शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल
हरिभाऊ लाखे
नाशिक : कुंभमेळा व साधुग्रामच्या नावाखाली प्रशासन नांदूर, टाकळी परिसरातील सुपीक शेतजमिनी अन्यायकारकपणे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मागील अडीच दशकांत डीपी रोड, छत्रपती संभाजीनगर रस्ता, साधुग्राम व सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) यासाठी घेतलेल्या, वापरलेल्या जागांचा मोबदला अद्याप दिला नसल्याची तक्रार करीत साधुग्राम शेतकरी कृती समितीने साधुग्रामसाठी नव्याने जागा देण्यास ठाम विरोध दर्शविला आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने नाशिक, नांदूर व टाकळी शिवारातील सुमारे एक हजार एकर जमीन साधुग्रामसाठी तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या विरोधात साधुग्राम शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देत शेतकऱ्यांची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी अपर तहसीलदार अमोल निकम यांच्यासमोर संबंधित शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी सुरू झाली. यावेळी जमीन मालकी, शेती, कुटुंबाची उपजीविका आणि अधिग्रहण संबंधी हरकतींशी संबंधित कागदपत्रे शेतकऱ्यांनी सादर केली.
कुंभमेळा रामकुंडात भरतो. आमच्या सुपीक जमिनींचा कुंभमेळ्याशी काहीच संबंध नाही. वर्षानुवर्षे आम्ही शेती करीत असून प्रशासन मनमानीपणे नोटिसा देऊन मोजण्या करीत आहे, असा आरोप शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष समाधान जेजुरकर आणि शेतकऱ्यांनी केला. यापूर्वी विविध कारणांसाठी आमच्या ताब्यात घेतलेल्या, वापरलेल्या जमिनींचे पैसे थकवून नवीन विकास आराखड्यातील (डीपी) जमिनींसाठी मात्र प्रशासनाने ९०० कोटी रुपयांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला. प्रशासनाने थकीत पैसे न दिल्यास सातबारा उताऱ्यावर आमची नावे असून ऐन कुंभमेळ्यात जमिनींवर ताबा घेऊन खोदाई केली जाईल, असा इशाराही जेजुरकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.
प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी पूर्ण होईपर्यंत संबंधित जागेवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवली जाणार असल्याचे म्हटले आहे. तात्पुरत्या अधिग्रहणातील मूल्यांकन व अर्जदारांनी न्यायालयात मांडलेल्या सर्व मुद्यांवर सविस्तर सुनावणी घेतली जाईल. नागरिकांच्या शंका, समस्या व कायदेशीर हरकतींचा सहानुभूतीपूर्वक व कायदेशीर चौकटीत विचार केला जाणार असल्याचे प्रशासकीय वर्तुळातून सांगण्यात आले.
गोदावरी काठावर दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू-महंतांच्या निवासासाठी नाशिकमध्ये साधुग्राम वसविण्यात येते. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे १६१८ एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचे प्रस्तावित आहे. यातील तपोवन परिसरातील सुमारे ३१८ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित असून यावेळी ती कायमस्वरूपी संपादित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त लागणारी सुमारे १२५० एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात घेतली जाणार आहे. नव्याने जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे.
मागील २०१५ च्या कुंभमेळ्याच्या वेळी साधुग्रामसाठी जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. सिंहस्थ संपल्यानंतर या जमिनी पुन्हा शेतीयोग्य करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र प्रत्यक्षात खडी, मुरूम, सिमेंट, दगड, पाइप आदी साहित्य पूर्णपणे काढून जमीन पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अनेक जमिनी पुन्हा शेतीसाठी योग्य राहिल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा हजारो एकर सुपीक व बागायती जमीन अधिग्रहित केल्यास शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होईल, अशी भूमिका समितीने घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *