Month: March 2026

भारताचे प्लास्टिक निर्यात ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य

मुंबईत ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ला प्रारंभ भारताचे प्लास्टिक निर्यात ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य मुंबई : प्लास्टिक अंतिम उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले पहिलेच उद्योग ते उद्योग प्रदर्शन आणि खरेदीदार-विक्रेता व्यासपीठ…

‘बिट्टू बॉस’ बिबट्याच्या आठवणींना सरनाईक कुटुंबियांचा भावनिक उजाळा

‘बिट्टू बॉस’ बिबट्याच्या आठवणींना सरनाईक कुटुंबियांचा भावनिक उजाळा अनिल ठाणेकर ठाणे, सहा वर्षांपूर्वी पूर्वेशच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी नॅशनल पार्क येथून दत्तक घेतलेला बिबट्याचा बछडा ‘बिट्टू बॉस’ आता कायमचा निरोप देऊन गेला. या छोट्या जीवाच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अशी भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. प्रताप सरनाईक म्हणाले ‘बिट्टू बॉस’ हा केवळ एक प्राणी नव्हता, तर कुटुंबाचा जिव्हाळ्याचा सदस्य बनला होता. त्याच्या निरागस हालचाली, लाघवी स्वभाव आणि प्रेमळ वागणुकीने सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. गेल्या सहा वर्षांत त्याने कुटुंबीयांशी एक अतूट नातं जोडले होते. आता त्याच्या जाण्याने घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या आठवणी दाटून आल्या आहेत. त्याच्यासोबत घालवलेले क्षण, त्याचा निरागसपणा आणि जिव्हाळा हे सर्व आता स्मरणरूपानेच उरले आहेत. आमच्या साठी ही अपूरणीय हानी असून, ‘बिट्टू बॉस’ची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘बिट्टू बॉस, तुझ्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो,’ अशा भावनिक शब्दांत सरनाईक कुटुंबीयांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जिल्हा परिषदेत शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन

जिल्हा परिषदेत शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन अनिल ठाणेकर ठाणे, स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी देशासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. वल्लभ जोशी, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) डॉ. किर्ती डोईजोडे, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे या अमर क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गावरील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करा – वर्षा गायकवाड

मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गावरील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करा – वर्षा गायकवाड नवी दिल्ली : मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या कामामुळे हजारो कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्या घरांवर तोडफोडीचे संकट निर्माण झाले आहे.  स्थानिकांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. ही फक्त झोपडपट्टी नाही, तर हजारो कुटुंबांचे संसार आणि त्यांच्या मुलांचे भविष्य आहे. या लोकांनी कष्टाने उभारलेल्या घरांचे संरक्षण व्हावे व  त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत शून्य प्रहरात कुर्ला ट्रॉम्बे झोपडपट्टीवासियांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, कुर्ला–ट्रॉम्बे मार्गालगत असलेल्या ३,१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्यासाठी रेल्वे प्रशासन नोटीसा पाठवत आहे. ही झोपडपट्टी दोन दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात असून हजारो गरीब व कष्टकरी कुटुंबांचे ते घर आहे. ३,००० हून अधिक झोपड्या पाडणे हे अमानवी व अव्यवहार्य असून हजारो कुटुंबे रातोरात बेघर होतील. हे पाडकाम करण्याआधी बाधित कुटुंबांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करावे. मुंबईत लाखो नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, केंद्र सरकारच्या जागेवरील या लोकांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे ठोस धोरणाच नाही. राज्य आणि केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी धोरण तयार करावे. या विषयावर संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली आहे, सरकारने या लोकांना बेघर करू नये असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

भोंदू खरातचा हायटेक बनाव!

भोंदू खरातचा हायटेक बनाव! 20 फुटी ‘ड्रोन’ नागाचा चमत्कार दाखवून करायचा वशीकरण हरिभाऊ लाखे नाशिक :भाविकांची फसवणूक करण्यासाठी अशोक खरात वेगवेगळे फंडे वापरायचा. त्यातील त्याचा २० फुटी नागाचा फंडा सध्या जोरदार चर्चिला जात आहे. त्याच्या या अजब प्रकाराला पोलिसांनी दुजोरा दिला असून, यातून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत खरात हा व्हायग्रा गोळ्यामिश्रित पाणी, ज्यास तो ‘ओस्नो जल’ असे संबोधायचा. तसेच रत्न खडे देऊन भाविकांची आर्थिक लूट करीत असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. आता २० फुटी नागाचा हा प्रकार तो भाविकांचे वशीकरण करण्यासाठी करीत होता. हा प्रकार त्याच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान येथे दररोज सायंकाळच्या सुमारास चालयचा. अंधार पडायला लागला की, तो भाविकांना एका ठिकाणी बोलवायचा. त्या ठिकाणी तंत्र-मंत्र करीत, २० फुटांचा नाग स्वतःकडे बोलवायचा. नागदेखील सरपटत त्याच्यासमोर येऊन फणा काढून उभा राहायचा. हा नाग बघून उपस्थित भाविकांची बोलतीच बंद व्हायची. खरात सांगेल, त्या पद्धतीने नाग हालचाली करायचा. त्यानंतर खरातच्या आदेशावरून साप निघून जायचा. हा सर्व प्रकार झाल्यानंतर खरात उपस्थितांना मी नागाला वश केल्याची बतावणी करायचा. खरातचा हा चमत्कार बघून अनेक जण अचंबित व्हायचे. खरातचा हा प्रकार बघून अनेक जण प्रभावित व्हायचे. तो सांगेल त्या पद्धतीने लोक वागायचे. पुढे त्याला बळीही पडायचे. मात्र, प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार वेगळाच होता. हा साप खोटा होता. त्याने कागदाच्या लगद्यापासून हा साप तयार केला होता. त्यात ड्रोन यंत्रणा बसवली होती. त्याचे रिमोट तो स्वतःकडे ठेवायचा. रिमोटच्या साहाय्याने तो त्या खोट्या सापाला त्याच्या इशाऱ्यावर फिरवायचा. ही बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अल्पवयीन पीडितेची आपबिती खरातने अल्पवयीन मुलीवर देखीलदुष्कर्म केले. या मुलीने पुढे येत आपबिती सांगितली आहे. खरातने केबिनमध्ये बोलावून घेतले. मी येताच, त्याने केबिनचा लॅच बंद करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तांब्याच्या भांड्यात पाणी मला पिण्यास दिले. त्या पाण्याची चव खूपच खारट आणि कडवट होती. पाणी प्यायल्यानंतर मला मळमळ व्हायला लागली. मी पाणी पिण्यास नकार दिला. मात्र, खरातने मला म्हटले की, तू जेवढे जास्त पाणी पिणार, तेवढे जास्त तुला फळ मिळणार. नंतर पाणी भरलेला ग्लास त्याने माझ्या डोक्यावर ठेवून उभे राहण्यास सांगितले. तसेच गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितले. मात्र, ते म्हणत असताना माझे डोके जड व्हायला लागले. तेवढ्यात खरातने त्या रूममधील लाइट बंद केली. त्यावेळी ‘मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझी राधा आहेस’ असे सारखे कानाजवळ पुटपुटत त्याने जबरदस्ती केली आणि माझ्यावर बलात्कार केला. खरातला गावबंदीचा ठराव खरातच्या दर्शनाला मिरगावात अनेक नेते मंडळी येत होती. अगदी कलेक्टरपासून बडी अधिकारी मंडळी येथे बाबाच्या सेवेला हजर असायची. मिरगावातील अनेक ग्रामस्थांना खरातने दहशतीखाली ठेवले होते. सुरुवातीला ईशान्येश्वर महादेवाच्या मंदिर संस्थानात गावातील मंडळी पूजेसाठी दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला जमायची. नंतर खरातचे कारनामे कळाल्यानंतर या लोकांनी तेथे जाणे बंद केले. गावातील अनेक तरुणांवर खोटे आरोप करून त्यांना अटक करायलादेखील भाग पाडण्यात खरातचा हात होता असे मिरगावचे रहिवासी सांगत आहेत. आता या ईशान्येश्वर मंदिर संस्थानाचे मंडळ बरखास्त करून ते गावाच्या ताब्यात द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहेत. तसेच वर्षानुवर्षे खरातच्या दहशतीखाली दबलेले गावकरी आता निर्भयपणे पुढे येत आहेत. मिरगावात मंदिर बांधल्यानंतर खरातने एका शेतकऱ्याची वहिवाट बंद केली होती. त्यामुळे त्याला राहते घर सोडून गेल्या आठ महिन्यांपासून पत्र्याच्या खोलीत राहावे लागत असल्याचे गावकरी सांगत आहेत. त्यामुळे अशा विकृत वृत्तीच्या व्यक्तीला पुन्हा गावात स्थान द्यायचे नाही, असा निर्धार करीत गावकरी खरातविरोधात गावबंदीचा ठराव आणणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. जाधवकडे ४० महिलांचे मोबाइल नंबर खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवकडे तब्बल ४० महिलांचे मोबाइल नंबर असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी नीरजचा मोबाइल ताब्यात घेतला असून, तो यातील किती महिलांच्या संपर्कात होता, याचा तपास केला जात आहे. तसेच नीरजकडे मिळालेले हे नंबर खरातला बळी पडलेल्या महिलांचे तर नाहीत ना? यादृष्टीनेदेखील तपास केला जात आहे.

मुंब्रा पोलीस स्टेशनकडून रमजाननिमित्त गरजूंना राशन किट वाटप

मुंब्रा पोलीस स्टेशनकडून रमजाननिमित्त गरजूंना राशन किट वाटप दिवा: पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजवंत नागरिकांसह शासकीय कामात सहकार्य करणाऱ्या पोलीस…

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले. मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव आदी उपस्थित होते.

तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल

तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल रमेश औताडे मुंबई : डॉ.आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून समानतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. मात्र आजही सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे शासनाने पाणी सर्वांसाठी मोफत केले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली शासनाकडून वाहिली गेली असे सिद्ध होईल. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, भोजराज वैद्य, प्रमुख पाहुणे धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले.पुण्यशील बोदिले.अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर उपस्थित होते. नारायण बागडे यांनी असे अनेक उपक्रम राबवत शासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र सरकार या सूचना अंमलात आणत नाही. याचे मोठे दुःख आहे असे धर्माजी बागडे यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण शहापूरात वन्यप्राण्यांसाठी आणलेले कृत्रिम पाणवठे काष्ट विक्री आगारात पडून अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी कृत्रिम पाणवठ्यांचा पुरवठा करण्यात आला होता.परंतु धक्कादायक वास्तव म्हणजे हे बशीच्या आकाराचे सरकारी पाणवठे मार्च महिना संपत आला तरीही वनविभागाकडून जंगलात अद्यापही बसविण्यात आले नाहीत हे पाणवठे चक्क आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचे संतापजनक चित्र येथे दिसत आहे.जंगलात पाणवठे न ठेवता अगदी निष्काळजीपणे हे कृत्रिम पानवठे येथे टाकून देण्यात आले आहेत.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे. उपवनसंरक्षक,कार्यालयाच्या प्रादेशिक वनविभागाच्या,शहापूर,धसई,डोळखांब,वाशाळा,विहीगाव,खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात हे कृत्रिम बशीच्या आकाराचे पाणवठे दाट जंगलात बसविण्यात येणार होते.येथील विस्तीर्ण व घनदाट अशा जंगलात बिबटे,तरस,कोल्हे,भेकर,नीलगाय चौशिंग,ससे,रानडुक्कर,वानर,रानमांजर यांसह अन्य लहान वन्यप्राणी व दुर्मिळ अशा पक्ष्यांचा अधिवास आढळतो.या प्राण्यांना उन्हाळ्यात जंगलातच त्यांच्या अधिवासात पिण्यासाठी पाणी मिळावे तसेच पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांनी जंगल सोडून गाव वस्त्यांवर व इतरत्र स्थलांतर करू नयेत यासाठी सरकारने बशीच्या आकाराचे  कृत्रिम असे पाणवठे म्हणजेच वॉटर होल जंगलात ठेवण्यासाठी वनविभागाला पुरवठा केले होते या कृत्रिम पाणवठ्यात वनविभागाकडून टँकर अथवा बैलगाडीने पाणी आणून ओतले जाणार असे प्रयोजन होते हे पाणवठे खरेदीसाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला. परंतु हे कृत्रिम पाणवठे उन्हाळ्यातील मार्च महिना संपत आला तरीही जंगलात अद्यापही बसविण्यात आलेच नाहीत हे पाणवठे येथील काष्ट विक्री आगारात पडून असल्याचे संतापजनक असे चित्र पाहावयास मिळत आहे.जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली दिसत नाही.परिणामी पाण्याच्या शोधात पाणवठ्याकडे येणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्याअभावी येथून माघारी फिरावे लागते आहे.उन्हाच्या काहीलीनं पाण्यसाठी तहानेने व्याकूळ झालेल्या असंख्य वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची पाण्याअभावी जंगलात घुसमट होत आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षरशः बेफिकिर व निष्काळजीपणामुळे हे पाणवठे जंगलात उन्हाळ्यात वेळेवर बसविण्यात आले नसल्याने परिणामी वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलात वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. याकडे प्रादेशिक वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.

शासनाचे ऑनलाइन व्यवहारामुळे, सुरक्षित असणारी तिजोरी उघड्यावर

शासनाचे ऑनलाइन व्यवहारामुळे, सुरक्षित असणारी तिजोरी उघड्यावर राजीव चंदने मुरबाड :सध्याचे संगणकीय युगात शासनाची सर्व देवाण घेवाण हि ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने एकेकाळी प्रत्येक कार्यालयात. सुरक्षित असणाऱ्या तिजोरीची देखभाल करण्यासाठी कार्यालयात चौकीदाराचे पद असायचे.परंतु मुरबाड तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाची तीच तिजोरी आज उघड्यावर पडलेली दिसुन येत असल्याने तिची विल्हेवाट लावणार कशी हा सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे. शासनाचे प्रत्येक कार्यालयाला येणाऱ्या  अनुदानाची  रोख रक्कम बॅकेत न ठेवता ती लोखंडी आणि अवजड तिजोरीत ठेवली जात असे.तिच्या चाव्या या मुख्य लेखाधिकारी यांच्याकडे असायच्या. कार्यालयाला जेव्हा एखादी वस्तु रोखीने खर्च करायची असेल किंवा एखाद्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन करायचे असेल तेव्हा कार्यालय प्रमुखांचे सहमतीने पाहिजे तेवढीच रक्कम काढली जात असे.आणि खर्च रक्कम व तिजोरीत शिल्लक रक्कम याचे रजिस्टर ठेवले जायचे , विशेष म्हणजे दसरा दिवाळी तसेच इतर सणांच्या वेळी या तिजोरीची मनोभावे पूजा देखील केली जात असे.सायंकाळी कार्यालय बंद झाल्यावर लेखाधिकारी हे काळजीपूर्वक ती तिजोरी बंद करून ती इतर कोणी बनावट चावीने खोलुन त्यातील रोख रक्कम गायब करु नये, यासाठी त्या तिजोरीला कागदी सील लावुन त्यावर तो स्वतःची सही करत असे.आणि दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यावर पहिल्यांदा तो त्या तिजोरीची पाहणी करत असे.एवढी सुरक्षितता आणि खबरदारी घेतली जात होती.परंतु आज संगणकीय युगात शासनाचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने या लोखंडी तिजोऱ्या कालबाह्य झालेल्या दिसत आहेत तर काही अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या आढळून येत असुन सामाजिक वनीकरण विभागाने ती आता उघड्यावर फेकलेली दिसत आहे.