आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय कलगीतुरा; काँग्रेस-उबाठाकडूनही सवाल
कल्याण : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविण्याच्या वादाचे पडसाद बुधवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. भाजपा गटनेते शशिकांत कांबळे यांनी या मुद्द्यावरून महासभा स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर हर्षाली थवील चौधरी यांनी बुधवारीची महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकूब केली.
महासभा तहकूब होताच भाजपा आणि मनसेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. केडीएमसीमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती असून मनसेही शिवसेनेसोबतच्या आघाडीमुळे सत्तेचा भाग आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमध्ये राजकीय संघर्ष वाढताना दिसत आहे. भाजपाकडून मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मनसेकडून भाजपानेच सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान दिले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
मनसे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. “इतका विरोध आहे तर सत्तेतून बाहेर पडा. सत्तेची मलाई खाण्यासाठी सत्तेत राहिला आहात. महापौर आम्ही बसवला आहे. आमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही सत्तेतून बाहेर पडा,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपा-मनसेच्या राजकीय वादावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही प्रश्न उपस्थित केले. महासभेत नागरिकांच्या समस्या, शहरातील विकासकामे आणि महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असते. त्यामुळे राजकीय वादामुळे संपूर्ण दिवसाची महासभा तहकूब करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. नागरी प्रश्न बाजूला ठेवून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना महत्त्व दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला.
भाजपा आणि मनसेमधील वाढता संघर्ष पाहता आगामी काळात केडीएमसीच्या सत्तासमीकरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अडीच वर्षांनंतर सत्तेचे समीकरण काय राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आणि मनसेमधील मतभेद वाढत राहिल्यास शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या शिवसेनेकडून या घडामोडींवर लक्ष ठेवले जात असून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. भाजपा-मनसेतील संघर्ष असाच वाढत राहिला, तर आगामी काळात केडीएमसीतील सत्तेचे समीकरण बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
