ही घटना २०२४ च्या नोव्हेंबर महिन्यातली आहे. मी अखिल भारतीय साहित्य परिषदेचा विदर्भाचा एक पदाधिकारी म्हणून गत काही वर्षांपासून कार्यरत आहे. २०२२ पासून विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात दर महिन्यात एखादा तरी कार्यक्रम आयोजित केला जात असे. मात्र एक ऑगस्ट २०२४ पासून ते गंभीर रित्या आजारी झाले. त्यांना पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत होती, मात्र पूर्ण तळ्यावर आले नव्हती.
डिसेंबर २०२४ मध्ये साहित्य परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार होती. त्यात प्रत्येक प्रांतात असे गत तीन महिन्यात काय कार्यक्रम झाले त्याचा अहवाल द्यायचा होता. अविनाश पाठक आजारी असल्यामुळे आमचे कोणाचेच मन नव्हते, आणि काहीही कार्यक्रम होऊ शकले नव्हते. मग काय करायचे हा प्रश्न समोर आला.
अविनाश पाठक आजारी असल्यामुळे मी त्यांना घरी भेटायला जात असे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा प्रश्न आला तेव्हा त्यांच्या घरी गेल्यावर मी त्यांना सहज विचारले, तेव्हा ते म्हणाले,” डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एखादा कार्यक्रम घेऊ या.” त्यावेळी ते उठण्याच्या अवस्थेत नव्हते. मात्र त्यांनी त्याही परिस्थितीत ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर परिसंवाद घ्यायचा असे ठरवले आणि अंथरुणावर पडल्या पडल्या फोनवर संपूर्ण कार्यक्रम सर्व संबंधितांशी बोलून त्यांनी आखला. मग मी आणि प्रकाश एदलाबादकर सर आमच्यावर त्यांनी जबाबदारी टाकली आणि ठरल्याप्रमाणे ६ डिसेंबरला देवी अहिल्या मंदिराच्या सभागृहात हा दणदणीत कार्यक्रम पार पडला होता. अंथरुणावर पडल्या पडल्या अविनाश पाठक यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्याकडून तो यशस्वी करून घेतला. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते स्वतः कार्यक्रमाला राहू शकले नव्हते. मात्र कार्यक्रम त्यांनी यशस्वी पार पाडला. हे त्यांचे संघटन कौशल्य दाद देण्याजोगेच होते.
त्याच महिन्यात २८ डिसेंबरला साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक नागपूरला यायचे होते. त्यांनी विदर्भातील पदाधिकारी यांची एक बैठक आपल्यासोबत व्हावी असे सुचवले. तेव्हाही अविनाश पाठक यांनी कॉटवर बसून फोनवर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. पूर्ण विदर्भात त्यांनी संपर्क केला. धरमपेठ शाळेच्या सभागृहात बैठक ठरल्याप्रमाणे पार पडली. या बैठकीला एका सहका-याच्या कारमध्ये बसून अविनाश पाठक स्वतः उपस्थित राहिले. कारमधून उतरून वॉकरच्या साह्याने ते बैठकीत येऊन बसले आणि बैठक यशस्वी पार पाडली होती. बैठकीनंतरच्या जवळच्या एका हॉटेलमध्ये स्नेहभोजनात देखील ते सहभागी झाले होते
अविनाश पाठक हे एक पत्रकार आणि साहित्यिक म्हणून त्यांचे नाव मी नेहमी ऐकत होतो. मात्र प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता. साहित्य परिषदेच्या कामाबाबतही मी ऐकून होतो. त्यांच्याकडे साहित्य परिषदेचे दायित्व आले आणि मार्च २०२२ मध्ये त्यांनी साहित्य परिषदेचा पहिला कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबत वृत्तपत्रात वाचून मी त्या कार्यक्रमाला पोहोचलो. कार्यक्रमात पूर्ण वेळ मी उपस्थित राहिलो. त्यावेळी एक रजिस्टर प्रेक्षकांमध्ये फिरवले होते. त्यात सर्वांची नावं पत्ते आणि मोबाईल नंबर घेतले होते. दोनच दिवसांनी अविनाश पाठक यांचा मला फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलावले आणि मला साहित्य परिषदेशी जोडून घेतले. तेव्हापासून मी पूर्णवेळ सक्रिय झालो. नंतर जवळजवळ तीन वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. एक पत्रकार म्हणून तर त्यांना समाजात मान होताच, पण त्याचबरोबर ते उत्तम साहित्यिकही आहेत हे मला हळूहळू लक्षात येऊ लागले. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आणि त्यांचे नियमित सुरू असणारे लेखन, त्याबाबत त्यांचा असलेला दांडगा अभ्यास आणि लेखनातील सातत्य हे कुठेतरी सुखावून जाणारे होते. त्याचबरोबर त्यांचा सर्वच क्षेत्र क्षेत्रात व्यापक जनसंपर्क असल्याचे देखील माझ्या लक्षात आले. कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा तर त्यासाठी वेगवेगळ्या मान्यवर वक्त्यांना ते संपर्क करून बोलायचे आणि यांच्या शब्दाला मान देऊन ते वक्ते कार्यक्रमाला यायचे देखील. साहित्य परिषदेत डॉ. वि.स. जोग, डॉ. प्रज्ञा आपटे, डॉ. दादासाहेब आपटे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर, डॉ. शरद निंबाळकर, पत्रकार सुधीर पाठक असे अनेक मान्यवर त्यांनी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर आणले. इतकेच काय पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील अविनाश पाठकांच्या संबंधाखातर दोनदा साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर आले. डॉ. उदय निरगुडकर माधव भंडारी अशा विदर्भ बाहेरच्या मान्यवरांचे कार्यक्रम त्यांनी विदर्भात घडवून आणले होते. विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात त्यांचा संपर्क होता. त्यातून त्यांनी वर्षाच्या आत अकराही जिल्ह्यांमध्ये साहित्य परिषदेच्या शाखा कार्यरत केल्या. ११ पैकी ८ जिल्ह्यांमध्ये ते स्वतः जाऊन देखील आले होते.
अविनाश पाठक हे सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. साहित्य परीक्षण परिषद ही संघ परिवाराची संघटना, तिचे दायित्व त्यांनी तीन वर्ष सांभाळले. त्याआधी त्यांनी भारत विकास परिषदेचे दायित्व तेवढेच सक्षमपणे सांभाळले होते. साहित्य परिषदेच्या कामातून मोकळे झाल्यावर त्यांनी विदर्भातील संघाशी संबंधित पत्रकारांची संघटना बांधण्याचे काम हाती घेतले आणि सहा महिन्यात विदर्भातील पत्रकारांशी संपर्क करून संघटना उभी देखील केली. संघटनेचे काम आता सुरू आहे. अविनाश पाठक इथेही विदर्भाचे अध्यक्ष आहेत. हे काम उभे करताना देखील त्यांचे संघटन कौशल्य आणि जनसंपर्क किती सक्षम आहे हे दिसून येते.
एक पत्रकार या नात्याने त्यांनी महाराष्ट्राच्या विविध मान्यवर वृत्तपत्रांमध्ये काम केलेले आहे. आजही ते विविध वृत्तवाहिन्यांवर चर्चांमध्ये सहभागी झालेले दिसतात. राजकीय विषयांवर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे अशा चर्चांमध्ये ते प्रामुख्याने सहभागी झालेले दिसतात. आठ वर्ष त्यांनी एका दिवाळी अंकाचे संपादन केले. त्या दिवाळी अंकाने २५ प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले होते. याशिवाय स्वतः अविनाश पाठक विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.
त्यांची आतापर्यंत पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्या पुस्तकांना देखील विविध प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. नुकतेच म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांचा शह काटशह हा राजकीय कथांचा संग्रह प्रकाशित झाला. त्याला माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर जातीने उपस्थित झाले होते. यावेळी बोलताना दूरदर्शनचे वृत्त संचालक नितीन केळकर आणि महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी अविनाश पाठक यांच्या एकूणच वांङमयीन कर्तृत्वावर टाकलेला प्रकाश हा निश्चितच सुखावणारा होता, आणि अशा व्यक्तीशी आपले स्नेहबंध असल्याचा अभिमान सुद्धा वाटून गेला होता. त्याच्या काही पुस्तकांचे यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोशियारी, राष्ट्रसेविका समितीच्या शांताक्का, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर अशा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.
असे सिद्धहस्त पत्रकार अभ्यासू लेखक कुशल संघटक स्तंभलेखक उत्तम वक्ते आणि व्यापक जनसंपर्काचे धनी अविनाश पाठक आज २१ मे २०२६ रोजी वयाची ७१ वर्ष पूर्ण करून ७२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गतवर्षी आलेले आजारपण त्यामुळे शरीरात आलेले काहीसे शैथिल्य हे सर्व बाजूला ठेवत आजही ते तितक्याच उत्साहाने कार्यरत राहिलेले आहेत. त्यांना एकाहात्तराव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि परमेश्वराने त्यांना उदंड दीर्घायुरारोग्य प्रदान करावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना
महेश आंबोकर
लेखक वायुदलातील निवृत्त अधिकारी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.
