प्रशासनाकडून स्पष्टतेची अपेक्षा
अनिल ठाणेकर
ठाणे : मुंबईतील काही भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला आणि फूटपाथवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दादर, चर्नी रोड तसेच काही इतर भागांमध्ये अशा पट्ट्या दिसून आल्याने त्यांच्या उद्देशाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.काही जैन धर्मीय संघटनांच्या मते, ही कृती धार्मिक श्रद्धेशी संबंधित असून, पायाखाली लहान जीव-जंतू चिरडले जाऊ नयेत यासाठी अशा प्रकारच्या खूणा केल्या जातात.
मात्र, दुसरीकडे काही नागरिकांनी सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथ यांचा वापर सर्वांसाठी समान असल्याचे सांगत अशा प्रकारच्या चिन्हांकनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक जागांवर कोणत्याही प्रकारचे रंगकाम अथवा चिन्हांकन करण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत माहिती देण्याची मागणी होत आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, जर ही धार्मिक प्रथा असेल तर तिची माहिती आणि अधिकृत परवानग्यांविषयी प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. तसेच अशा प्रकारच्या कृतीमुळे भविष्यात कोणतेही गैरसमज किंवा सामाजिक तणाव निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शहरातील विविध धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा सुसंवाद हे मुंबईचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांबाबत पारदर्शकता आणि कायद्याचे समान पालन होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, या पांढऱ्या पट्ट्यांचे स्वरूप, उद्देश, त्यासाठी घेण्यात आलेल्या परवानग्या आणि संबंधित नियमांविषयी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी आणि सार्वजनिक जागांच्या वापराबाबतचे नियम सर्वांसाठी समानपणे लागू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
००००००००
