भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला लागली गोळी
दोन गटांतील सहा जण अटकेत
कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी येथील तुलसा पार्क इमारतीसमोर स्कॉर्पिओला स्कुटीने कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाले. दोन गटांतील हाणामारीदरम्यान झालेल्या गोळीबारात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला गोळी लागली. जखमीवर डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. तसेच दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास प्रेम अजय सिंह उर्फ गुंडा यांच्या स्कॉर्पिओला सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी यांच्या स्कुटीने कट मारल्याने दोन्ही गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन तुलसा पार्क इमारतीसमोर दोन्ही गट आमनेसामने येत हाणामारी सुरू झाली. यावेळी प्रेम सिंहच्या गटातील ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानू रमेश राठोड याने कथितरित्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. भांडण सोडवण्यासाठी गेलेले चक्की नाका येथील राहुल अशोक वर्मा यांच्या कमरेखाली गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुदर्शन निकाळे यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्रेम अजय सिंह उर्फ गुंडा आणि ओंकार धोंडीराम जगदाळे यांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका आरोपीवर सेंट्रल रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळावरून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.
दरम्यान, सनी किरण कटारे यांच्या तक्रारीवरून दाखल दुसऱ्या गुन्ह्यात सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी, संजय शर्मा, कार्तिक पवार आणि पवन चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-३) अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने हे तपासावर लक्ष ठेवून आहेत.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *