Category: ठाणे

Thane news

  कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ

कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश कल्याण : कल्याण ठाकुर्ली समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरे कोळीवाडा येथील खाडी किनारी गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते आज करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे या विकासकामाला सुरुवात होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला मोठा खाडी किनारा लाभला असून काही ठिकाणी गणेश घाट तयार करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कचोरे कोळीवाडा येथे असलेल्या खाडी किनाऱ्याचे देखील सुशोभिकरण व्हावे यासाठी नगरसेविका रेखा चौधरी पाठपुरावा करत होत्या. या ठिकाणी सागर देवीचे मंदिर असून गणपती विसर्जन देखील केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक येत असतात. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून कायापालट करण्याची मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत होती. त्यानुसार रेखा चौधरी यांनी प्रशासनाकडे, खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी या कामासाठी तब्बल 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून या खाडी किनाऱ्याचे सुशोभिकरण करून रुपडे पालटणार आहे. आज या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांचे आभार मानले आहेत. यावेळी आमदार राजेश मोरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अतिश चौधरी, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कचोरे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई

कचोरे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कचोरे परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका जे प्रभाग कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. हे बांधकाम ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने स्थळावर जाऊन कारवाई केली. आणखी काही ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात येईल. कारवाईदरम्यान संबंधितांना पुढील काळात कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या व मंजूर नकाशा घेणे बंधनकारक आहे. अन्यथा नियमबाह्य बांधकामांवर प्रशासन कठोर कारवाई करेल.

अरे बापरे! भाजपातही बंडखोरी झाली

अरे बापरे! भाजपातही बंडखोरी झाली भिवंडीत भाजपा बंडखोराला काँग्रेसने महापौर केला स्वाती घोसाळकर भिवंडी : भारतात २०१४ नंतर राजकारणाचा पट बदलून टाकणाऱ्या भाजपाला भिवंडीत मात्र काँग्रेसने जोरदार झटका दिला. शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदेंना…

नमुंमपा सभागृह नेतेपदी सागर नाईक व विरोधी पक्ष नेते पदी विजय चौगुले यांची नियुक्ती

नमुंमपा सभागृह नेतेपदी सागर नाईक व विरोधी पक्ष नेते पदी विजय चौगुले यांची नियुक्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी आज पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १९ – १- अ अन्वये सभागृह नेता म्हणून  सागर ज्ञानेश्वर नाईक तसेच अधिनियमाच्या कलम १९ – १- अअ अन्वये विरोधी पक्ष नेता म्हणून  विजय लक्ष्मण चौगुले यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नव नियुक्त सभागृह नेता व विरोधी पक्ष नेता यांचे महापौर श्रीम. सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देउुन अभिनंदन केले. नमुंमपा स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची निवड जाहीर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २०(२) सह वाचावयाच्या कलम ३१– अ (२) अन्वये नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. या १६ सदस्यांमध्ये  जयवंत सुतार,  सुधाकर सोनवणे,  शशिकांत भोईर,  अशोक पाटील, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज,  संदीप म्हात्रे,  प्रदीप गवस,  सुरेश शेट्टी,  सागर नाईक,  आकाश मढवी, अनिता पाटील, मंदाकिनी म्हात्रे, दिपाळी सकपाळ,  सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. या नवनियुक्त १६ सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनंदन केले.

शिवाजी महाराजांचे राज्य आजही आदर्शवत – प्रा. डॉ. काशिलिंग गावडे

शिवाजी महाराजांचे राज्य आजही आदर्शवत – प्रा. डॉ. काशिलिंग गावडे ठाणे : शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे स्वराज्य हे केवळ एका जातीचे, घराण्याचे नव्हते तर ते जनसामान्यांचे राज्य होते असे मत प्रा. डॉ. काशीलिंग गावडे यांनी व्यक्त केले. ते पाडळी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिद्धार्थ युवा फाउंडेशन व शेतकरी मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पाडळी च्या सरपंच मीना कांबळे उपस्थित होत्या. गावडे पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट केली. त्यांनी रयतेत धैर्य, शौर्य व आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या राज्यात शेतकरी, बारा बलुतेदार, स्थानिक उद्योगधंदे यांच्या हिताची भूमिका घेतली गेली. रयतेच्या भाजीच्या देटाला, स्त्रीच्या केसाला आणि प्रार्थना स्थळांना धक्का लागता कामा नये ही त्यांची भूमिका होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ध्येयधोरणे ही आजही आदर्शवत आहेत अध्यक्षा मीना कांबळे म्हणाल्या की शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात स्त्रियांचा केलेला आदर व रयतेची घेतलेली काळजी खूप महत्वपूर्ण आहे. या कार्यक्रमात मध्ये आदिती पाटील हिने शिवचरित्राविषयी प्रभावी भाषण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता कांबळे यांनी केले. तर आभार मा.समाधान कांबळे व सूत्रसंचालन आणि संयोजन डॉ. सुनील पाटील यांनी केले. या शिवजयंतीसाठी पाडळी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात

शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात शेत, माळरानावर नीलगायींचे कळप वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त अविनाश उबाळे ठाणे:  शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग व विविध धरण व रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहेत.काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट,हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत.परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत. दुसरीकडे अन्न व पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांकडे कुच करीत आहेत.अशाच प्रकारे जंगलातील नीलगायींचे कळप हे गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत.हे वन्यजीव नीलगायींचे तांडे शेतकऱ्यांच्या रोज नजरेस पडत आहेत.शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या निलगायींचे कळप हे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत.निलगायी या भाजीपाला,व कडधान्य फस्त करीत आहेत.निलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत.शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव,कुडशेत,मुसई बेडीसगाव,परटोली,उंब्रई,कानवे,चेरवली,आष्टा,आदिवासी,लवले,ठुणे,व किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर निलगायी आढळून येत आहेत.या निलगायी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा,वाल,मटकी,इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी,घोसाळी,शिरवळे,भोपळा,गवार,काकडी व पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत.यामुळे मोठे अर्थीक नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकऱ्यांनसमोर आता उभे राहिले आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.एकिकडे शेतकऱ्यांना पावसाळ्या मोसमात वादळीवाऱ्यासह होणारा पाऊस बेमोसमी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नुकसानाला दरवर्षी समोर तर जावे लागतेच परंतु आता हिवाळ्यातील रब्बी हंगामात निलगायींच्या शेत मळ्यातील वाढत्या उपद्रवामुळे अर्थीक नुकसानाला देखील तोंड द्यावे लागते आहे अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.या निलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत.या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत.या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.नीलगायींचे कळप काही स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत.यावेळी रस्ता ओलांडून जाताना निलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात नीलगायीचा अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत.नीलगायींचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी व नीलगायी संरक्षणासाठी वनविभागाकडून आता जनजागृती केली जात आहे.रस्त्यावर वाहनं सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत.असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.एकिकडे जंगल भुईसपाट होत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.तर दुसरीकडे अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या वन्यजीवांची वाताहत होताना दिसत आहे.असे हे विदारक चित्र येथे दिसत आहे. प्रतिक्रिया – नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे. संजय सावंत वनपाल, शेणवे वनपरिमंडळ,तालुका शहापूर प्रतिक्रिया – वाढत्या निलगायींच्या उपद्रवामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. मनोहर खाडे शेतकरी

ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब

ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब सिद्धेश शिगवण ठाणे : ठाणे महापालिका निवडणूकीत नगरसेवक निवडणून आल्यानंतर आणि महापौर विराजमान झाल्यावर पहिलीच सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.  अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे अधिकृत सांगण्यात आले. यावेळी सर्व पक्षाचे गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी अजित पवार यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महापालिकेतील गटनेते पवन कदम यांनी अजित पवार यांच्या निधनाची घटना मनाला चटका लावून गेल्याचे म्हटले. तर, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनीही अजित पवार यांच्या कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांच्यासोबतचे अनेक किस्से मांडले. अजित पवार यांच्यासोबतची त्यांची शेवटची भेट कशी झाली, अजित पवार यांचे मिळालेले मार्गदर्शन, सकाळी उठून काम करण्याची त्यांची सवय याविषयी नजीब मुल्ला हे भाषण करताना भावूक झाले होते.तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अश्रफ शानू पठान यांनी अजित पवार यांच्या अपघातात कोणी दोषी आहे? अपघात कसा झाला? याची चौकशी करण्याचे आमचे निवेदन महापौरांनी सरकारला द्यावे अशी मागणी केली. तर एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनीही आम्ही अजित पवार यांच्या कुटुंबासोबत असून प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास रेपाळे, राम रेपाळे यांनीही अजित पवार यांच्यासोबत निवडणूकांमध्ये काम करताना आलेले अनुभव सांगितले. तसेच अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. ही सभा  अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी तहकुब करण्यात आल्याचे सांगत लवकरच नवीन तारीख घोषित केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 श्री माँ विद्यालयाने राखले वर्चस्व

