Month: October 2024

तरीही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतात

मुंबई : मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाला कोणत्याही सरकारी संस्थेचा तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए चाही पाठिंबा मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. स्वयंसेवी संस्था व देणगीदारांकडून मिळालेल्या निधीवर आम्ही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतो. दिव्यांग खेळाडू बाबत सरकारला ही लाजिरवाणी बाब आहे. अशी खंत व्हीलचेअर मुंबई क्रिकेट टीम चे कर्णधार राहुल रामूगडे यांनी व्यक्त केली. व्हीलचेअर क्रिकेट इंडिया आणि डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ मुंबई मलबार हिल यांच्या सहकार्याने घाटकोपर मध्ये २६ ऑक्टोबर रोजी टी १० व्हीलचेअर क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आले. यात हिंदुस्तान कोलास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खेळाडूंना नवीन व्हीलचेअर भेट दिली. मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा हा सामना होता. या  सामन्यात मुंबईच्या टीम ने उत्कृष्ट खेळ खेळत बाजी मारली. क्रिकेट हा खेळ जगभरात प्रसिद्ध असून व्हील चेअर क्रिकेट टीम ला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. आमच्या मुंबई संघातील काही खेळाडू भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाकडूनही खेळले आहेत. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई, झोनल गव्हर्नर ए. व्ही. सुरेश आर्या, अखिलेश विश्वकर्मा, अभय प्रताप सिंह, कला श्रीधर, आदर्श गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते.

कसली ही लोकशाही – कवी लेखकांचा सवाल

रमेश औताडे मुंबई : आदिवासी समाजातील सरपंच असलेल्या महिलेला जाहीर कार्यक्रमात स्टेजवर संधी दिली नाही. मात्र मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला खुलेआम व्यासपीठावर प्रवेश देण्यात येतो. कसली ही लोकशाही ? असा सवाल समाजसेवक कवी लेखक अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या आठवड्यात कनेरसर गावी भेट दिली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या जवाहर विठ्ठल दौंडकर खुलेआम व्यासपीठावर कसे काय फिरत होते ? असा सवाल अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ज्याच्या नावावर खटले दाखल आहेत, त्यांना वगळून इतरांना कार्यक्रमाचे पास देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, गुन्हे दाखल असलेल्या दौंडकर यांना प्रशासनाकडून पास देण्यात आले. सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी कनेरसर येथे येण्याअगोदर न्यायदेवतेची पट्टी काढून हातात संविधान ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्याच कार्यक्रमात गुन्हेगार खुलेआम फिरत होते.  त्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष, खेडचे दिवाणी न्यायाधीश न्या. पवार, सदस्य, खेडचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अशोक टाव्हरे यांनी केली आहे. 0000

नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक

कल्याण : कल्याण (पश्चिम) विधानसभाअंतर्गत नियंत्रण कक्षाचा १८००-२३३-०११७ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध केला आहे. हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित असून कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघांतर्गत नागरिकांसाठी आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी व निवडणुकीसंदर्भातील इतर तक्रारी टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे. 00000

साडेतीन हजार अंध बांधवांना दिवाळीची शिधा भेट

घाटकोपर –  घाटकोपर येथे दिवाळीनिमित्त जवळपास साडेतीन हजार अंध बांधवांना दिवाळीची भेट म्हणून रवा, मैदा, साखर, तूप, तेल, चहापावडर, हळद पावडर, मिरची पावडर, मिठाई, फरसाण आदी अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम ओमकार अंध केवक सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित केला होता. गेल्या ३६ वर्षांपासून या संस्थेच्या वतीने दरवर्षी अंध बांधवांसाठी हा कार्यक्रम पंतनगर येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदानात आयोजित केला जातो. संस्थेचे सर्वेसर्वा धर्मेश गिरी, अशोक देवरे पाटील, विपुल मेहता, प्रवीण तन्ना, नितीन शहा, निरुपा शहा, डॉ अनिल सॅम्युअल आदी या वेळी उपस्‍थित होते. शिवआरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी, समाजसेवक रवींद्र कोठवदे, दुर्गा परमेश्वरी मंदिर ट्रस्टच्या राखी जाधव यांच्या हस्ते अंध बांधवांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. या वेळी राज्यभरातून येणाऱ्या अंध बांधवांसाठी घाटकोपर रेल्वे स्थानक ते जनरल अरुणकुमार वैद्य मैदानापर्यंत सुमारे २०० रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. 00000

सोलापूर, रत्नागिरीच्या दोन्ही संघाची विजयी सलामी

 सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा  धाराशिव, जालना, सांगली, बीड, नाशिक यांचेही विजय धाराशिव : सोलापूर, रत्नागिरी व नाशिक या संघाच्या कुमार व मुली संघाने सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेची विजयी सलामी दिली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित केली आहे. रविवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या दिवशी सर्व सामने एकतर्फी झाले. सोलापूरच्या मुलांनी जालन्यावर २१-८ व मुलीनी बीडवर १७-५ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला. रत्नागिरीच्या मुलांनी लातूरचा १७-७ व मुलींनी नांदेडचा १९-६ असा एक डावाने धुव्वा उडवला. नाशिकच्या मुलांनी हिंगोलीला २६-४ तर मुलींनी नंदुरबारला २०-४ असे एका डावाने नमवले. मुलींच्या गटात धाराशिव, जालना व मुलांच्या गटात सांगली, बीड  यांनीही प्रतिस्पर्धी संघावर शानदार विजय मिळविले. चमकलेले खेळाडू :  कुमार : अहिल्यानगर (मच्छिंद्र वाघमारे, (३.१० मिनिटे संरक्षण व ६ गुण), रत्नागिरी (आशिष बालाडे ६ व ३ मिनिटे नाबाद),बीड (अभिषेक हिवाळे ३.५० मि. व २ गुण), सांगली (प्रेम दळवी१ मि.नाबाद व ८ गुण), सोलापूर (कृष्णा बनसोडे २.३५मि. व ३ गुण), (शुभम चव्हाण, ३ मि. नाबाद व २ गुण). मुली : सोलापूर (समृद्धी सुरवसे ४.२०मि.), (अनुष्का पवार, ५ गुण), रत्नागिरी (मृण्मयी नागवेकर ४.२० मि.), (युवा पालवे, ५ गुण) नाशिक (तेजल सहारे, ५.१० मि. व ५ गुण), धाराशिव (अश्विनी शिंदे, ३मि. व ४ गुण), प्रणाली काळे (१.३० नाबाद , ३.३० व २ गुण). अन्य निकाल : कुमार : अहिल्यानगर विजयी विरुद्ध नांदेड २२-८ एक डावाने, बीड विजयी विरुद्ध परभणी १२-११ (७.३० मिनिटे राखून), सांगली विजयी विरुद्ध जळगाव २२-८ एक डावाने. मुली : जालना विजयी विरुद्ध हिंगोली १२-२ एक डावाने, धाराशिव विजयी विरुद्ध परभणी १२-६ एक डावाने, पालघर विजयी विरुद्ध जळगाव १२-५ एक डावाने.…

कर्जत विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे अस्तित्व संपले ?

माथेरान : कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रावर तब्बल पंचवीस वर्षे राज्य केलेल्या राष्ट्रवादीचे अस्तित्व संपल्याचे या निवडणुकीमध्ये दिसून आले असून अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रेवादीचा एकही उमेदवार यावेळी रिंगणात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपले की काय अशा चर्चा होताना दिसून येत आहेत. माजी आमदार सुरेश लाड यांच्या स्वरूपात राष्ट्रवादीला कर्जत मध्ये एक मोठा सक्षम चेहरा लाभला होता ज्याने येतील राष्ट्रवादी वाढविण्यास व आपले अस्तित्व राखण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती परंतु पक्षांतर्गत घडामोडीनंतर त्यांना नाईलाजाने भाजपामध्ये जावे लागले व त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ही दोन गट पडल्याने कर्जत मधील राष्ट्रवादी खिळखिळी होत चालली होती परंतु  सुधाकर घारे यांनी मागील दोन अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यामार्फत राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचे काम केले होते व या काळात राष्ट्रवादीने चांगली घोडदोड ही केली होती त्यांच्या मागे राष्ट्रवादी रायगडचे खासदार श्री सुनील तटकरे असल्याने ते लवकरच या विधानसभा क्षेत्रात उमेदवार म्हणूनही उदयास आले. राष्ट्रीवादी मध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी जरी कमजोर झाली असली तरी आपले अस्तित्व टिकवून होती व या विधानसभा जागेवर आपला हक्क राखून होती परंतु युती आघाडीच्या स्वरूपात या जागा दोन्ही शिवसेनेला गेल्याने राष्ट्रवादीमध्ये बंड पाहावयास मिळाले व खालापूर कर्जत मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा घेत राष्ट्रवादी ला सुरुंग लावला त्याचे पडसाद हळूहळू कर्जत मधील सर्वच विभागात दिसून येत असून अनेक ठिकाणी पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाली असून त्याचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीलाच बसत आहे. या विधानसभा क्षेत्राचा केंद्रबिंदू कर्जत ठरत असल्याने सर्व घडामोडी येथेच घडत आहेत व त्याचे पडसाद पूर्ण तालुक्यामध्ये दिसून येत असतात सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन सावंत तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार  महेंद्र थोरवे यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे परंतु राष्ट्रवादी सोडून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेल्या सुधाकर घारे यांनी मोठे आव्हान उभे केले असून या विधानसभा क्षेत्रामध्ये धक्का तंत्र देण्याचे काम ते करतात का हे पाहावे लागणार आहे. सध्या शरद पवार राष्ट्रवादी गट शांत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच कर्जत मध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व संपले की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेक वर्षे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावरती राज्य केलेल्या राष्ट्रवादीचे अशी वाताहत का झाली व यास कारणीभूत कोण याबाबत जनता अनेकांना दोषी ठरवत असून अति महत्वकांक्षाच्या हव्यासापोटी राष्ट्रवादीच्या बालेकिल्लाचा बुरुज आज ढासळला आहे. 00000

कोपरी विभाग_🚩🚩शिवसेना 🚩🚩साईनाथ नगर शाखा_महिला शाखाप्रमुख पदी नेहा मानकामे यांची  नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र  शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे  ठाणे पुर्व मा नगरसेविका नम्रता पमनानी मालती पाटील व शर्मिला पिपलोकर  गायकवाड ‌तसेच कोपरी महिला विभाग प्रमुख सौ मनिषा ताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. ०००

दिलीप बारटक्के यांच्यातर्फे ३ नोव्हेंबरपासून ८ दिवसांच्या  ‘कोकण महोत्सवाचे आयोजन’

ठाणे : ठाण्यातील  सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ व दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ३ ते १० नोव्हेंबर २०२४ दरम्यान सावरकरनगर येथे भव्य स्वरूपाच्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महोत्सवाचे यंदा १७ वे वर्ष असून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथील ठा म पा शाळा क्रमांक १२० च्या मैदानात होणाऱ्या या महोत्सवात दररोज सायंकाळी सायं ६ ते रात्री ९:३० च्या दरम्यान  रोज ५ पारंपरिक दशावतार नाटके,  कोकणरत्न पुरस्कार, खेळ पैठणीचा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, मुलांसाठी फनफेअर, कोकण खाद्यपदार्थांचे स्टॉल. अशांची मेजवानी असेल.खाद्यपदार्थ स्टॉलवर झणझणीत म्हावरा, अस्सल चवीचो मालवणी मसालो, खडखडे लाडू, मालवणी खाजा, कुळदाची पिठी, सुकी मच्छी, मासे, कोकम,  काजू, आंबा अशा विविध प्रकारच्या स्टॉलचा समावेश असणार आहे.या महोत्सव ठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे मालवण तालुक्यातील  साळेल-नांगरभाट गावातील श्री गिरोबा  मंदिराची प्रतिकृती  साकारण्यात येणार आहे. या महोत्सवाला दरवर्षी  दीड ते दोन लाख नागरिक, कोकणप्रेमी, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत असणारे, कलाकार भेट देतात. या महोत्सवात सादर होणाऱ्या पारंपरिक मालवणी दशावतार प्रयोगाला दरवर्षी तुफान गर्दी होत असते. यंदा रविवारी ३ नोव्हेंबरला प्रेरणा कला संस्था निर्मित  “मला काही सांगायचंय!” मी अनाथांचा नाथ एकनाथ हा नाट्यप्रयोग होईल.लेखक- डॉ.प्रा.प्रदीप ढवळ,रंगावृत्ती -अशोक समेळ, डॉ.प्रा.प्रदीप ढवळ, दिग्दर्शक- अशोक समेळ निर्माता- प्रा. मंदार टिल्लू, प्रमुख कलाकार- संग्राम समेळ.सोमवार ४ नोव्हेंबरला   देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण आयोजित  ट्रिकसिनयुक्त महान पौराणिक “दशावतारी नाट्य प्रयोग क्षेत्रपाल श्री देव वेतोबा नाट्यप्रयोग होईल.५ नोव्हेंबरला लोकराजा, नटसम्राट कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर-कुडाळ आयोजित ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘व्यंकटेश पद्मावती’ सादर होईल. बुधवार ६ नोव्हेंबर रोजी  सुधाकर दळवी प्रस्तुत चेंदवणकर-गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग आयोजित ‘मुंबईची मुंबादेवी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होईल. ७ नोव्हेंबरला शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, दांडेली, आरोस, ता. सावंतवाडी आयोजित पौराणिक नाट्यप्रयोग ‘विंद्यवासिनी विंदेश्वरी’ सादर होईल. ८ नोव्हेंबर रोजी भाई कलिंगण प्रस्तुत बाबी कलिंगण कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कुडाळ आयोजित दशावतारी नाट्यप्रयोग ‘मुक्त झाली भानुमति’ सादर होईल. शिवाय, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा, खेळ पैठणीचा,  भजनाची डबलबारी, महाराष्ट्राची लोकधारा लोकगीते आणि नृत्ये असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘या कोकण महोत्सवाक यवकच होया’, असे आवाहन सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ व आयोजक दिलीप बारटक्के यांनी केले आहे. ०००००

वसईत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ

  विरार : विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली असतानाही महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नव्हता. यामध्ये वसई आणि नालासोपारा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर विजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने वसईमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. नालासोपारा मतदारसंघातून महाविकास आघाडी कुणाला तिकीट देणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गटाने पालघर आणि बोईसर मतदारसंघामधून उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी देण्यात येईल, असे संकेत मिळत होते. त्यानुसार काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत विजय पाटील यांना स्थान देत त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ प्रमाणेच वसईत हितेंद्र ठाकूर विरुद्ध विजय पाटील, असा सामना रंगणार आहे. मागील वेळी हितेंद्र ठाकूर हे २६ हजार मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी शिवसेना महायुतीकडून उमेदवार राहिले होते. या वेळी पक्षबदल करत काँग्रेसमध्ये गेले आहेत. महायुतीमधून अद्याप उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे नालासोपाऱ्यामधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने ठाकरे गट की काँग्रेस ही जागा लढवणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  

उल्हासनगरात मनसेकडून भालेराव रिंगणात

  उल्हासनगर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भगवान भालेराव यांची उल्हासनगर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. गेल्या वेळी भालेराव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढून तिसऱ्या क्रमांकाचे मते घेतली होती. उल्हासनगर रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले भगवान भालेराव यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली होती. मात्र शेवटच्या क्षणी ओमी कलानी यांची शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर, भालेराव यांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यासह राज ठाकरे यांची रविवारी भेट घेऊन समर्थकासह मनसेत प्रवेश केला. ठाकरे यांनी भालेराव यांची उल्हासनगरसाठी उमेदवारी घोषित केली. भालेराव महापालिकेचे उपमहापौर राहिले असून आंबेडकरी जनतेत त्यांचे वजन आहे. २०१९ साली त्यांनी अपक्ष म्हणून उल्हासनगर मतदारसंघातून निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाचे ८ हजार पेक्षा जास्त मते मिळविली होती. भालेराव यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी पराभूत झाल्याचे बोलले जाते. मनसेने भालेराव यांची उमेदवारी घोषित केल्याने, उल्हासनगर मतदारसंघात कलानी, आयलानी व भालेराव अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहर विकास कागदावर असल्याने, नागरिकांना आयलानी-कलानी ऐवजी तिसरा पर्याय हवा आहे. त्यामुळे नागरिक माझा विचार निश्चित करतील. असा विश्वास भालेराव यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.