Month: October 2024

 अमलीपदार्थ विक्री, व्यवसाय, वितरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा !

 मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे नितीन देशपांडे यांची मागणी   ठाणे : अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांना केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून, भारतात अमलीपदार्थांचा वापर मोठ्याप्रमाणात होताना दिसत आहे. देशभर पसरणारा व्यसनांच्या अजगराचा हा विळखा, तातडीने सोडविला गेला नाही तर, संपूर्ण तरुणपिढी आणि या देशाचं भवितव्य हा अजगर गिळंकृत करेल आणि व्यसनाधीन झालेल्या बेरोजगार तरुणांना गुलाम व गुन्हेगार बनण्यास किंवा बनविण्यास फार काळ लागणार नाही. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची आणि उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी नाही, किंबहुना अत्यंत चिंताजनक स्थिती या पुरोगामी राज्याची झालेली आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात अमलीपदार्थाचे सेवन करुन, एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने, अमलीपदार्थाचा मुद्दा ‘उडता पंजाब’च्या धर्तीवर, पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असून, मुंबई-पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतच नव्हे; तर, महाराष्ट्रातील छोटी शहरे व ग्रामीण भागांतदेखील अमलीपदार्थाच्या व्यवसायाने आपले जाळे भक्कमपणे विणायला सुरुवात केलेली आहे. अमलीपदार्थ सेवनाच्या माध्यमातून, मुंबई-महाराष्ट्रासह, संपूर्ण देशभरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याच्या घटना सर्रास पाहायला मिळत आहेत. परिणामी, अमलीपदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण, दिवसेंदिवस अधिकच उग्ररुप धारण करताना दिसत आहे. याचा प्रतिकूल परिणाम, आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता असल्याने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांना पत्र पाठवून, याप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्याची करण्यात आली आहे. दरम्यान, उपलब्ध गुन्ह्यांच्या (एफआरआय) आकडेवाडीनुसार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये अमलीपदार्थाच्या सेवनात आघाडीवर आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, मुंबई शहर हे, अमलीपदार्थाच्या सेवनात पहिल्या क्रमांकावर आहे. ही बाब प्रगत आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रासाठी प्रचंड लाजिरवाणी आहे. राज्यातील तरुणपिढी अमलीपदार्थाच्या विळख्यात पुरती गुरफटून गेल्याचेच यातून अधोरेखित होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रकरण अतिशय गंभीर आणि संवेदनशील बनलेले आहे. कारण, अमलीपदार्थाच्या पूर्णपणे आहारी गेलेल्या तरुणांना, काही गुन्हेगारी प्रवृत्तीची राजकीय मंडळी, आपल्या चुकीच्या कृत्यांसाठी या तरुणपिढीचा वापर करुन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एकीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपस्थित नसल्यामुळे, अन्नप्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांची तपासणी थंडावली आहे; तर, दुसरीकडे मात्र, अमलीपदार्थविरोधी पथकाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही, अवघ्या महाराष्ट्रभरात, अमलीपदार्थांचा बेसुमार वापर वाढीस लागून, व्यसनाधीनता मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर, या संपूर्ण देशविघातक कृत्यांची चौकशी करण्यासाठी, एक त्रिस्तरीय समिती नेमण्यात येऊन, अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रातून राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

 महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर आज अर्ज दाखल करणार 

  पनवेल : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत. तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर मताधिक्य मिळवून विजयाचा चौकार मारण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आणि हितचिंतक जमणार असून त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणारे आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. या मतदार संघाचे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपृर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत. प्रगती पासून दूर आणि भकास झालेल्या पनवेलला विकासाचा चेहरा देण्याचे काम त्यांनी केले, खऱ्या अर्थाने त्यांनी विधायक कामाने पनवेलला विकासकामांची ओळख करून दिली. कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व आले. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून कायम पहायला मिळते. आपल्या कार्यकौशल्यातून पनवेलचा विकास घडविणारे, वक्तृत्व, दातृत्त्व आणि नेतृत्त्व गुणसंपन्न नेता व समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा नेहमीच नागरिकांना अभिमान राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना जनतेचा कौल मिळणार असून सोमवारी ते तमाम जनतेच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ०००००

