सर्वोत्तम नृत्य नाटकाचा अनुभव प्रेक्षकांना विनामूल्य घेता येणार
वरळीच्या नेहरू सेंटरच्या वतीने वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रेक्षकांनी प्रतिक्षा करावी असे कार्यक्रम येथे पाहायला मिळतात. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता यावे या दृष्टीने त्याची रचना केली जाते. नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांनी सर्वोत्तम आणि संस्मरणीय म्हणावेत अशा तीन नृत्य नाटकांचा सांस्कृतिक सोहळा अनुभवता येईल. १४ ते १६ जानेवारी  २०२६ दररोज सायंकाळी ७ वाजता हा नृत्य नाटकांचा अविष्कार वरळीच्या नेहरू सेंटरच्या नाट्यगृहात प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून असलेल्या संस्थांना निमंत्रित केले आहे. बुधवार १४ जानेवारी ‘क्रॉसिंग ओशन्स’ हा नृत्य नाट्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रीक, जापनीज, ऑस्ट्रेलियन नृत्य शैलीचा मिलाप या नृत्यात पाहायला मिळणार आहे. ज्यात ओडिसी, छाऊ आणि इतर नृत्यांचा विचार झालेला आहे. संकल्पना आणि निर्मिती दक्षा मशरूवाला यांची असून त्या स्वतः ओडीसी नृत्याच्या अभ्यासिका आहेत. कौशिकी डान्स अकॅडमीच्या वतीने ही कलाकृती सादर केली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १५ जानेवारी ‘इंद्रायणी काठी’ हा कथ्थक नृत्य शैलीतला नृत्य नाट्य अविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे. भगवान विठ्ठल त्याची महती नृत्यातून आणि अभंगातून अधोरेखित केली जाणार आहे. सरिता कालेले यांची ही संकल्पना असून त्याची निर्मिती सुद्धा त्यांनीच केलेले आहे. अमाद सोसायटी फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे कलाकार ही कलाकृती सादर करणार आहेत. नृत्य नाटकाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी महोत्सवात ओडिसी शास्त्रीय नृत्यांगना गुरु शुभदा वराडकर आपल्या ग्रुपसह ‘कनुप्रिया’ ही ओडिसी नृत्य शैलीतली नृत्य नाटिका सादर करणार आहेत. राधा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या नात्याची गोष्ट यात पाहायला मिळेल. भक्ती, निस्सिम प्रेम नृत्यातून दाखवताना  अभिनयाला प्राधान्य देणार ही कलाकृती असल्यामुळे  नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची पदवी संपादन केलेले अभिनेते, दिग्दर्शक शिवदास घोडके यांनी ही बाजू सांभाळलेली आहे. या महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका शुक्रवार ९ जानेवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून नेहरू सेंटरच्या बुकिंग काउंटरवर देणे सुरू केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *