वरळीत हिट अँड रन
पत्नी ठार, पती गंभीर जखमी, वरळीत कोळीवाड्यावर शोककळा
०दारुड्या मुलगा फरार, वडील ताब्यात
मुंबई : पुण्यातील पॉर्शे कार अपघाताची सुन्न करणाऱी घटना ताजी असतानाच वरळीतही एका नेत्याच्या मुलाने दारूच्या नशेत स्कुटरवरून जाणाऱ्या कोळी दाम्पत्याला उडवले. या घटनेत पत्नी ठार झाली असून पती गंभीर जखमी आहे. शिंदे सेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा ही कार चालवित होता. चीड आणणारी बाब म्हणजे हा अपघात झाल्यानंतर मिहीरने धडक दिलेल्या महीलेला तीचे अंगावरील कपडे फाटेपर्यंत फरफटत नेले आणि नंतर तेथून पोबारा केले. या कारमध्ये मिहीर सोबत असणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली असून मिहीरच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा या कोळीवाड्यात राहणाऱ्या दाम्पत्याच्या स्कुटरला मिहीरने टक्कर दिली. नाखवा दाम्पत्य भायखळावरून नेहमीप्रमाणे मासे घेऊन वरळीला निघाले होते. दरम्यान, अपघातानंतर प्रदीप नाखवा यांनी मिहिर शहाला गाडी चालवताना पाहिलं असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. अपघातानंतर कावेरी या गाडीखाली असल्याचे पाहिल्यानंतर प्रदीप यांनी मिहिरला गाडी थांबवण्याची विनंती केली, मात्र मिहिरने गाडी पळवली. गाडीबरोबर कावेरी या फरफटत जात होत्या, असं जखमी प्रदीप नाखवा यांनी सांगितलं असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
प्रदीप नाखवा यांनी अपघाताबद्दल सांगताना म्हटलं की, बीएमडब्ल्यूने आमच्या गाडीला टक्कर दिली. त्यानंतर कावेरी गाडीखाली गेली, ते पाहून प्रदीप यांनी मिहीरला गाडी थांबवण्याची विनवणी केली, पण पळण्याच्या नादात त्याने गाडी थांबवली नाही आणि कावेरी गाडीसोबत फरफटत गेली. प्रदीप हे गाडीच्यामागून धावत होते. काही अंतरावरून त्यांनी टॅक्सीची मदत घेऊन पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. दीड किलोमीटर अंतरावर टॅक्सीने प्रवास केल्यानंतरही कावेरी दिसून न आल्याने प्रदीप यांनी मदतीसाठी टॅक्सी वरळी पोलिस ठाण्यात वळवल्याची माहिती प्रदीप यांनी दिली.
मिहीर शहा याने त्यारात्री मद्यप्राशन केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी खुलासा केला आहे. त्यारात्री हीर शहा हा मित्रांसोबत त्यांच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास बारमध्ये पार्टीसाठी आला होता. ते सर्व एक-एक बियर प्यायले होते. त्यांचं बिल 18730 रुपये झालं होतं, जे त्याच्या मित्राने भरलं होतं. त्यानंतर ते 1.30 वाजेच्यासुमारास बारमधून बाहेर पडले, असं बारमालकाने सांगितलं आहे.
सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या बगलबच्चांना जनतेला चिरडण्याचा अधिकार दिलाय – नाना पटोले
मुंबई : सत्तेमध्ये असलेले, त्यांच्या बगलबच्चांना सामान्य जनतेला चिरडण्याचा अधिकार देतायत अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते गोंदिया येथे आले असता माध्यमांशी बोलत होते. याप्रकरणी पोलिसांनी संबधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. मात्र सरकार याबाबत थोडे देखील गंभीर नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा- देवेंद्र फडणवीस
मुंबई : वरळी हिट अँन्ड रन प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न बाळगता संबधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा असे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.
पुणे पोर्शे प्रकरणानंतर पुणे पोलीस आणि गृहखात्यावर असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच मुंबईतील वरळीत घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची तुलनाही पुणे पोर्शे प्रकरणाशी केली जात आहे. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पालघरचा उपनेता असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिलं जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल, असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा याप्रकरणी कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस खात्याला दिले आहेत.