 काँग्रेसने लेखी करार पाळला नाही

 सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा आरोप, ३ उमेदवारांची घोषणा !   अनिल ठाणेकर ठाणे : आयाराम गयारामांना प्रोत्साहन, खोक्यांवर विकले गेलेल्यांना परत तिकिटे, जातीयवाद्यांशी संगनमत करणाऱ्यांना तिकिटे आणि समतावादी डाव्या आंबेडकरवादी पक्षांना स्थान नाही असा व्यवहार महाराष्ट्रात केल्यास महाराष्ट्राचाही हरियाणा झाल्याशिवाय राहणार नाही.लेखी करार  करून तो न पाळणे हा  लोकशाहीशी विसंगत व्यवहार आहे . काँग्रेसच्या लोकशाही विरोधी व्यवहाराचा निषेध करीत आहोत.सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आज साक्री–कॉम्रेड यशवंत देवमन मालचे,बागलाण– संजय संजय भिका निकम व नवापूर– रणजीत वंत्या गावित या तीन उमेदवारांची घोषणा करीत आहे* या व्यतिरिक्त धुळे ग्रामीण व शिंदखेडा, कन्नड, नंदुरबार या ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले नंदुरबार जिल्हाध्यक्ष गावित व धुळे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश मोरे यांनी केली. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष हा उत्तर महाराष्ट्रातील धुळे ,नंदुरबार, नाशिक तसेच संभाजीनगर,पुणे  जिल्ह्यात कष्टकरी शेतकरी आदिवासींच्या शेती, जल ,जंगल, जमीन व रोजगार हक्काच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत आला आहे.१९७८ सालापासून ते २०२३ च्या नंदुरबार ते मुंबई पायी बिढार  मोर्चा पर्यंत हा संघर्ष चालूच आहे. सत्यशोधक ने  शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व शेतीमालाला रास्त भाव या प्रश्नांवर सातत्याने अगदी दिल्लीच्या  संयुक्त किसान मोर्चापर्यंत विविध आंदोलनात सहभाग पुढाकार घेतला आहे. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने साक्री व नवापूर विधानसभा  निवडणूक सातत्याने लढवल्या आहेत  व दखलपात्र मतदान घेतलेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये लाल निशान पक्षाच्या समवेत नंदुरबार व धुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने नंदुरबार मध्ये २२ व धुळे लोकसभा क्षेत्रात १९ छोट्या-मोठ्या सभा संघटित करून संविधान वादी विचार व इंडिया आघाडीचा प्रचार गावोगाव पोहोचवला ,हे निकालात दिसलेच. नंदुरबार लोकसभा क्षेत्रात एडवोकेट गोवाल पाडवींना साक्री ५५ हजार व नवापूर मध्ये ६३ हजार एवढे मताधिक्य मिळवून देण्यात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्छाव फक्त ३ हजार मतांनी निवडून आल्या आहेत, त्यातही बागलाण, धुळे ग्रामीण व शिंदखेडा येथील सत्यशोधक आदिवासी व दलित मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे . याला काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाउ पटोले व इतर नेते स्वतः साक्षी आहेत. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाशी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या  धुळे व नंदुरबार जिल्हा  कमिटी यांनी राज्य नेत्यांसमोर लेखी करार केला होता. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या या करारात  सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षासाठी साक्री विधानसभा मतदारसंघ  सोडण्यात येईल व त्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील असे कलम तीन व चार मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या करारावर नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक व एड. गोवा पाडवी यांच्या वतीने माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी,नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष माननीय दिलीप नाईक, शिवसेना नंदुरबार संपर्कप्रमुख विद्याताई साळी तसेच राज्य कार्याध्यक्ष आमदार कुनालबाबा पाटील यांच्या समोर धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर आणि डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सामंजस्य करारा ची अंमलबजावणीची मागणी लोकसभा निवडणुकीनंतर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने सातत्याने केली. शरद पवार यांची दिल्ली येथे कम्युनिस्ट पक्ष मालेच्या कॉम्रेड राजाराम सिंग व कॉम्रेड सुदामाप्रसाद यां दोन खासदारांसह भेट घेतली त्यानंतर नानाभाऊ पटोले ,बाळासाहेब थोरात,डॉ सुधीर तांबे, सेनानेते आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे या सर्वांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडे साक्री व बागलाण या दोन विधानसभा मतदारसंघांची मागणी केली. कराराच्या प्रती सर्व नेते मंडळींना पुन्हा आठवणीसाठी देण्यात आल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ निरीक्षक रमेश चैनीतला यांनाही या कराराची प्रत देण्यात आली. परंतु या आठवणीनंतरही लोकसभा निवडणुकीतील डाव्या पक्षांचा पाठिंबा, त्यांनी कोणत्याही साधन  साधनसामुग्रीची वाट न पाहता केलेल्या प्रचार याकडे काँग्रेस पक्षाने कानाडोळा केला व छोट्या पक्षांना विशेषता डाव्यांना विचारात न घेता तिकीट वाटप करत आहेत. आज ते भाजपमधून आलेल्या आयाराम गयारामांना किंवा मागील निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्यांना उमेदवारी देत आहेत. परंतु जातीयवादाच्या विरोधात जीवाचं रान करणाऱ्या प्रसंगी बलिदान करणाऱ्या डाव्यांना नाकारत आहेत.काँग्रेसने याच पद्धतीचा व्यवहार हरियाणा मध्ये केला आहे. त्याचा परिणाम ते विसरलेले दिसतात. आयाराम गयारामांना प्रोत्साहन, खोक्यांवर विकले गेलेल्यांना परत तिकिटे, जातीयवाद्यांशी संगनमत करणाऱ्यांना तिकिटे आणि समतावादी डाव्या आंबेडकरवादी पक्षांना स्थान नाही असा व्यवहार महाराष्ट्रात केल्यास महाराष्ट्राचाही हरियाणा झाल्याशिवाय राहणार नाही. लेखी करार  करून तो न पाळणे हा  लोकशाहीशी विसंगत व्यवहार आहे . काँग्रेसच्या लोकशाही विरोधी व्यवहाराचा निषेध करीत आहोत. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आज साक्री–कॉम्रेड यशवंत देवमन मालचे,बागलाण– संजय भिका निकम व नवापूर– रणजीत वंत्या गावित या तीन उमेदवारांची घोषणा करीत आहे* या व्यतिरिक्त धुळे ग्रामीण व शिंदखेडा, कन्नड, नंदुरबार या ठिकाणी उमेदवार उभे करणे किंवा वेळप्रसंगी   मतदान संविधानवादी अपक्षा कडे वळवणे हा पर्याय आहे. जनतेनेही जातीयवादी,खोकेवादी उमेदवारांना जेथे महविकास आघाडीने तिकिटे दिली त्या काँग्रेस उमेदवारांऐवजी डाव्या फुले आंबेडकरवादी समाजवादी विचारांचा पर्याय स्वीकारावा व  निषेध व्यक्त करावा, असे आवाहन सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले नंदुरबार जिल्हाध्यक्ष गावित व धुळे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश मोरे यांनी केले आहे. ००००

हजारो कार्यकर्त्यांसमोर महेंद्रशेठ घरत यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा ?

पनवेल : आगामी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत.सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आग्रह केला. रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी हजारो कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांना भेटण्यासाठी शेलघर येथे आले असता उपस्थित हजारो कार्यकर्त्यासोबत महेंद्रशेठ घरत यांनी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करत असताना महेंद्रशेठ घरत म्हणाले की खरेतर लोकसभेची निवडणूक मावळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला पोषक होता परंतु उद्धव ठाकरे सेनेने आपला उमेदवार उभा केला व कोकणातील एकही सीट काँग्रेस पक्षाला मिळाली नाही. पुढील विधानसभेत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल असा आशावाद होता परंतु याही विधानसभेत रायगड जिल्ह्यात एकही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. काँग्रेस कार्यकर्ते आम्ही  कोणत्याही पक्षाचे ओझे उचलणार नाही असे म्हणणे होते. जोपर्यंत महाराष्ट्र प्रदेशचे नेते आदेश देत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करायचे नाही असे ते म्हणाले. तसेच बॅरिस्टर ए.आर.अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदारसंघ न देता भोपळा मिळाला त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रदेश चिटणीस तथा रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांच्यासमोर रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा  सादर केला. जनतेच्या संवाद सभेसाठी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उरण मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या मदतीशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण विधानसभेत काँग्रेस पक्ष किंगमेकर असेल.

दयानंद चोरघे यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी;

 चोरघे बाहेरील उमेदवार असल्याचा आरोप ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघात काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसचे नेते दयानंद चोरघे यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु उमेदवारी जाहीर होताच, हिरमोड झालेल्या इच्छूकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून तब्बल १९ जण इच्छूक होते. या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणीही जोर धरत होती. चोरघे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार महेश चौघुले असून या निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चौघुले यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे दयानंद चोरघे, माजी आमदार राशीद ताहीर मोमीन, विलास पाटील यांच्यासह अनेकजण उमेदवार मागणी करत होते. शनिवारी रात्री भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चोरघे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होताच, राशीद ताहीर मोमीन, विलास पाटील यांच्यासह काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. चोरघे हे भिवंडी ग्रामीण मतदार संघात राहतात. त्यामुळे चोरघे हे बाहेरील उमेदवार असल्याचा आरोप राशीद ताहीर मोमीन यांनी केला. भिवंडीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे राशीद ताहीर मोमीन असेही म्हणाले. चोरघे यांच्या उमेदवारी नंतर आता काँग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान चोरघे यांच्या समोर आहे. तर दुसरीकडे चोरघे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. भिवंडी लोकसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी काँग्रेसकडून चोरघे हे निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. परंतु त्यांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती. चोरघे यांच्या गटाकडून नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आले होते. या निवडणूकीत बाळ्या मामा यांनी भाजपचे नेते कपिल पाटील यांचा पराभव केला होता.

 तिरंगी, चौरंगी लढती

जिल्ह्यातील १५ पैकी ११ मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी बहुतांश उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती पाहायला मिळणार असून, शहरातील ‘नाशिक मध्य’ मध्ये तिरंगी, नाशिक पूर्व, देवळालीत दुरंगी, तर नाशिक पश्चिममध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. प्रतिष्ठेच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळांविरोधात शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना रिंगणात उतरवल्याने या ठिकाणी दुरंगी लढत रंगणार आहे. पालकमंत्री दादा भुसेंच्या मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये सद्यःस्थितीत तिरंगी लढत असेल. नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरीतही तिरंगी लढतीची शक्यता आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा असून, त्यापैकी महायुतीकडून १३, तर महाविकास आघाडीकडून १२ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपकडून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणी आता फरांदे विरुद्ध उबाठाचे वसंत गिते असा सामना रंगणार आहे. नाशिक पूर्वमध्ये भाजपचे अॅड. राहुल ढिकले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गिते अशी दुरंगी लढत होणार आहे. नाशिक पश्चिममध्ये मात्र बहुरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी भाजपच्या सीमा हिरेंसमोर उबाठाचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील यांच्यासह भाजपमधील बंडखोरांचे आव्हान असेल. देवळालीत आता सरोज अहिरे विरुद्ध योगेश घोलप अशी दुरंगी लढत आहे. मालेगाव बाह्यमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर उबाठाचे अद्वय हिरे यांच्यासह अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचे आव्हान असेल. नांदगावमध्ये तिरंगी, तर दिंडोरीत झिरवाळ यांच्यासमोर उबाठाच्या सुनीता चारोस्कर आणि बंडखोर धनराज महालेंचे आव्हान आहे. जिल्ह्यात अशा आहेत लढती नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजप) वसंत गिते (शिवसेना उबाठा) डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस बंडखोर) नाशिक पूर्व अॅड. राहुल ढिकले (भाजप) गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट) नाशिक पश्चिम सीमा हिरे (भाजप) सुधाकर बडगुजर (शिवसेना उबाठा) दिनकर पाटील (मनसे) दशरथ पाटील (स्वराज्य) देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) योगेश घोलप (शिवसेना उबाठा) मालेगाव बाह्य दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) अद्वय हिरे (शिवसेना उबाठा) बंडूकाका बच्छाव (अपक्ष) सिन्नर अॅड. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट) उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) नांदगाव सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) गणेश धात्रक (शिवसेना उबाठा)…

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील समस्या सोडवणार- डॉ हेमंत सवरा

  योगेश चांदेकर पालघरः मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावर पडलेले खड्डे, काँक्रीटीकरणाचे निकृष्ट काम, उड्डाणपुलाची अपूर्ण कामे यामुळे या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. वाहतुक कोंडी तर रोजची असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. हेमंत सवरा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह या महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करून त्यांना कामासंबंधी सूचना केल्या. लोकांना दिवाळीला तरी व्यवस्थित घरी जाता यावे, यासाठी काय नियोजन करायचे ते करा, असे त्यांनी बजावले. मुंबई-अहामदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न कायम आहे. नांदगाव, जव्हार फाटा आणि सातिवली येथील निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे नांदगाव फाटा ते सातिवली दरम्यानच्या सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. गुजरात मार्गिकेवर ढेकाळे वाघोबा खिंड, तर मुंबई मार्गीकेवर चिल्हार फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट मस्तान नाका,जव्हार, टेन नाका, वरई फाटा आदी वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरत आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीला बसतो. त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या कामात महामार्ग वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि मनोर पोलिस यांच्याशी याबाबत सवरा यांनी चर्चा केली. ठेकेदाराचे दुर्लक्ष नांदगाव फाटा आणि जव्हार फाटा उड्डाणपुलांचे काम करणाऱ्या आर. सी. पटेल या ठेकेदारांकडून वाहतूक नियमन करण्यासाठी ट्राफिक वार्डन नेमले जात नाहीत तसेच सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण, विद्यार्थी आणि कामगारांना बसत आहे.त्यामुळे पंधरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या प्रवासाला तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जात असून इंधनाच्या खर्चात वाढ झाली आहे. अंतर्गत रस्त्यांचा श्वासही कोंडलेला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मनोर-विक्रमगड रस्ता, वाडा-मनोर रस्ता, मनोर-पालघर रस्ता आणि वरई-पारगाव रस्त्यासह वरई फाट्यावरून पालघर जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या तसेच दहिसर-बहाडोली दरम्यानच्या अरुंद पुलावर वाहतूक मोठी कोंडी होत आहे. पुलाच्या दहिसर बाजूला वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर लांबीच्या रांगा लागतात. सिग्नल यंत्रणा कोलमडून पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या वाहन चालकांवर स्वतः वाहतूक नियंत्रणाची वेळ येते. पुलाला भगदाड मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथील सुसरी नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कायम वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून या पूलाच्या दुरुस्तीची होत होती; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.   कोट ‘खानिवडे पथकर नाका येथे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवाळीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी, महामार्ग अधिकारी, ठेकेदार तसेच वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन  जनतेला दिलासा देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. -डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर

चिपी-मुंबई विमानसेवा पूर्ववत सुरू करा..!

 माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी..! कुडाळ : चिपी( सिंधुदुर्ग) ते मुंबई ही ‘अलायन्स एअर ‘ कंपनीची विमान उड्डाणे नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी ऊबाठा शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किजरापू यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. राऊत यांनी निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या जिल्ह्याला  मोठ्या संख्येने भेट देतात.जिल्हात आर. सी. एस.(रुरल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस- उडान योजना )अंतर्गत दोन वर्षांपूर्वी चिपी विमानतळ सुरू झाले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’.या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ चिपी ‘ विमानतळाचा समावेश करण्यात आला, त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास सोपा झाला होता. तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांच्या कार्यकाळात तत्कालीन  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर २०२१ पासून चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यान ‘अलायन्स एअर ‘ची उड्डाणे सुरू झाली.याचा पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा झाला. मात्र २६ ऑक्टोबर पासून ही विमान सेवा( उड्डाणे) आम्ही बंद करत आहोत असे कंपनीने अलिकडेच जाहीर केले आहे. गेल्या तीन वर्षात पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या हवाई सेवेला देश-विदेशातील नियमित स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यानची उड्डाणे बंद करण्याचा ‘अलायन्स एअर’ कंपनीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे असे निवेदनात म्हटले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील पर्यटन व्यवसायावर याचा विपरीत आणि दूरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे या विषयाकडे आपण वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे आणि सार्वजनिक हितासाठी ‘अलायन्स एअर ‘ ला चिपी ते मुंबई दरम्यान नियमितपणे उड्डाणे सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी,

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची तिसरी यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या ९ जणांच्या यादीमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून त्यांना अणुशक्तीनगर येथून तिकीट देण्यात आलं आहे. अभिनेत्रीचे पती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वरा भास्करचे पती फहाद अहमद विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने काही दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून फहाद अहमद हे अणुशक्तीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र आता त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना अणुशक्तीनगरसाठी तिकीट देण्यात आलं आहे. कोण आहे फहाद अहमद? अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांनी २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते तेथे युवा आघाडीचे अध्यक्ष होते. त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी माफीच्या मुद्द्यावरुन त्यांनी अनेकदा आंदोलनं केली होती. दरम्यान, मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा ही नवाब मलिक यांचा बालेकिल्ला मानला जातो. या जागेवर आता नवाब मलिक आमदार आहेत. नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंगसारखे आरोप आहेत. याप्रकरणात त्यांना अटक झाली होती. ते जेलमध्ये होते. त्यामुळेच त्यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली नसल्याचं बोललं जातं. मात्र २०२४ च्या विधानसभेसाठी आता यांच्या मुलीला सना मलिक यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात सना मलिक यांची चांगली पकड आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या गटाकडून फहाद अहमद आणि अजित पवारांच्या गटाकडून सना मलिक यांना अणुशक्तीनगरची जागा दिल्यानंतर कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

कपिल पाटील फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये दिवाळी पहाट

 अभिजीत सावंत, प्राजक्ता शुक्रे खास आकर्षण कल्याण : कपिल पाटील फाउंडेशनतर्फे यंदाही कल्याणमधील साई चौकात २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी-हिंदी गीतांबरोबर हास्य कलाकार आणि भारतातील प्रसिद्ध बंजारा ग्रुपचे बेली नृत्य पाहण्याची पर्वणी कल्याणमधील हजारो रसिकांना मिळणार आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी कल्याण पश्चिममधील साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही, कल्याणमधील रसिकांसाठी कपिल पाटील फाउंडेशनने शनिवारी दिवाळी पहाट कार्यक्रम भरविला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो कल्याणकरांना अविस्मरणीय मैफल अनुभवता येईल. या कार्यक्रमात इंडियन आयडॉल विजेता व बिग बॉस फेम गायक अभिजीत सावंत, गायिका प्राजक्ता शुक्रे, भूमी त्रिवेदी, जुईली जोगळेकर यांच्याकडून बहारदार गीते सादर होतील. तर प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्या विनोदी किस्स्याने हास्याचा गडगडाट होईल. त्याचबरोबर प्रसिद्ध `बंजारा स्कूल ऑफ डान्स’च्या कलाकारांनी बॅलेसह सादर केलेल्या दिलखेचक अदा आणि मनमोहक नृत्य पाहता येईल.सर्व कल्याणकरांनी २ नोव्हेंबर रोजी साई चौकात दिवाळी पहाटमध्ये सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.