भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांची लक्षवेधी सूचनेवर मागणी
ठाणे: मुंबई अग्निशमन दलाने आपत्कालीन व्यवस्थापन आणि आगीच्या घटनांवर वेगाने नियंत्रण मिळविण्यासाठी एआय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्याच पद्धतीने ठाणे महापालिकेने एआय प्रणालीचा वापर सुरू करावा. तसेच गावदेवी मंडईमधील आगीनंतर वाढत्या ठाणे शहराच्या दृष्टीकोनातून अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करावे, अशी आग्रही मागणी भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे आज केली. उंच इमारतींची अग्निशमन यंत्रणा कंत्राटदारावर न सोपविता थेट अग्निशमन दलाच्या पथकाने फायर ऑडिट करावे, अशी सूचना करतानाच, मुंबईच्या धर्तीवर ठाणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात ३४ मजल्यांची शिडी, अग्निशमन दलात ६६९ रिक्त पदांच्या भरतीची वेगाने प्रक्रिया, लोकसंख्येच्या तुलनेनुसार वाढीव अग्निशमन केंद्रे, १२५ प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा सेवेत समावेश आदी मागण्या नम्रता कोळी यांनी केल्या.
ठाणेकरांना अग्निशमन सुविधा पुरविण्यात नापास ठरलो, अशी भावना व्यक्त करीत नगरसेविका नम्रता कोळी यांनी ठाणे अग्निशमन दलाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. तसेच २८ लाख ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.
ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाड्यासह सरकारी कार्यालये असतानाही जवाहरबाग केंद्र बंद करुन ती जागा अतिक्रमण विभागाला बेजबाबदारपणाचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी वेळीच अग्निशमन बंब तैनात केले असते, तर सॅटीस पुलावरील शिवशाही बसची आग व गावदेवी मंडईच्या आगीवर वेळीच नियंत्रण आले असते. मात्र, आगीच्या दोन घटनांमध्ये दोन बळी गेल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दोन बंब ठेवण्याचा निर्णय झाला, अशी खंत नम्रता कोळी यांनी व्यक्त केली. ठाणे शहराच्या विविध भागात पाण्यासाठी हायडंट्र बसविण्याची सूचनाही त्यांनी केली.
अग्निशमन दलातील आधुनिकीकरणासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून अधिकारी व जवानांना प्रशिक्षण द्यावे, महत्वाची संकुले व सरकारी आस्थापनांमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणांची दर सहा महिन्याने तपासणी व्हायला हवी, अशी मागणीही नम्रता कोळी यांनी केली.
