(राजेंद्र साळसकर)
मुंबई  – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११४ मधील नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या पुढाकारातने नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय दाखले उपलब्ध करून देणारे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व कामगार वर्गाला एकाच ठिकाणी विविध सेवा मिळाव्यात या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट), स्थानिक वास्तव्याचा दाखला तसेच आधार कार्डाशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनेक वेळा नागरिकांना विविध दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागते, आवश्यक कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वेळ व पैशाचा अतिरिक्त खर्च होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सेवा देण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, मागील तीन वर्षांचे आर्थिक प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र, तसेच वीज बिल किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख दर्शविणारे कागदपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक असतील. अधिवास दाखल्यासाठी मतदार ओळखपत्र, शैक्षणिक पुरावे, बँक पासबुक तसेच मागील दहा वर्षांच्या वास्तव्याचे पुरावे मागविण्यात येणार आहेत. स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यासाठी देखील विविध ओळखपत्रे व दीर्घकालीन वास्तव्याचे पुरावे आवश्यक राहणार आहेत. याशिवाय आधार कार्डाशी संबंधित नोंदणी व दुरुस्तीची सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे शिबिर २५ ते २९ मे या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण ज्येष्ठ नागरिक कार्यालय, ९० फूट रोड, लालबहादूर कंपाऊंड, अशोक केदार चौक, भांडुप (प.) असे असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका राजोल पाटील यांनी केले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून विविध सरकारी प्रक्रियांबाबत जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना या शिबिराचा मोठा फायदा होणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *