माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची ग्वाही
बदलापूर : नियोजित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गातील बाधीत शेतकऱ्यांना सध्याच्या रेडीरेकनरनुसार प्रतीगुंठा २० हजार रुपये ते ६० हजार रुपये एवढा मोबदला मिळत असून, स्वखुषीने रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनीला समाधानकारक मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी येथे दिली.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बदलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात काही पत्रकारांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी एक हजार कोटी रुपयांपर्यंत आराखडा तयार करण्यात आला. त्यावेळी सुमारे २५० कोटी रुपये ही जमिनीची किंमत ठरविण्यात आली होती. परंतु, या रेल्वेमार्गाच्या भागात अनेक वर्ष जमिनीचे व्यवहार न झाल्यामुळे रेडीरेकनर दर कमी आहेत. महसूल विभाग व रेल्वे प्रशासनाने भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीगुंठा २० हजार ते ६० हजार रुपये दर मिळणार आहे. एवढा कमी दर हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. साधारणत: १५०० कोटी रुपयांपर्यंत जमिनीची रक्कम जात असल्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भूसंपादनाचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी सूचना केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमत्री-वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. या संदर्भात रेल्वे मंत्रालय, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये काही बैठका झाल्या आहेत, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
`पूररेषेबाबत तांत्रिक अभ्यास गरजेचा’
बदलापूरच्या पूररेषेसंदर्भात राज्य सरकार व नगरपालिकेने तांत्रिक अभ्यास व सर्वेक्षण करून तोडगा काढावा. त्यात शेतकरी व नागरिकांचीही भूमिकाही समजून घ्यावी, असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी व्यक्त केले.
00000
