Category: रायगड

raigad news and updates

ज्येष्ठ निरुपणकार परमपूज्य तीर्थस्वरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शुभाशिर्वाद घेतले.

मतदान यंत्रांची ७ विधानसभा संघनिहाय पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ३२ रायगड आणि ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील ७ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार ई व्ही एम हीव्हीपॅट यंत्राची प्रथम सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. ही प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पध्दतीन ही सरमिसळ करण्यात आली.जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार २ हजार ७१९ मतदान केंद्र आहेत. सध्या रायगड जिल्ह्यासाठी ६ हजार ७८० बॅलेट युनिट, ३ हजार ७७४ कंट्रोल युनिट तर ३ हजार ९५२ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राच्या १३८ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट वाटप करण्यात येणार आहे. तर १४५ टक्के व्हीव्हीपॅट वाटप करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदार संघनिहाय मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येणार आहे. सध्या ही यंत्र जिल्हास्तरावर स्ट्रॉँगरूम मध्ये आहेत.

राकेश कोकळे यांच्या पाठपुराव्यामुळे खड्डे भरण्यास सुरुवात

माथेरान : एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते परंतु त्यातील काही निकृष्ट दर्जाच्या ब्लॉक्समुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक पर्यटक पडून जखमी झाले होते तर याच रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या साधनांना देखील त्रासदायक बनले होते याकामी येथील जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता अखेरीस त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या रस्त्यावर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत माती आणि खडी मध्ये हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. माथेरान मध्ये विकास कामे होत असताना ती कशा पद्धतीने पूर्ण केली जात आहेत ठेकेदार कामाला दर्जा देत आहे की नाही याबाबत नागरिकांनी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे अनेकदा ठेकेदार कामांमध्ये चालढकल करत असतात कामे लवकरच आटोपून बिले काढण्याची घाई असल्यामुळे कामे तकलादू होत असतात यासाठी नागरिकांनी होत असलेल्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे राकेश कोकळे यांचे म्हणणे आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रायगड जिल्ह्यातील पेझारी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पाटील कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

माथेरानमध्ये कार्यान्वित होणाऱ्या प्रकल्पात राजकीय म्होरक्यांची विरोधकांसह चंगळ

माथेरान : माथेरानसारख्या या दुर्गम भागात कधी नव्हे ती विकास कामे मागील सहा ते सात वर्षांपासून प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु विकास तेथे विरोध हे गणितच असल्याने…

स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय शाळेचं सक्षमिकरण

व्हिझिबल अल्फा कंपनीने दिला मदतीचा हात कर्जत : अशोक गायकवाड व्हिझिबल अल्फा कंपनी च्या मदतीने लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या अंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, गौरकामत शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापक प्रमोद किरंगे यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि व्हिजिबल अल्फा यांनी दिलेल्या सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दिलेल्या सुविधांचा वापर यापुढे केला जाईल अशी ग्वाही दिली. २८ मार्चला  स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेत अल्फा व्हिसिबल च्या मदतीने नूतनिकरणाचे काम झाले आहे…आनंदो शाळा सक्षमीकरण प्रकल्पाचा उद्देश शाळांना सक्षम करण्यासाठी तसेच शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हे गौरकामत शाळेतील व्हिसिबल अल्फा डोनर च्या सपोर्ट मुळे साध्य झाले आहे. व्हिसिबल अल्फा ने शाळेसाठी शालेय विज्ञान प्रयोग शालेसाठी स्वतंत्र वर्गखोली , सौर ऊर्जा सुविधा , पाणी फिल्टर, शौचालये आणि स्नानगृहांचे नूतनीकरण तसेच ७० लाकडी बेंच , ग्रंथालय आणि एक स्वतंत्र वर्ग उपलब्ध करून दिले आहे . या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य व सामूहिक नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश दासवानी यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टसोबत भागीदारी करून शाळेला पाठिंबा दिल्याबद्दल व्हिजिबल अल्फा टीमचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कांचन थोरवे यांनी शाळा सक्षमीकरण प्रकल्पाचा उद्देश सांगून शाळेची सक्षमीकरण प्रकल्पाची गरज स्पष्ट केली. शाळेचे अध्यक्ष पाटील आणि मुख्याध्यापक किरंगे यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि व्हिजिबल अल्फा यांनी दिलेल्या सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दिलेल्या सुविधांचा वापर यापुढेही केला जाईल अशी ग्वाही दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमच्या शाळेत सर्व सुविधा असल्याने इतर विद्यार्थीही या शाळेत प्रवेश घेतील असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक समन्वयक प्रिया सोनावळे यांनी केले. ह्या कार्यक्रमासाठी विशेषाधिकारी पाहुणे म्हणून श्रीमती पद्म प्रिया सरस्वतुला हेड ऑफ व्हिसिबल अल्फा भारत , अरुल, आयटी विभाग व्हिसिबल अल्फा, श्रीमती सीमा, प्रशासकीय व्हिसिबल अल्फा लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे सीईओ दासवानी तसेच लाईफ ट्रस्ट मार्केटिंग टीम सदस्य हरपाल सिंग, कार्यक्रम व्यवस्थापक कांचन थोरवे, गौरकामत शाळेचे अध्यक्ष पाटील , चेअरमन राणे आणि गौरकामत गावचे सरपंच योगेश देशमुख उपस्थित होते.

डॉ.मीनल जाधव हिचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सत्कार

माथेरान : माथेरान मधील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेतील शिक्षक विनोद जाधव यांची मुलगी मीनल हिने होमिओपॅथी मेडिकल मध्ये डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचा कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मीनलचे पालक शिक्षक विनोद जाधव आणि आई सीमा जाधव उपस्थित होत्या.मीनल जाधव हिचे चौथी पर्यंतचे शिक्षण आसल( कर्जत) इथे झाले त्यानंतर अकरावी,बारावी अभिनव ज्ञान मंदिर कर्जत आणि त्यानंतर केडीएमसी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शिरपूर (धुळे) याठिकाणी झाले. तिने डॉक्टर पदवी२९ मार्च रोजी प्राप्त केली आहे केल्या या तिच्या यशाबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नेरळ येथील छत्रपती शिवाजी मैदान जवळील हॉलवर भव्य सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. मीनलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० महत्वाची भूमिका बजावेल – कुलगुरू डॉ.कारभारी काळे

अशोक गायकवाड रायगड : आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ करिता बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे यांनी मंगळवार, (दि.२) रोजी येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत १२ वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षामाठी प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शिक्षण व्यवस्थेमधील संभ्रम दूर होण्याच्या उद्देशाने कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे आयोजित एक दिवसीय स्कूल कनेक्ट कार्यशाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस परिसरातील एकूण २०० पेक्षा अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली असून पहिल्या सत्रात राज्यात राबविण्यांत येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील शैक्षणिक बदलांबाबत जागृती, बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजना, विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठात उपलब्ध शैक्षणिक सोई-सुविधा, विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात विद्यापीठातील विविध विभागांना भेट आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, डॉ.एच.एस. जोशी, डॉ.ए.पी. शेष, डॉ.नीरज अग्रवाल, डॉ.एस.एम.पोरे आणि पदविका विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक बदलांबाबत जसे मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झीट, बहुशाखीय विषय निवड पद्धत व लवचिक अभ्यासक्रम, नविन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयीन स्तरावर होणारे बदल, भारतीय ज्ञान परंपरा, अकँडमीक बँक ऑफ क्रेडीट, स्वयंम प्लँटफार्म वरील ऑनलायीन अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामाबाबत संवाद साधला तसेच विद्यापीठ अंतर्गत कार्यरत उष्मयान केंद्र व उपलब्ध सोई-सुविधा बाबत विद्यार्थ्यांना अवगत करून त्यांना उद्योजकीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्कृती विकसित होण्याकरिता विद्यार्थी व शिक्षकांकरिता विद्यापीठामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आदान-प्रदान होण्यासाठी विद्यापीठ प्रशासन निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली. तसेच भारताला विश्वगुरु बनविण्याकरिता विकसित भारत २०४७ व आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाची भूमिका बजावेल असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेत डॉ.ए.पी.शेष इंग्लिश विभाग प्रमुख यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना समग्र शिक्षण, जीवनावश्यक कौशल्य व माणुसकी याचे आपल्या शैक्षणिक जीवनातील महत्व विषद केले. करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख डॉ. नीरज अग्रवाल यांनी विद्यापीठात विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप, स्टार्टअप / उद्योजकता करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ.बाबत मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्वाची भूमिका पार पेल असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.मधुकर दाभाडे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना आपल्या भागातील संभाव्य उद्योग संधी लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी उद्योग स्थापन करावे तसेच आपल्या परिसरात उत्तम दर्जाचे अभियंता निर्माण होतील या करिता विद्यापीठ सदैव आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांनी विद्यापीठामार्फत उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यशाळेची प्रस्तावना डॉ.एच.एस. जोशी यांनी केली तसेच या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.रतिका जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संप्रीत गौड यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.संजय नलबलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नवीन खंडारे व विद्यापीठाचे अधिकारी/कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

निवडणूक प्रचाराच्या परवानग्यांसाठी ‘सुविधा’ पोर्टल उपलब्ध

अशोक गायकवाड रत्नागिरी : उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घ्यावी. आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व नोडल अधिकाऱ्यांची आज आढावा बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदीसह नोडल अधिकारी उपस्थित होते. माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, इव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सविस्तर आढावा घेतला. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घ्यावी. आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असेही सिंह म्हणाले.

भाजपाचे ‘बुथ विजय’ अभियान बुधवारपासून सुरू

मावळ,रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार – अवधूत वाघ राज भंडारी पनवेल : मित्र पक्षांसहित देशात ४०० हून अधिक जागा भाजपा निवडून आणणार तसेच मावळ, रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार असल्याचे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. ६ एप्रिल रोजी भाजपा आपला ४४ वा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने बुथ विजय अभियान या नवीन योजनेचा शुभारंभ आजपासून सगळीकडे केला आहे, या योजनेची माहिती प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते वसंतराव जाधव, पंकज मोदी, भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील तसेच प्रकाश बिनेदार उपस्थित होते. यावेळी माहिती देताना अवधूत वाघ म्हणाले, जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. बुथ विजय अभियानांतर्गत प्रत्येक बुथवर भाजपा कार्यकर्ता जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य सरकारने केलेली विविध कामे, विकास योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, आंतरराष्ट्रीय ख्याती या माहिती सोबतच प्रत्येक घरोघरी विविध योजनांच्या लाभार्थींना भेटून घेतलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेतल्याबद्दल आभार मानले जाणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मते पडली पाहिजेत यासाठी बुथवर कार्यकर्ते मेहनत घेणार आहेत, अशी शेवटी प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. भाजपच्यावतीने ४०० पार चा नारा देणाऱ्या अजेंड्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपला गोचीत पकडले असून इंडिया आघाडीच्यावतीने भाजपकडून संविधान बदलविण्यासाठी ४०० पारचा नारा देण्यात येत असल्याच्या आरोपावरून अवधूत वाघ यांनी उत्तर देताना सांगितले की, गेल्या ७० वर्षांमध्ये अनेक बदल घडले आहेत, त्यानुसार घटनेमध्ये देखील बदल करणे गरजेचे आहे. लोकसभेत २/३ संख्याबळ असल्यामुळे तत्कालीन राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारने देखील काही बदल केले होते. त्यानुसार पुन्हा काळ बदलत चालला आहे. या बदलत्या काळानुसार घटनेत काही तरतुदी करणे गरजेचे असल्यामुळे भाजपची देखील ती तयारी सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून संविधान बदलण्याची खोट्या स्वरूपाची भाषा केली जात आहे, तर संविधान बदलण्याची कोणाच्या बापामध्ये हिम्मत नाही, असे उत्तर देत उपस्थित झालेल्या या प्रश्नाला अवधूत वाघ यांनी पूर्णविराम दिला.