तिसाई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्याना मार्गदर्शन
कल्याण : 11 फेब्रुवारीला बारावी तर 21 फेब्रुवारी पासून दहावी स्टेट बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. कल्याण पूर्वेत माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून तिसाई प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी दहावी बारावी नंतर काय.? करिअर मार्गदर्शन व बोर्ड परीक्षेची भीती कमी व्हावी याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच करियर मार्गदर्शन पुस्तिका व बोर्ड परीक्षेकरिता मोफत साहित्य दिले जाते. यावर्षी देखील आमदार सुलभा गायकवाड यांच्यामार्फत तिसगाव तिसाई मंदिराच्या परिसरात मार्गदर्शन व परीक्षेकारिता मोफत साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.
महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, दहावी बारावी पास होणे फार सोपे आहे अंतर्गत मूल्यमापनात शाळांकडून विद्यार्थ्यांना समाधानकारक गुण दिले जातात. लेखी परीक्षेत मोजकेच गुण मिळाले तरी विद्यार्थी पास होतात. बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात एक दिवसाआड पेपर असल्यामुळे अभ्यासाला देखील वेळ मिळतो सर्व विषय पास आहे, एका विषयात कमी गुण आहेत अशावेळी बोर्ड आपल्याला बोनस गुण देत असते. म्हणून पास होणे फार सोपे आहे परीक्षेची भीती बाळगू नका. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन गुणवत्तेनुसार गुण मिळवा असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्याना केले.
पालकांना सुद्धा सांगणे आहे आपल्या मुलांवर टक्केवारीचे ओझे लादू नका. त्यांच्या कुवती प्रमाणे त्यांना गुण मिळवू द्या. काठावर पास झाला तरी त्याला कॉलेजला प्रवेश मिळणारच आहे. असेही गुलाबराव पाटील म्हणाले. कार्यक्रमाला 1800 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. एमकेसीएलचे प्रवक्ते सुरेश जाधव, नीट आयआयटी लेक्चरर विवेक शर्मा यांचेही दहावी बारावीनंतर काय.? यावर मार्गदर्शन झाले. विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन पुस्तिका आणि परीक्षेकरिता शैक्षणिक साहित्य मोफत आमदार सुलभा गायकवाड व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला अमित धानजी, मनोज माळी, प्रमोद माने, विशाल जोगदंड, दिपक गायकवाड आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ऐटम यांनी केले तर आभार अविनाश ओंबासे यांनी मानले.