी करणार यावर संविधानाचे महत्व ठरेल. या संवैधानिक मुल्यांचे स्मरण राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा करेल का असा सवालही श्रमिक जनता संघाचे  सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी उपस्थित केला आहे.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच आदर्श  – उमेश पाटील

अनिल ठाणेकर ठाणे : समाजवादी नेते दशरथ पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच आदर्श मी राजकारणात वावरताना ठेवला आहे, असे मत माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी आपल्या वाढदिवशी बोलताना व्यक्त केले. उमेश पाटील यांचा वाढदिवस, फटाक्यांच्या आतिषबाजीत  ढोलताशांच्या गजरात, भावभक्तिगीतांच्या वातावरणात आणि परिसरातील रहिवाशांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या माताभगिनिंनी व लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीत, केक कापून, अपूर्व उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेना उपनेते दशरथ पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, विभागप्रमुख शाम पाटील, विजय शिंदे, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक मनोहर साळवी, मनोहर डुंबरे, प्रकाश बर्डे, पवन कदम, रविंद्र पाटील, दिनेश कांबळे, मालती पाटील  प्रमिला केणी, मिनल संख्ये, राधिका फाटक, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, अपोलो जिमचे कमलाकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, काॅग्रेसचे राजू शेट्टी, सम्राजसेवक राकेश पाटील, रचना पाटील, जयदिप पाटील, सुनील गौरी तसेच पारसिक नगर, सह्याद्री सोसायटी व खारेगाव परिसरातील सोसायटीतील अध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी व सभासद तसेच रहिवाशी  ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी व लाडक्या बहिणींनी उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशिर्वाद देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांचे  प्रशिक्षण

ठाणे : जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने काल जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. NSDL (Protean) कार्यालयात सहाय्यक प्रबंधक या पदावर कार्यरत असणारे सुर्यकांत तरे यांनी उपस्थित सर्वांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्यालय, ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील निवृत्तीवेतन योजना संदर्भांतील  कामकाज हाताळणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यावरील जमा रक्कमेतून गुंतवणूक करण्याबाबत विविध पर्यांय, अंशतः रक्कम आहारीत करणे, सेवा निवृत्ती वेतन योजनेचे विविध पर्याय, कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याचे कुटुंब निवृत्ती वेतन, राजीनामा, रुग्णतः निवृत्ती वेतन या सर्व योजनेबाबत सखोल मार्गदर्शन सुर्यकांत तरे यांनी केले.परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ची योग्य पद्ध तीने अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तसेच अनेक शंकाबाबत अधिकारी-कर्मचारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

शहापूर विधानसभा राष्ट्रवादी उमेदवार दौलत दरोडा यांच्यासाठी वाडा तालुक्यातील 3 हजार 946 मतांची आघाडी ठरली निर्णायक

जयेश पाटील, पालघर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दौलत दरोडा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यांच्यात चुरशीचीची लढत पाहायला मिळाली. यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दौलत दरोडा हे 1671 मतांनी निवडून आले आहेत. दौलत दरोडा यांच्या विजयात वाडा तालुक्यात येणाऱ्या 49 बुथवर मिळालेल्या 3 हजार 946 मतांची आघाडी निर्णायक ठरली असून या मतांच्या निर्णायक आघाडीने दौलत दरोडा यांना तारले आहे. लोकसभेतील आघाडी टिकवण्यात निलेश सांबरेना अपयश तर लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेतलेल्या निलेश सांबरे यांच्या रंजना उघडा या उमेदवार तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या असून त्यांना वाडा तालुक्यातील एकाही बुथवर मतांची आघाडी घेता आली नाही तर पांडुरंग बरोबर यांना फक्त 9 बुथवर किरकोळ आघाडी घेता आली आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 329 बूथ असून यात वाडा तालुक्यातील 49 बुथचाही समावेश आहे. शहापूर विधानसभेत येणाऱ्या वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटात अजित दादांचे राष्ट्रवादीच्या या विद्यमान सदस्य आहेत तर याच गटातील गारगाव गणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पूनम पथवा या पंचायत समिती सदस्य तर दुसऱ्या डाहे गणात रघुनाथ माळी हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य आहेत. मोज गटात शिवसेना (उबाठा)चे अरुण ठाकरे तर मोज पंचायत समिती गणात शिवसेना (शिंदे) चे सागर ठाकरे हे पंचायत समिती सदस्य आहेत. अबिटघर जिल्हा परिषद गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे भक्ती वलटे या जिल्हा परिषद सदस्य असून अभिर गणात अजित दादांच्या राष्ट्रवादीचे जगदीश पाटील हे विद्यमान सभापती व पंचायत समिती सदस्य आहेत. तर कुडुस पंचायत समिती गणातील कोंढले ग्रामपंचायतमधील म्हसवल गाव व पाडे शहापूर विधानसभेत जोडलेले आहेत. वाडा तालुक्यातील 49 बूथमधील राजकीय परिस्थिती अशा प्रकारे असताना वाडा तालुक्यातील 49 बुध मध्ये 3 हजार 946 एवढी निर्णायक आघाडी देऊन आमदार दरोडा यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये राष्ट्रवादी (अप) चे उमेदवार दौलत दरोडा यांना 14069 राष्ट्रवादी (शप) चे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना 10153 तर निलेश सांबरे यांच्या उमेदवार रंजना उघडा यांना 4705 एवढी मते मिळाली असून त्या तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या आहेत.   कोट वाडा तालुक्यातील 49 बूथमध्ये येणाऱ्या गाव – पाड्यात आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असून मी स्वतः जिल्हा परिषद सभापती म्हणून केलेल्या कामांचाही आम्हाला फायदा झाला आहे. रोहिणी शेलार सभापती : महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पालघर कोट वाडा तालुक्यातील मताधिक्य मिळविण्यासाठी विरोधकांनी आमच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र वाडा तालुक्यातील 49 बूथ मधील सुज्ञ मतदार राजाने आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांची पोच पावती आमदार दौलत दरोडा यांना दिली आहे. जयेश शेलार अध्यक्ष : राष्ट्रवादी (अजितदादा) वाडा तालुका ००००