विरार : श्रमजीवी संघटनेचे मुख्यालय असलेल्या उसगाव डोंगरीत मंगळवारी सायंकाळी अभिनव पद्धतीने संविधानचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शहीद स्मारकाचे तसेच संविधानात अंतर्भूत असलेले ‘राज्य’ अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेता यावे, यासाठी विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून बैलगाडीच्या माध्यमातून उभारलेले स्मारकाचेही उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर वीरपत्नी स्मिता साळसकर यांच्या हस्ते अविरत तेवत राहणाऱ्या “अमर ज्योतीचे” प्रज्वलन करत शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.

भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उसगाव येथे श्रमजीवी संघटना आयोजित संविधान अमृत महोत्सव सोहळा झाला. यावेळी २६/११ हल्ल्यात वीरमरण असलेले विजय साळसकर यांच्या वीरपत्नी स्मिता साळसकर यांनी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. सोबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई विरार महापालिका आयुक्त डॉ. अनिल पवार आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या आणि देशाचे रक्षण करताना सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहणारी अखंड तेवणारी अमरज्योत वीर पत्नी स्मिता साळगावकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. २६/११ मुंबईवर झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस, जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. अमर ज्योतीसाठी योगदान देणाऱ्या कैलास बिश्नोई यांचा या वेळी सन्मान जिल्हाधिकारी आणि विवेक पंडित यांनी केला. तसेच वसईच्या एकाधिकारशाहीला टक्कर देत विजयश्री मिळवलेल्या श्रमजीवी कन्या आणि भाजपच्या नवनिर्वाचित आमदार ॲड. स्नेहा दुबे पंडित यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष श्रामभाऊ वारणा, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी, पोलिस उपायुक्त जयंत भजबले, शरद पाटील व श्रमजीवी संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *