महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचा उपांत्य फेरीत निसटता पराभव
मुंबई:- महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचा “११व्या राष्ट्रीय बीच कबड्डी” स्पर्धेच्या उपांत्य फेरीत निसटता पराभव. बिहार, बुद्धगया येथे सुरू असलेल्या बीच कबड्डी स्पर्धेच्या महिलांच्या उपांत्य फेरीत हिमाचल प्रदेशने महाराष्ट्राला ४७-४६असे चकवित अंतिम फेरी गाठली. सामन्याच्या पहिल्या चढाई पासून अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघ २३-२३ असे बरोबरीत होते. सामन्याच्या शेवटच्या चढाई पर्यंत सामना ४६-४६ असा बरोबरीत होता. पण शेवटच्या चढाईत हिमाचलच्या चढाईपट्टूने गुण घेत हिमाचलला अंतिम फेरी गाठून दिली. आम्रपाली गलांडे, हरजित कौर संधू यांनी शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली. पण संघाचा पराभव टाळण्यात ते अपयशी ठरल्या.
पुरुषांच्या उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राचा कडवा प्रतिकार ४०-३७ असा मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश केला. अत्यंत अतितटीने खेळलेल्या या सामन्यात पहिल्या सत्रात महाराष्ट्र १५-२१ असे पिछाडीवर होते. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने आपला खेळ गतिमान करीत ही आघाडी कमी करीत आणली. पण अखेर ३गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. ऋषिकेश भोजने, आकाश शिंदे यांनी संघाच्या विजयासाठी शर्थीचा खेळ केला. पण त्यात ते अयशस्वी ठरले.
पुरुषात उत्तर प्रदेश विरुद्ध हरियाणा तर महिलात हिमाचल प्रदेश विरुद्ध हरियाणा अशा अंतिम लढती होतील. पुरुषात राजस्थानने हरियाणाला (४२-३८) असे, तर महिलात हरियाणाने उत्तर प्रदेशचा ४३-२५ असा पाडाव करीत अंतिम फेरी गाठली.
या अगोदर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तराखंडचा प्रतिकार ५३-४१ असा मोडून काढला. मध्यांतराला ३२-१२ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राला दुसऱ्या डावात मात्र उत्तराखंडने चांगलेच झुंजविले. पण शेवटी संयमाने खेळत महाराष्ट्राने सामना आपल्या हातून निसटू दिला नाही. महाराष्ट्राच्या हरजित कौर संधूने या सामन्यात आपल्या एका चढाईत विरोधी संघाचे सर्व म्हणजे ४ गडी टिपण्याची किमया केली. तिला चढाईत आम्रपाली गलांडे, तर पकडीत जुईली मिस्किटा, दिव्या गोगावले यांची महत्वपूर्ण साथ लाभली.
पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने यजमान बिहारचे आव्हान ४३-२६ असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. सावध सुरुवात करीत पहिल्या सत्रात २३-१४ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने दुसऱ्या सत्रात आपला खेळ गतिमान करीत १७ गुणांच्या फरकाने सामना आपल्या खिशात टाकला. या सामन्यात देखील महाराष्ट्राचा बचाव भक्कम होता. याचे श्रेय ऋषिकेश भोजने, शंकर गदई यांच्या भक्कम पकडीना जाते. त्यांना कप्तान आकाश शिंदेने चढाईत गडी टिपत छान साथ दिली.
00000
