Category: होम

इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन (आय.एम. ओ.)  चे जनरल सेक्रेटरी  अर्सेनिओ दोमिंगुझ  यांना सागरीका या मासिकाचा अंक देताना नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर.

बबनदादा पाटील यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

 रुग्णालयाबाहेर गर्दी   पनवेल : राज भंडारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ नेते, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख तथा पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील हे गेले कित्येक दिवस नवीमुंबईतील कोपरखैरणे येथील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल होते. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील कारण्यात आली होती. सोमवारी बबनदादा पाटील यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. दरम्यान रुग्णालयाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना बबनदादा हे कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहिलेले दिसत नव्हते. यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये पनवेल उरण महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली आहे का? अशा चर्चाना उत आले होते. मात्र यामागचे कारण म्हणजे पनवेल उरण महाविकास आघाडीच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील हे रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली. बबनदादा पाटील यांच्यावर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान रुग्णालयाबाहेर दादांच्या असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती. सोमवारी बबनदादा यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचार धुमाळीच्या अंतिम टप्यात बबनदादा हे तंदुरुस्त होऊन प्रचारात येतील असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे. 00000

 कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला

 महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत   कल्याण : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. यात कल्याण पूर्व मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याला कल्याण पूर्व शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाडांसह १९ शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजचा दिवस कल्याण पूर्वसाठी काळा दिवस आहे. ज्याने कल्याण पूर्व बकाल करून ठेवलं आहे. वरिष्ठांना वारंवार या गोष्टी सांगत आलोय. समस्या जैसे थे आहेत. त्यात त्याच्या कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी देऊन कल्याण पूर्वेची दुरावस्था थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सांगत महेश गायकवाड यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. महेश गायकवाड म्हणाले की, कल्याण पूर्व गड हा शिवसेनेला मिळाला आहे. कल्याण पूर्वेच्या शेतकऱ्याच्या जमिनी गणपत गायकवाड यांनी बळकावला होता. हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय त्यांना शिक्षा देईल. परंतु कल्याण पूर्व इथं अनेक समस्या आहेत. कल्याण पूर्वेत शिवसेनेचे संख्याबळ असूनही हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात आमचे नेते अयशस्वी ठरले त्यामुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटून येथील परिस्थिती सांगितली, परंतु तुम्ही युतीचा धर्म पाळा असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. आम्हाला विद्यमान आमदारांनी शिवसैनिकांवर दबाव आणण्याचं काम केले आहे. भ्रष्ट व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबात उमेदवारी दिली त्याला आमचा निषेध आहे असं त्यांनी सांगितले. तसेच आम्ही नगरसेवक, पदाधिकारी यांची आढावा बैठक बोलावली. आमच्यातील जे इच्छुक आहेत ते ठरवू. या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असावा अशी आमची मागणी आहे. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी मोठ्या मताधिक्याने ही जागा निवडून आणू. कल्याण पूर्वमधील जनता आमदारांवर नाराज आहे. ते याठिकाणी बदल करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मागून घ्यावा अशी विनंती आम्ही वरिष्ठांना आजही करतोय असं महेश गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, आमची भूमिका ठरलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही अशा व्यक्तीचं काम करणार नाही ज्याने कल्याण पूर्वचा विकास केलेला नाही. कल्याण पूर्व भकास केलेले आहे. त्यामुळे आमचा या उमेदवारीला विरोध आहे. आम्हाला हा मतदारसंघ मिळावा ही आमची मागणी आहे. मी स्वत: महेश गायकवाड, निलेश शिंदे, विशाल पावशे इथं इच्छुक आहेत. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही येथे उमेदवार निवडून आणू असंही महेश गायकवाड यांनी म्हटलं. 00000

 ठाण्यातील कचराकोंडी दूर होणार, झाडांची सुकलेली पानेही स्वीकारणार

माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन   ठाणे : ठाणे शहरातील कचराकोंडी दूर होणार असून, सध्या घोडबंदर रोडसह शहरात विविध ठिकाणी साचलेला कचरा महापालिकेने उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रहिवाशी सोसायट्यांमधील झाडांची सुकलेल्या पानांचा कचराही स्वीकारण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर आयुक्तांनी घोडबंदर रोड वासियांसह ठाणेकरांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला. घोडबंदर रोड परिसरात सध्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तर सोसायट्यांमधील झाडांची सुकलेली पाने स्वीकारण्यास घंटागाड्यांकडून नकार दिला जात होता. तर पुरेसा पाऊस झाल्यानंतरही भेडसावणाऱ्या पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची आज महापालिका मुख्यालयात भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी झाडांच्या सुकलेल्या पानांचा कचरा उचलण्याबरोबरच सध्या ठिकठिकाणी साचलेला कचरा ताबडतोब उचलणार असल्याचे स्पष्ट केले. डायघर येथील प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो १५ दिवसांपासून बंद होता. त्याची दुरुस्ती पूर्ण झाली असून, साचलेला कचरा उचलण्यासाठी जादा डंपरची व्यवस्था करण्यात येईल. येत्या दिवाळीपूर्वी शहरातील संपूर्ण कचरा उचलला जाईल, अशी ग्वाही आयुक्त राव यांनी दिली. त्याचबरोबर सोसायट्यांच्या बागेतील झाडांची सुकलेली पाने व फांद्या महापालिकेच्या घंटागाड्या स्वीकारतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. चौकट घोडबंदरला आचारसंहितेनंतर ७५ दशलक्ष लिटर पाणी ठाणे महापालिकेला मुंबई महापालिकेने १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर केला आहे. याबाबतची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेनंतर पूर्ण होईल. त्यापैकी ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा घोडबंदर रोडच्या नागरी वसाहतींकडे वळविला जाईल. त्यामुळे पाणीटंचाई दूर होईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.

माथेरानमध्ये मैला उचलण्याची प्रथा आजही कायम

माथेरान : जग एकविसाव्या शतकात जात असताना माथेरान मध्ये ब्रिटिश काळापासून पूर्वापार चालत आलेली मैला उचलण्याची प्रथा आजही कायम असल्याने पर्यटकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पूर्वी पाच दशकांपूर्वी माथेरान…

आचारसंहितेमुळे कल्याण डोंबिवली पालिकेतील लोकशाही दिन रद्द

कल्याण : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका मुख्यालय, डोंबिवलीतील विभागीय मुख्यालयात आयुक्त, उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणारे लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.…

 निखिल बुडजडे यांच्याकडून भव्य शिबिराचे आयोजन

 सरकारी योजना व नागरी सेवा ठाणेकरांच्या दारात पोहोचवण्यासाठी ठाणे : प्रभाग क्र. २२ मधील नागरिकांपर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी, शिधापत्रिकेत आवश्यक बदल करण्यासाठी, नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी व स्थानिकांना अनेक योजनांचे कार्ड वाटण्यासाठी निखिल सतीश बुडजडे यांच्या माध्यमातून भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला दोन हजारांहून अधिक स्थानिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. टेंभीनाका परिसरातील नवीन SRA प्रकल्पात वास्तव्यास आलेल्या नागरिकांना आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. येथील लोकांना सरकारी कार्यालयात चकरा मारून आपल्या चपला झिझवाव्या लागत होत्या. SRA च्या एका इमारतीत जवळपास ३०० लोकवस्ती असल्याने ४ SRA प्रकल्पात सुमारे १२०० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. या स्थानिक नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी निखिल बुडजडे यांनी SRA इमारतीच्या परिसरातच सरकारी योजना व नागरी सेवेच्या शिबिराचं आयोजन केलं. यामुळे येथील रहिवाशांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिधापत्रिकामध्ये नावं वाढवणे, नाव कमी करणे, शिधापत्रिका हरवले किंवा खराब झाले असल्यास त्यांना दुसरी प्रत देण्यासाठी या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच स्थानिकांना मोफत ई-श्रम कार्ड, नवीन मतदान कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान कार्ड सर्वकाही मोफत काढून देण्यात आले. विशेष म्हणजे प्रभाग क्र. २२ मध्ये नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांसाठी आणि नव मतदारांसाठी नवीन मतदान नोंदणी शिबिरही भरविण्यात आले. निखिल बुडजडे यांच्यामुळे या सर्व नागरिकांना येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या कल्याणकारी  शिबिराला प्रभाग क्र. २२ मधील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. लाभार्थी नागरिकांना लवकरच वरील कागदपत्रे देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या शिधारपत्रिकांच्या समस्या असतात तसेच या शिधापत्रिका अपूर्णही असतात. यामुळे एखादा महत्वाचा अर्ज दाखल करताना शिधापत्रिकेची सत्यप्रत देताना अडचण होते. प्रभाग क्र. २२ मधील स्थानिकांची हीच समस्या लक्षात घेऊन निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. चरई, उथळसर आणि खारकर आळी आशा तीन ठिकाणी हे दोन दिवशीय शिबीर भरवण्यात आले होते. निखिल बुडजडे यांनी आयोजित केलेल्या कल्याणकारी योजनांच्या ह्या शिबिराला सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती स्वीप कार्यक्रम – प्रकाश सकपाळ

कर्जत : अशोक गायकवाड मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जन जागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर सभेत नामनिर्देशन पत्रे भरणे बाबत कार्यपद्धती, आचारसंहिता, निवडणूक खर्च याबाबत विस्तृत माहिती देणेत आली. तसेच नामनिर्देशन पत्रे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तहसीलदार यांचे दालन पहिला मजला येथे स्विकारली जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कर्जत प्रकाश संकपाळ यांनी दिली आहे. यावेळी कर्जत पोलिस उपविभागीय अधिकारी डी.डी. टेळे, कर्जत तहसीलदार धनंजय जाधव, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा अपर तहसीलदार कर्जत श्रीमती दुर्गा देवरे व विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण ३६२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीया पार पडण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादी नुसार कर्जत विधानसभा मतदार संघात एकुण ३ लाख १३ हजार ८८४ मतदार भाग घेणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ५७ हजार २१८, स्त्री मतदार १ लाख ५६ हजार ६६१, तर ५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जन जागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश संकपाळ यांनी मतदार संघात आचार संहितेचा भंग होणार नाही या साठी सर्व यंत्रणाच्या बैठका घेऊन करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देशीत केले आहे. निवडणुक प्रक्रिया सुलभ व कायदा, सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता पार पाडण्याच्या दृष्टीने विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे तसेच मतदार संघाच्या सिमांवर चेक पोष्ट ची उभारणी करण्यात आली आहे तसेच २४ टोल फ्री क्रमांक १९५० कार्यान्वीत करण्यात आला आहे. १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून नामनिर्देशनप्रत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय भवन कर्जत येथे स्विकारण्यात येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी कर्जत प्रकाश संकपाळ यांनी कळविले आहे. 000

‘डॉ. योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान गोंधळ, दडपशाही करणार्‍यांचा निषेध’

अनिल ठाणेकर भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय समन्वयक डॉ योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान गोंधळ, दडपशाही करणार्‍यांचा तीव्र  निषेध करत असल्याचे मत भारत जोडो अभियान, ठाणेचे कार्यकर्ते जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, नीता साने, राजेंद्र चव्हाण, मुक्ताश्री वास्तव, निमिष साने, अनिल शाळिग्राम, सुब्रतो भट्टाचार्य, विशाल जाधव, रवी घूले, शुभदा चव्हाण, अजित डफळे, मर्सिया डीकुन्हा, हुकुमचंद शिरसोदे,हर्षलता कदम, मीनल उत्तूरकर आणि अजय भोसले यांनी व्यक्त केले आहे. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विदर्भात अकोला येथे महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरमच्या वतीने  “लोकशाहीचे रक्षण व आमचे मतदान” या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव डॅा. संजय मं. गो., राज्य समन्वयक उल्का महाजन, विदर्भ संयोजक अविनाश काकडे आदी वक्त्यांची भाषणं झाल्यावर प्रेक्षकांपैकी काही जणांनी ‘आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत’ असे म्हणून आरडाओरडा सुरू केला. “आम्ही उत्तरे देऊ, सर्व भाषणे होऊ देत.” अशी भूमिका भारत जोडो अभियानाच्या नेत्यांनी घेतली. मात्र ते न ऐकता काही जण विचारमंचावर चढले, त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि हुल्लडबाजी सुरू केली. ज्या वेगाने हे घडले, त्यावरून ही कृती पूर्वनियोजित असावी असे वाटते. त्यांनी योगेंद्र यादव यांना बोलूही दिले नाही व सभा उधळून लावली. भारत जोडो अभियानातर्फे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या माहितीनुसार ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते असे कळते. वंचित बहुजन आघाडीचे नेते याबाबत योग्य ती भूमिका घेतील तसेच संविधान विरोधी शक्ती, भाजप, व संघाविरोधी लढताना शत्रू-मित्र विवेक बाळगतील अशी अपेक्षा आहे. जे आपल्या पक्षाबरोबर नाहीत अशा साहित्यिक, विचारवंत, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा अलिकडच्या काळात वंबआच्या कार्यकर्त्यांनी नवाच पॅटर्न तयार केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संवैधानिक हक्काची अशी पायमल्ली वंचितांचं राजकरण करू पाहणाऱ्या पक्षाने करणे यासारखी शोकांतिका नाही.अशाप्रकारच्या हुल्लडबाजीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलीस यंत्रणेने असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. अशाप्रकारच्या दडपशाहीला न भिता भारत जोडो अभियान आपले काम राज्यभरात सुरू ठेवेल असा आम्ही निर्धार व्यक्त करतो,असे भारत जोडो अभियान, ठाणेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत निवडणूक यंत्राची पहिली सरमिसळ संपन्न

अशोक गायकवाड रायगड : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या ३ हजार ६८१ मतदान यंत्रांची पहिली जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे , आचारसंहिता पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ६ हजार २०० बॅलेट युनिट, ३ हजार ४०५ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ६८१ व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी जावळे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातदेखील मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे जावळे यांनी सांगितले. 0000