कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे, तसेच अनेकांना पाठ व मणकादुखीचा आजार उद्भवत आहे; मात्र प्रशासनाकडून यावर कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आक्रमक भूमिका घेत विविध विभागातील खड्ड्यांबाबत प्रशासनाची पोलखोल केली आहे. एकीकडे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरत आहे, तर दुसरीकडे हे खड्डे बुजविण्यासाठी आणलेली मशीन मात्र धूळखात पडून असल्याचा आरोप उगले यांनी केला आहे, तसेच प्रशासनाने याची दखल घेत लवकरात लवकर खड्डे बुजविण्याची मागणीदेखील केली आहे.
कल्याण शहरातील विविध विभागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. कल्याण पश्चमेतील अग्निशमन दल मुख्यालय येथे गेल्या एक महिन्यापासून मास्टिक पद्धतीने रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने भरण्याचा ठेका एका एजन्सीला दिला आहे. त्याच्या मशीन दिखाव्यासाठी ठेवल्या आहेत का, असा सवाल उगले यांनी उपस्थित केला आहे. याबाबत उगले यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली. या वेळी परदेशी यांनी सांगितले की, शहरातील रस्त्यांवरील खड्यांचे प्रमाण अत्यंत अल्प असून यंदा दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले नाहीत, असे सांगितले.
प्रशासनाने खड्डे कमी प्रमाणात पडल्याचा दावा केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाने २२ कोटी रकमेची तरतूद केली आहे, तसेच यासाठी एका एजन्सीला ठेका दिला आहे; मात्र एक महिन्यापासून शासकीय जागेत मशीन पडून आहेत. जर या मशीनने काम होणार नसेल, तर उरलेल्या पैशाचे प्रशासन काय करणार आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असा सवाल करण्यात येत आहे.
शहरातील रस्ते खड्डेमय असतानादेखील पालिका आधिकारी बिनधास्तपणे खड्डे नाहीत असे सांगतात. क प्रभाग सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनादेखील रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवले आहेत. आधारवाडी चौकातील रिलायन्ससमोरील रस्त्यावरील खड्डा, दुर्गाडी समोरील रस्त्यावरील खड्डे, पवारणीचा पाडा परिसरातील खड्डे, असे चार पाच रस्त्यावरील खड्डे दाखवून दिले आहेत; मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
00000
