अनिल ठाणेकर
ठाणे : मासुंदा तलाव परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव व पोलीस आयुक्त आशतोष डुंबरे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.
मासुंदा तलाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १८ जून रोजी ‘धर्मराज्य पक्षा ‘च्या वतीने ई-मेलद्वारे निवेदन सादर करून मासुंदा तलाव परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून सदर निवेदनाची दखल घेऊन आवश्यक कार्यवाहीसाठी सदर प्रकरण उप पोलीस आयुक्त, झोन-१, ठाणे यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे ई-मेल द्वारे कळविण्यात आले होते.
मात्र, अलीकडेच मासुंदा तलाव परिसरात घडलेल्या दुर्दैवी खुनाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर घटनेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून तलाव परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे. परंतु ही मागणी आजची नसून यासंदर्भात ठाणे न्यायालयाचे तत्कालीन संयुक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. देशमुख यांनी १९ जून रोजी दिलेल्या निकालामध्ये मासुंदा तलाव परिसरात सहा महिन्यांच्या आत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेकडून तसा ठराव देखील संमत केल्याची नोंद उपलब्ध आहे.
मासुंदा तलाव हा ठाणे शहरातील अत्यंत गर्दीचा व नागरिकांची सतत वर्दळ असलेला सार्वजनिक परिसर आहे. दररोज मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, विद्यार्थी, पर्यटक तसेच सर्वसामान्य नागरिक येथे विरंगुळा, व्यायाम व विविध सामाजिक उपक्रमांसाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून सार्वजनिक सुरक्षेशी आणि नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणाशी संबंधित गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत घडणारी कोणतीही अनुचित किंवा गुन्हेगारी घटना नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण करू शकते. त्यामुळे या ठिकाणी प्रभावी व कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारणे ही संबंधित प्राधिकरणांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. तथापि, न्यायालयीन आदेशानंतर जवळपास अनेक वर्षांचा कालावधी उलटूनही सदर आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. परिणामी, तलाव परिसरात वारंवार घडणाऱ्या अनुचित घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकतीच घडलेली खुनाची घटना ही प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या दुर्लक्षाचे गंभीर उदाहरण मानावे लागेल.
यापूर्वी दिनांक १८ जून २०२४ रोजी ‘धर्मराज्य पक्षा’ने आपणास निवेदनाद्वारे या विषयाकडे लक्ष वेधले होते. तरीही आवश्यक उपाययोजना न झाल्याने आणि त्यानंतर अशी गंभीर घटना घडल्याने संबंधित प्राधिकरणांनी न्यायालयाच्या आदेशाची अपेक्षित अंमलबजावणी न केल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मासुंदा तलाव परिसरात तात्काळ व कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना राबवाव्यात.
अन्यथा, ठाणे सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबाबत व न्यायालयीन निर्देशांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याच्या संदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्यायांचा अवलंब करून संबंधित न्यायालयात पुन्हा दाद मागण्याचा विचार करावा लागेल. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण, कायद्याचे राज्य व न्यायालयीन आदेशांचा सन्मान या दृष्टीने आपण तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *