Category: होम

माथेरानकरांसह पर्यटकांचा खड्डेमय प्रवास

माथेरान : माथेरान या पर्यटन नगरीत मुख्य प्रवेशद्वारा पासूनच येणाऱ्या पर्यटकांना शहरात येण्यासाठी वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यातच मुख्य रस्त्यावरील नव्याने लावण्यात आलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याना अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे पायी चालत येणाऱ्या पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून ह्या ब्लॉकच्या रस्त्यात काही निकृष्ठ दर्जाच्या ब्लॉकची माती होऊन जागोजागी खड्डे पडले आहेत. उन्हाळ्यात हे खड्डे बुजविण्यासाठी काही संघटनानी पुढाकार घेतला होता परंतु नेहमीच विकासाला विरोध करणाऱ्या काही मंडळींनी पर्यावरण वाद्याना सदर बाबतीत माहिती देऊन रस्ते आहेत त्याच परिस्थितीत राहावे असे बोलले जात आहे. याच रस्त्यावरून पर्यटक, शालेय विद्यार्थी, आबालवृद्ध त्याचप्रमाणे घोडे,ई रिक्षा जात असतात. या खड्डयामुळे अनेक पर्यटकांना पाय मुरंगळुन दुखापत झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना करून सर्वाना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्थानिक बोलत आहेत. 0000

अभिजीत कांबळे यांचे ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ विषयावर व्याख्यान

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील विकासात महत्वपूर्ण योगदान असणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या 26 मे रोजीच्या 150 व्या जयंती दिनाच्या औचित्याने शनिवार दि. 22 जून 2024 रोजी, सायं 6.30 वा., वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच डिजीटल अशा तिन्ही प्रसार माध्यमांमध्ये वीसहून अधिक वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले व सध्या बीबीसी मराठीचे संपादकपद भूषविणारे संपादक, व्याख्याते श्री. अभिजीत कांबळे यांचे ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे प्रमुख साधन आहे हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण प्रसारावर विशेष भर दिला. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्रियांच्या शिक्षणाकडेही प्राधान्याने लक्ष दिले. शिक्षणाचे महत्व ओळखून त्याकाळी ठोस भूमिका घेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीच्या शैक्षणिक विचारांना या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15,  ऐरोली येथे उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या विचारसूत्रावर आधारित ‘ज्ञानस्मारक’ म्हणून येथे भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी नावाजले आहे. याठिकाणी ‘विचारवेध’ शृंखलेंतर्गत नियमित आयोजित करण्यात येत असलेल्या मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांतून श्रोत्यांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करुन दिली जात आहे. या व्याख्यानांना नागरिकांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. आधुनिक विज्ञाननिष्ठ समाजक्रांतीचे उद्गाते म्हणून मानांकित राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वस्पर्शी कार्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांचे अतुलनीय कार्य जाणून घेण्यासाठी शनिवार, दि. 22 जून 2024 रोजी, ऐरोली मुलुंड खाडी पुलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सायं. 6.30 वा. आयोजित करण्यात आलेल्या नामवंत व्याख्याते व संपादक श्री. अभिजीत कांबळे यांच्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ या व्याख्यानाप्रसंगी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. ०००००००

 ‘निरंजन डावखरे यांच्याकडून कोकणातील युवाशक्तीसाठी कार्य’

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे मत   भिवंडी: कोकणासह ठाणे जिल्ह्यातील युवाशक्तीसाठी आमदार निरंजन डावखरे यांनी कार्य केले आहे. कोकणासह ठाणे जिल्ह्यातील सर्व स्तरांतील प्रश्न मांडून ते सोडविणाऱ्या महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज येथे केले. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी भिवंडी शहरातील ओसवाल हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आज उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, सौ. नीलिमा डावखरे, लोकसभा समन्वयक जितेंद्र डाकी, हरिश्चंद्र भोईर, रामनाथ पाटील, यशवंत सोरे, छत्रपती पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कोकणातील पाच जिल्ह्यात पसरलेल्या पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी सातत्याने मांडले. कोकणातील युवा शक्तीच्या प्रगतीसाठी ते कार्य करीत होते. पदवीधर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचे प्रश्न मांडण्याबरोबरच सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यांना विकासकार्य करण्याची संधी पुन्हा देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी झटावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. भिवंडी शहरात ३०९६ व भिवंडी ग्रामीणमधील ३ हजार २४१ मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशवासियांनी पसंती दिल्याने पुन्हा `एनडीए’चे सरकार स्थापन झाले. केंद्र सरकारकडून भातपिकासह विविध पिकांच्या आधारभूत किंमती वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारकडून विविध लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम केली जात असतानाच, महाराष्ट्र सरकारनेही काल पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही मोफत उपचार लागू केले. राज्य सरकारमध्ये शिक्षकांसह विविध पदांच्या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय महायुतीच घेऊ शकते, असे नमूद करून श्री. कपिल पाटील यांनी भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण भागातील प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 000000

उल्हासनगरात नालेसफाईचा बोजवारा

संततधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी   उल्हासनगर : संततधार व रिमझिम पावसामुळे शांतीनगर स्मशानभूमी, कल्याण-बदलापूर रस्ता, गोलमैदान, विदर्भवाडी आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. नालेसफाई न झाल्याने, पाणी तुंबल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून शाळा क्रं-१४ येथे एक झाड पडल्याची घटना घडली आहे. तर रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. उल्हासनगरात सकाळपासूनच रिमझिम व संततधार पाऊस सुरू झाल्याने, शहरातील सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते. शांतीनगर स्मशानभूमीच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने, काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. महापालिका कर्मचारी व अग्निशमन विभागाने तुंबलेल्या पाण्याला मार्ग मोकळा केला. शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या स्टेट बँक, राधास्वामी सत्संग, अनिल-अशोक चित्रपटगृह व शांतीनगर प्रवेशद्वार आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. याव्यतिरिक्त गोलमैदान, गुलशननगर, खेमानी रस्ता, मयूर हॉटेल व आयआयटी कॉलेज रस्ता आदी ठिकाणी पाणी साचले. वेळीच नालेसफाई न झाल्याने शहराची तुंबापुरी झाल्याचा आरोप होत आहे. तसेच रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी न भरल्याने, रस्ते खड्डेमय झाले असून याचा त्रास नागरिकांसह वाहनचालकांना होत आहे. गायकवाड पाडा नाला खोदल्याने नागरिक त्रस्त ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गायकवाड पाडा येथील एक लहान नाला खोदल्याने, नागरिकांसह शाळेकरी मुलांना नाल्यावरील पाईपवरून नाला ओलांडून जावे लागत आहे. संततधार पाऊस सुरू राहिल्यास, एकदी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 000000

३० जूनपर्यंत चिकू फळपिक विमा योजनेत सहभागी व्हा – दीपक कुटे

ठाणे- येत्या मृग बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे चिकू फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषि विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल दि. १६ जूनपासून सुरु झाले असून ३० जून २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. जादा आर्द्रता व जास्त पाऊस या हवामान धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित केलेल्या कालावधीत फळ पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे. योजनेची वैशिष्ट्ये : १ ठाणे जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात चिकू पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. २. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. ३. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. ४. या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. ५. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. ६. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ७. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असावे. ८. फळपिक विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.  ९. विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे. १०. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग  लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता जप्त होईल. ११. योजनेत भाग घेण्यासाठी चिकू  फळपिकाचे उत्पादनक्षम वय ५ वर्षे आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(टोल फ्री नं. १८००२०९५९५९) मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत चिकू पिकाकरीता ३० जून आहे, असेही दिपक कुटे यांनी कळविले आहे. विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./ हेक्टर) :- ठाणे जिल्ह्यात चिकू फळपिकासाठी चालू वर्षी विमा संरक्षित रक्कम रु. ७०, ०००/- असून विमाहप्त्यात शेतकरी हिस्सा रु.१२, २५०/- इतका आहे. तालुकानिहाय अधिसूचित महसूल मंडळांची यादी :- चिकू पिकासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव व शहापूर तालुक्यातील किन्हवली व डोळखांब ही महसूल मंडळे अधिसूचित आहेत. विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी – जादा आर्द्रता व जास्त पाऊस – दि.१जुलै ते ३० सप्टेंबर. प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर) – १. या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग ५ दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रतिदिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रु. ३१,५००/- देय राहिल. २. या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग १० दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ८ दिवस झाल्यास रु. ७०,०००/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु, ७०,०००/-. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी   संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे. 0000

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

कर्ज योजनांसाठी संकेतस्थळावरून अर्ज करण्याचे आवाहन   ठाणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत दारिद्र्य रेषेखालील बेरोजगारांकरिता विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी www.lokshahir.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. अनुसूचित जातीतील युवकांनी या संकेतस्थळावर जाऊन विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती – मांग, मातंग, मिनी मादिंग, मादिग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग-गारुडी, मांग-गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 3,00,000/-) बेरोजगारांकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत थेट कर्ज योजना (कर्ज मर्यादा रु.1.00 लाख) तसेच केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या पीएम एजेएवाय योजनांचे कर्ज प्रस्ताव/अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आले असून www.lokshahir.in अशी आहे. या सुविधेचा ठाणे जिल्ह्यातील मांतग समाजातील शहरी / ग्रामीण भागातील इच्छुक / पात्र व्यक्तीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजुरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा मजला, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, सहयाद्री शाळेच्या बाजुला, खारेगाव, कळवा (प), ठाणे ४००६०५. दूरध्वनी क्र. ०२२-२५३८८४१३. या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) च्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी कळविले आहे. 000000

पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे – विभागीय आयुक्त पी. वेलरासू

अशोक गायकवाड   ठाणे : विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शीपणे होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. या मतदारसंघात २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै २०२४ रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात आज मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, पालघर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे, नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, उपायुक्त तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, कोकण विभागाचे उपआयुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, रेवती गायकर, सत्यम गांधी आदी यावेळी उपस्थित होते. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मतमोजणीचे हे पहिले प्रशिक्षण होते. यावेळी गायकवाड यांनी मतमोजणीसाठी करावयाची तयारी, मतपत्रिका कशा मोजाव्यात, त्यांची वैध-अवैधता कशी तपासावी, वैध मतांचा कोटा कशा प्रकारे तपासावे, किती फेऱ्या होणार आदी माहिती दिली. तसेच रानडे यांनीही मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणकोणती काळजी घ्यावी, डेटा कसा भरावा आदींची माहिती दिली. वेलरासू यांनीही मार्गदर्शन करून म्हणाले की, यंदा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली आहे. तसेच यंदा मतदानाची वेळ वाढविण्यात आल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. या निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीची प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया वेगळी असणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान होणार असल्याने मोजणी प्रक्रियेची व्यवस्थित तयारी करावी व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व बिनचूक होण्यासाठी प्रयत्न करावे. कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार आसावरी संसारे यांनी सूत्रसंचालन केले. 000000

मेट्रोच्या कामांमुळे शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने पर्यायी रस्त्यावरून वळविण्याच्या हालचाली

कल्याण: कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिकेची कामे गेल्या महिन्यांपासून सुरू झाली आहेत. या कामांमुळे मागील दोन वर्षापासून कोंडी मुक्त झालेला शिळफाटा रस्ता पुन्हा वाहन कोंडीच्या विळख्यात अडकू लागला आहे. या कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी शिळफाटा दिशेने कल्याणकडे येणारी अवजड वाहने काटई-बदलापूर रस्ता, नेवाळी चौक ते मलंग रस्त्याने, चक्कीनाका दिशेने वळविण्याच्या विषयावर पालिका, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले आहे. तसेच, शिळफाटाकडून कल्याण दिशेने येणारी डोंबिवलीतील बहुतांशी वाहने विको नाका येथे वळण घेऊन डोंबिवलीत प्रवेश करतात.या वाहनांना मानपाडा चौक येथे मज्जाव करून ती मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात वळविण्याचाही विचार कल्याण डोंबिवली पालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक, पालिका अधिकारी उपस्थित होते. शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन न करता ही कामे सुरू करण्यात आल्याने, शिळफाटा रस्त्यावरील गोळवली, विको नाका भागात वाहन कोंडीला सुरूवात झाली आहे. मेट्रो कामांसाठी शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी अवजड खोदकाम यंत्रणा उभी करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागात दो्न्ही बाजुने संरक्षित पत्रे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजुने रस्ता अरूंद झाला आहे. या अरूंद रस्त्यावरून कंटेनर, अवजड वाहने, मोटारीसह सर्व प्रकारची वाहने धावत आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका नोकरदार, शाळकरी विद्यार्थी बसना बसू लागला आहे. या कोंडीवर उपाय करण्यासाठी पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत शिळफाटा दिशेने कल्याण, डोंबिवलीकडे येणारी अवजड वाहने काटई नाका येथून बदलापूरमार्गे नेवाळी चौक, मलंग रस्ता, चक्कीनाका ते पत्रीपूल अशी वळविण्यात यावीत. किंवा काही वाहने बदलापूरमार्गे इच्छित स्थळी जातील. डोंबिवलीत येणारी वाहने विको नाका भागात जाऊ न देता ती मानपाडा चौकात रोखून ती मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात सोडण्यात यावीत यामुळे सोनारपाडा, गोळवली, विको नाका भागात डोंबिवलीतील वाहनांमुळे होणारी कोंडी कमी होईल. या रस्त्यावरून फक्त लहान वाहने कल्याणच्या दिशेने धाऊ लागली तर मेट्रो कामांच्या ठिकाणी होणारी कोंडी कमी होईल, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविणाच्या नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक विभागाला केल्या आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी करून या रस्त्यावरील कोंडी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डाॅ. इंदुराणी जाखड (आयुक्त)

लोकनेते जोमात पण सामान्य माणूस कोमात

जलजीवन योजनेचा फज्जा   राजीव चंदने   मुरबाड : मुरबाड तालुक्यात जल जीवन मिशनची १८३ योजनांची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी दोन वर्षांपासून ‘जल जीवन मिशन’ ची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या वर्षी सुद्धा ४१ गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा केला होता. टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो पुरेसा नसल्याने पाणी टंचाई भासते. तालुक्यातील नागरिकांना रोज पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जलजीवन मिशन मध्ये घरात थेट नळाद्वारे पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अतिशय संथगतीने कामे सुरू आहेत. ३१ मार्च २०२४ रोजी या योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत संपली आहे. तरीही जलजीवन मिशनची एकही योजना पूर्ण झाली नसून कामे पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना अपूर्ण कामांचे बिल देण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे केली आहे. 00000

एपीएमसीतील नालेसफाईची पोलखोल, पहिल्याच पावसात बाजारात साचले पाणी

मुंबई : उपनगरांसह नवी मुंबई शहरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता. सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचले होते. बाजार आवारात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पाणीच पाणी झाले होते. त्याचबरोबर कांदा बटाटा बरोबर पाचही बाजारात जागोजागी पाणी साचले होते. कांदा बटाटा मोठया प्रमाणात पाणी भरल्याने पहिल्याच पावसात एपीएमसी मधील नालेसफाईची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे. एपीएमसी मधील बाजार समिती ही मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे ही उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे. बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारात व परिसरात पाणी साचले होते. एपीएमसी बाजारातील मलनिस्सारण वाहिन्या, चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने हे पाणी साचले आहे. बाजारात नाल्याची सफाई योग्यरीत्या झाली नसल्याने बाजार आवारात ठीक ठिकाणी पाणी साचले होते. ठेकेदाराकडून दाखवण्यासाठी नालेसफाई केली जाते, चेंबर ते चेंबर सफाई होत नाही, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसी प्रशासनाकडून बाजार आवारात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामासाठी १२ लाखांचा ठेका दिला जातो त्याच बरोबर चार महिने नाल्याची देखभालीचा समावेश आहे. मात्र ठेकेदारामार्फत एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व नालेसफाई योग्यरीत्या होत नसल्याने बाजारात पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे. 00000