१४वी ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धा श्री माँ विद्यालयाने राखले वर्चस्व ठाणे : श्री माँ विद्यालयाने ५१ गुणांची कमाई करत सिम्पथेसायझर स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रल्हाद भांगले स्मृती १४ व्या ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत मुलांच्या गटाचे विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात ५५ गुण नोंदवणाऱ्या ठाणे पोलिस स्कूल संघाने अव्वल स्थान मिळवले.  मावळी मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या स्पर्धेत विराज काटकर युग पाटील आणि विहान निकुंभने आपापल्या वयोगटात सुवर्णपदक जिंकले. तर मयांक भोकरे गोळा फेक स्पर्धेत विजेता ठरला. संक्षिप्त निकाल : मुले ८ वर्षे वयोगट – विराज कोटकर ( सुवर्ण – लांब उडी, २.९३ मिटर), मुले १० वर्षे वयोगट – विहान निकुंभ ( सुवर्ण – लांब उडी, ३.५९ मीटर, रौप्य – ६० मिटर धावणे, ९.६ सेकंद), मुले १२ वर्षे वयोगट – सुवर्ण – ४ X २५ मिटर रिले, १.३६.२ सेकंद, मुले १४ वर्षे वयोगट – युग पाटील ( सुवर्ण – लांब उडी, ४.९५ मिटर, सुवर्ण- ६० मिटर धावणे, ७.९ सेकंद), मयांक भोकरे ( सुवर्ण – गोळा फेक, ११.४६ मिटर, रौप्य – लांब उडी, ४.९२ मिटर), कैफ शेख ( रौप्य – ६० मिटर धावणे, ८.१ सेकंद, कांस्य- लांब उडी, ४.६८ मिटर), अश्विन केंद्रे ( रौप्य – गोळा फेक,९.८१ मिटर).  रिले ४X ५० मिटर – सुवर्ण, १.२४.९ सेकंद, रौप्य १.२९.५ सेकंद. मुली १४ वर्ष वयोगट – वैभवी पुजारी ( कांस्य – ६० मिटर धावणे, ८.९ सेकंद), रिले ४X ६० मिटर – रौप्य १.३३.०३ सेकंद.

 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन कल्याण: आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन आज कल्याण डोंबिवली महापालिकेत संपन्न झाला. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली चौधरी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, मनसे गटनेते प्रल्हाद म्हात्रे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त वंदना गुळवे, समीर भुमकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण

महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण प्रभारी नियुक्त्या रद्द करण्याची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या  कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता ठाणे महानगर पालिकेकडून केली जात नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे रवींद्र चांगो शिंदे यांनी ठामपा मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. ठाणे महानगर पालिकेची सुमारे चार वर्षानंतर सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजाव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी, कर्मचारी थकीत देणी त्वरीत द्यावी, १०-२०-३० ची ठरावाची त्वरीत अंमल बजावणी करावी, शासनसेवा नियमावली डावलून अनियमीत दिलेले प्रभारी कार्यभार रद्द करावा,  शासनसेवा नियमावली डावलून अनियमीत दिलेले प्रभारी कार्यभारी पदे रद्द करावेत, महात्मा फुले खारटन रोड क्रिक रस्त्याचा १० वर्षांचा प्रलंबीत ठराव, तत्काळ मंजुर करावा आदी मागण्यांचे निवेदन रवींद्र शिंदे यांनी ठामपाला दिले.