कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या ‘केडीएमसी ओळख जुनी, ध्यास नवा’ या कॉफी टेबल बुकमध्ये आगरी-कोळी समाजाचा उल्लेख नसल्याने निर्माण झालेल्या वादानंतर अखेर महापालिका प्रशासनाला लेखी खुलासा करावा लागला आहे. भाजपचे नगरसेवक मंदार टावरे यांनी हा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्यानंतर माहिती व जनसंपर्क विभागाकडून त्यांना लेखी उत्तर देण्यात आले आहे. या उत्तरात स्थानिक भूमिपुत्र समाजाचा उल्लेख राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून संबंधित पुस्तकाचे वितरण थांबवून ते मागे घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने दिलेल्या पत्रानुसार तत्कालीन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या संकल्पनेतून आणि तत्कालीन माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, तत्कालीन शहर अभियंता अर्जुन अहिरे, तत्कालीन उपआयुक्त (सामान्य) अर्चना दिवे तसेच माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.
मात्र, कल्याण-डोंबिवलीच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या आगरी-कोळी समाजाचा उल्लेख पुस्तकात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर समितीच्या वतीने समाजबांधवांची जाहीर माफी मागण्यात आली आहे. तसेच नव्याने समिती गठित करून भूमिपुत्रांच्या इतिहासाचा समावेश असलेले सुधारित पुस्तक तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नगरसेवक मंदार टावरे यांनी या उत्तरावर प्रतिक्रिया देताना, “महापालिकेने चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली असली तरी ही केवळ औपचारिकता ठरू नये. आगरी-कोळी समाजाचा इतिहास वगळण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भविष्यात अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची प्रशासनाने खात्री द्यावी,” अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुधारित पुस्तक कधी प्रकाशित होणार, याकडे आता भूमीपुत्रांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *