प्रशासनाचे मौन कायम

मुकुंद रांजाणे (माथेरान)

माथेरान मध्ये मागील काही वर्षांपासून जुने बंगले खरेदी करून त्याजागी आलिशान हॉटेल्स उभी रहात आहेत. या हॉटेलमध्ये रूम्स बांधताना अडसर ठरणारी झाडे मुळासहित छाटली जात आहेत. अशाचप्रकारे मेघदूत हॉटेलमध्ये २१एप्रिलला दिवसाढवळ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे वनखात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.एकीकडे झाडे लावा झाडे वाचवा अशा वल्गना केल्या जात आहेत आणि दुसरीकडे दिवसाढवळ्या झाडांची कत्तल केली जात आहे. पर्यावरण वाचवायचे असेल तर इथली वनसंपदा टिकली पाहिजे.सद्यस्थितीत याठिकाणी जी काही जुनी वनराई आहे तेच आकर्षण आजही कायम आहे. आजपर्यंत जे सत्तेत विराजमान झाले त्यांनी फक्त रस्ते, पाणी, वीज याच प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रयत्न केले आहेत बाकी काही पर्यावरणा बाबतीत साध्य करू शकलेले नाहीत. ही नैसर्गिक वनराई शाबूत आहे म्हणून इथे पर्यटक येत आहेत याचे चांगल्या पद्धतीने संगोपन केल्यासच याठिकाणी पर्यटन वाढू शकते. अशाचप्रकारे जर झाडे कापली गेली तर इथले वातावरण आणि नैसर्गिक संपदा लोप पावून भविष्यात हे मोकळे रान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनखात्याने याकडे लक्ष केंद्रित करून वृक्षांची जोपासना करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *