नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष बैठक

 

 

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वयाच्या व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ नवी मुंबईतील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात योजनेची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होते. या बैठकीस महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ,  ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ तसेच महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांचे पदाधिकारी असणारे 60 हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी या योजनेची सविस्तर माहिती उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दिली. भारत देशात तसेच विशेषत्वाने महाराष्ट्र राज्यात सर्व धर्मांची मोठी तीर्थस्थळे आहेत. अशा ठिकाणी एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. मात्र गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अथवा सोबत कोणी नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 14 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर केला असून 8 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयान्वये योजनेमध्ये सुधारणाही जाहीर केल्या आहेत. या योजनेअंतर्गत शासन निर्णयात तीर्थस्थळांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये भारतातील 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
या योजनेचा लाभ वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांना घेता येणार असून लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी – शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती या बैठकीत माहिती देण्यात आली तसेच शासन निर्णयाची प्रतही उपलब्ध करून देण्यात आली.
या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी विचारणा केलेल्या योजनेविषयीच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळचे सल्लागार श्री. प्रकाश लखापते यांनीही योजनेचा लाभ घेण्याविषयी आवाहन केले. उपस्थित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत या योजनेची माहिती नवी मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल असे आवाहन समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *