Month: March 2026

सेशेल्समध्ये आयएनएस ‘त्रिकंद’चा दमदार सागरी ठसा

सेशेल्समध्ये आयएनएस ‘त्रिकंद’चा दमदार सागरी ठसा ‘लामितिये 2026’ सरावात भारतीय नौदलाचा पहिलाच सहभाग मुंबई : भारतीय नौदलाचे अदृष्यता-क्षम युद्धनौका आयएनएस त्रिकंदने २० मार्चला पोर्ट विक्टोरिया येथील यशस्वी बंदर भेट पूर्ण करून तेथून प्रस्थान…

सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व!

सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत यांचे कामगार मेळाव्यात गौरवोद्गार! मुंबई-आज राजकारणात बरीच माणसे इकडून तिकडे पळत आहेत.परंतु सचिन अहिर असे व्यक्तिमत्व आहे की,पक्षात आले ते नुसते स्थिरावलेच नाहीत तर ‌मजबूतीने‌ काम करीत आहेत. ते एक निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच. परंतु पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेत मुंबई शहरातील सर्वसामा न्यांच्या विशेषतः गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुटून पडत आहेत! असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना कामगार नेते सचिन अहिर यांचा गुणगौरव करतांना काढले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांचा वाढदिवस आणि ते नेतृत्व करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय‌ कामगार संघाचा ३० वा वर्धापनदिन काल परेलच्या‌ महात्मा गांधी सभाग्रहात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला,त्यावेळी माजी केंद्रीयमंत्री आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आमदार सचिन अहिर यांचे अभिष्टचिंतन करताना बोलत होते. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष सचिन अहिर यांच्या कन्या ऐश्वर्या यांचाही वाढदिवसानिमित्त येथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी खासदार अरविंद सावंत,सचिन अहिर यांचा गुणगौरव करताना पुढे म्हणाले, ते निश्चितच चाणक्य आहेत,याचे कारण विधानपरिषदेत जरा जरी चुकीचे विधान केले गेले तर त्याचा खुलासा करून घेतल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत.तेव्हा सामान्यांच्या प्रश्नावर शासकीय स्तरावर चलढकलपणा स्वीकारून जर त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही धडाकेबाज कामातून ते दाखवून डदेऊ,असाही निग्रह खासदार अरविंद सावंत यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात‌ बोलताना व्यक्त केला.खासदार अरविंद सावंत यांनी अहिर यांच्या कन्या ‌कुमारी ऐश्वर्या यांचाही वाढदिवसानिमित्त गुणगौरव केला आहे.  त्यावेळी सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले ,सचिनभाऊ अहिर यांनी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून,युनियनचे‌‌ काम संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरातपर्यंत वृद्धिंगत केले आहे. संघर्ष आणि संयम यांची अचूक सांगड घालत राज्याच्या विविध औद्योगिक क्षेत्रात त्यांनी युनियनचे कार्य विस्तारत नेले आहे. याप्रसंगी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे नेते ऍड. बबन मोरे,सत्यवान उभे, रमाकांत बने आदींनी आपल्या भाषणात अध्यक्ष सचिन अहिर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार अजय चौधरी तसेच मुंबई पुण्याकडील अनेक लोकप्रतिनिधींनी सचिन अहिर यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी सर्वश्री राजन लाड,मिलिंद तांबडे,सुनील अहिर, उत्तम गीते,संजय कदम, विजय काळोखे,सुनील बोरकर, बजरंग चव्हाण, शिवाजी काळे,साई कुमार निकम,किशोर रहाटे,अवधेश पांड्ये,विश्वनाथ सावंत  आदी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. अध्यक्ष सचिन अहिर यांचा वाढदिवस आणि ‌युनियनचा वर्धापन कामगार प्रतिनिधींनी रक्तदान, वृक्षारोपण,क्रीडा सामने आदी‌ सार्वजनिक उपक्रमाने संपन्न केला.

 सरकारच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा आझाद मैदानात जल्लोष

सरकारच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा आझाद मैदानात जल्लोष रमेश औताडे मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांच्या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनने पुकारलेले ‘वर्षा’ निवासस्थानावरील आंदोलन यशस्वी झाले व सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा जल्लोष आझाद मैदानात पाहायला मिळाला. म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो सफाई कामगार आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकले होते. यावेळी झालेल्या चर्चेत सरकारने सफाई कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर लवकरच ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शासन निर्णयाची (GR) प्रभावी अंमलबजावणी करून कामगारांना न्याय दिला जाईल, असे संकेत दिले. अशोक जाधव यांनी स्पष्ट केले की, “आम्ही सरकारवर विश्वास ठेवून तूर्तास आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र सरकारने दिलेल्या शब्दाला सरकार जर जागले नाही तर अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा जाधव यांनी दिला.

लहुजी साळवे नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करा

लहुजी साळवे नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करा रमेश औताडे मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आणि महाक्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई उपविभाग प्रमुख नरसिंग सोपानराव सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन टपालाने  पाठवले आहे. भारतीय लहुजी सेनेने आपल्या निवेदनात मांग समाजातील तरुणांच्या रोजगाराचा आणि लष्करी प्रशिक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे. निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः स्वतंत्र मांग बटालियनची निर्मितीः समाजाच्या शौर्याचा वारसा जपत ‘मांग बटालियन’ची स्थापना करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना या बटालियनमध्ये विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना तातडीने सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. सर्व पोटजातींचा समावेशः मांग समाजातील एकूण १२ पोटजातींमधील तरुणांना याचा लाभ मिळावा. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादिक, मादिक, दानखणी मांग, मांग मटाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, तसेच २२ मे २०१२ च्या निर्णयानुसार समाविष्ट मादगी आणि मादिगा या जातींचा उल्लेख पत्रात केला आहे. मंत्रालयाने १७ मार्च २०२६ रोजी त्याची दखल घेत त्यावर स्वाक्षरी केली आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.

मुंबई इंडियन्सचे बँकिंग भागीदार उत्कर्ष स्मॉल फायनान्स

मुंबई इंडियन्सचे बँकिंग भागीदार उत्कर्ष स्मॉल फायनान्स रमेश औताडे मुंबई : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) टी-२० २०२६ च्या लीगसाठी ‘ मुंबई इंडियन्स ‘ चे अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून निवड झाली असून बँकेने या महत्वपुर्ण भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीच्या माध्यमातून बँक आपली राष्ट्रीय स्तरावरील ओळख वाढवण्याबरोबरच देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांशी आपले नाते अधिक दृढ करत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद सिंग, मुख्य वित्त अधिकारी  सरजुकुमार प्रवीण सिमारिया आणि कन्झ्युमर बँकिंग प्रमुख सौरभ घोष तसेच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या भागीदारीचा एक भाग म्हणून, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे चे उद्दिष्ट विविध ग्राहक वर्गांशी आपला संवाद आणि सहभाग वाढवणे, तसेच या हंगामादरम्यान राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक मार्केटिंग उपक्रमांद्वारे व इतर नियोजित कार्यक्रमांद्वारे आपल्या ब्रँडची उपस्थिती करणे आहे.

सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे !

सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे ! आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानातून सवाल रमेश औताडे मुंबई : आमची जमीन, आमचा समुद्र, आमचा निसर्ग आणि आमचे अस्तित्व वाचविण्यासाठी व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात आझाद मैदानात महामोर्चा काढत, “ सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे “ असा सवाल करण्यात आला. आदिवासी, मच्छीमार व इतर वंचित घटकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने भर उन्हात सहभाग नोंदवला. मच्छीमार नेते व आयोजक कमिटीचे सर्व सदस्य, नारायण पाटील संघर्ष समिती चे वैभव वजे, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, ज्योती मेहेर, उज्वला पाटील असे अनेक समाज प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. समुद्रात होणारे विमानतळ आणि पर्यावरणास घातक ‘चौथी मुंबई’ योजना तात्काळ थांबवा. मुंबईतील कोळीवाड्यांचे, बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छिमारांच्या हिताचे करा. ससून डॉक, मुंबई येथे बंद केलेली गोदामे त्वरित ताब्यात द्यावी. कफ-परेड, मुंबई येथील प्रस्तावित ‘मरीना पार्क’ प्रकल्प रद्द करावा. छत्रपती शिवाजी महाराज बाजार (क्रॉफर्ड मार्केट) कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नये. मुंबई येथील सर्व बाजारांचा विकास करताना मच्छीमार महिलांना विश्वासात घ्यावे. मच्छिमारांची सर्व प्रकारची थकीत कर्जे शेतकऱ्याप्रमाणे माफ करावी. गोराई येथील प्रस्तावित निक्षारीकरण प्रकल्प रद्द करावा. घराच्या व मासळी सुकविण्याच्या, बोटी शाकारणीच्या वहिवाटी खालच्या जागा नावे करा. या मागण्या करण्यात आल्या. मोठ्या भांडवलदारांसाठी आदिवासी, भूमिहीन, मच्छीमार अशा घटकावर अन्याय तर होत आहेच, मात्र जे या प्रकल्पात सहभागी नाहीत त्यांना प्रदूषित हवेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा फटका बसणार आहे, असे किरण कोळी यांनी सांगितले. सरकारने आता अधिवेशनातील उरलेल्या दोन दिवसांत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हा लढा अजून तीव्र होईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

 महाड क्रांती : अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन

महाड क्रांती : अभ्यासक्रम समावेशासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्यावर केलेल्या सामाजिक क्रांतीची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली जाते. त्या महाड क्रांतीचा इतिहास विद्यालय, महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी गाढे अभ्यासक असलेल्या तज्ज्ञांची एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेची घोषणा शुक्रवारी सुरू झालेल्या महाड क्रांती शताब्दी महोत्सवानिमित्त ‘ समान संधी अभियान ‘ चे अध्यक्ष सुनील कदम यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. अभ्यासक्रमात समावेशासाठी महाड क्रांतीच्या इतिहासावर आधारित धड्यांचे स्वरूप ही तज्ज्ञांची समिती निश्चित करणार आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ प्रल्हाद जोगदंड हे या अभ्यासक्रम तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष असून प्रा. राजेश सोनावणे हे समन्वयक आहेत. या समितीमध्ये एकूण १७ अभ्यासकांचा समावेश आहे. त्यात डॉ. मृदुल निळे, डॉ.सुंदर राजदीप, डॉ.अविनाश कोल्हे, डॉ.कृष्णा गायकवाड, डॉ. सुवर्णा जाधव, डॉ. प्रदीप वाघमारे, प्रा अतुल रणपिसे, प्रा. सुहास चव्हाण ( मुंबई ), प्रा. विजय मोहिते ( कोकण), डॉ. सुनील नरवडे (मराठवाडा ), डॉ विद्या चोरपगार,  डॉ चेतना सवाई,  डॉ . गौतम कांबळे, डॉ सुधीर जिंदे ( विदर्भ) सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती कदम यांनी पत्रकात दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांचा महाड क्रांती शताब्दीचा प्रारंभिक समारंभ गेल्या आठवड्यात पत्रकार भवनात पार पडला होता. त्यातून महाड क्रांतीचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला अनेक संस्था – संघटनांनी पाठींबा यापूर्वीच जाहीर केला आहे.

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उल्हासनगर : उल्हासनगर आगरी सेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्त ठाणे जिल्हा आगरी सेना नेते विजय जोशी यांनी किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते आयोजित करण्यात आलेले या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोतीबिंदू निदान, व निवडक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम माणेरेगाव येथील सोमेश्वर पॅलेस या ठिकाणी शुक्रवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तसेच ह. भ. प राजेश महाराज देसाई यांचे कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते. नागरिकांनी कीर्तन व प्रवचनला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती भाजप जिल्हा प्रमुख नंदू परब , शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, नगरसेवक महेशजी पाटील, निलेशजी शिंदे, नवीनजी गवळी, आगरी सेना कार्यअध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी ठाणकर, संघर्ष समितीचे सुमित वजे, संजय फुलोरे ,नगरसेविका पूजा गायकवाड, कविता म्हात्रे , सरोज रॉय, इंदिरा तरे, हेमलता पावशे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती उल्हासनगर आगरी सेना तालुकाप्रमुख जितेंद्र जोशी यांनी दिली.

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नगरसेविका अर्चना पाटील यांच्याकडून निवेदन आरती परब दिवा: साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.