७५ हजार गोविंदांना प्रत्येकी १० लाखाचे विमा कवच !
अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : परंपंरागत दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदाना विमा संरक्षण मिळावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदाना, राज्य शासन यावर्षी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून ७५ हजार गोविंदाना प्रत्येकी १० लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
प्राचीन काळापासून सुरू असलेला व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्वाचा सण गोकुळाष्टमी  म्हणजेच दहिकाला उत्सव. हा सण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून मुंबई-ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात १५ ते ४० वयोगटातील तरूण-तरूणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. दहिहंडी (गोविंदा) उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई-ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळअष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहिहंडीचे आयोजन करण्यात आलेले असते त्या ठिकाणी थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचप्रमाणे या उत्सवात महिलांची देखील गोविंदा पथके सहभागी होत असतात.दरवर्षी गुरूपोर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करीत असताना त्यामध्ये अनेक गोविंदा जायबंदी होत असतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो. सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्यावर होणार्या औषधोपचाराचा खर्च या गोविंदा मंडळास परवडत नाही. तसेच याकरिता काही सेवाभावी संस्था मदतही करतात तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर विम्याचे कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. त्यानुसार ७५ हजार गोविंदाना ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यु झाल्यास परिवाराला दहा लाख मिळतील. तसेच दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास दहा लाख रूपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख तसेच कायमस्वरूपी पुर्ण अपंगत्व आल्यास दहा लाख रूपये त्याचप्रमाणे अपघातामुळे रूग्णालयीन खर्च एक लाखापर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता गोविंदाना विमा कवच मिळणार असल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या सुमारे ७५ हजार गोविंदांना दहा लाखाचा विमा संरक्षण शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्यामुळे दहिहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पाठपुरावा करणारे आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *