– रेल्वे पोलिसांची अनोखी जनजागृती मोहीम
आरती परब
दिवा: रेल्वे प्रवासादरम्यान जीव धोक्यात घालून रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना सावध करण्यासाठी दिवा स्थानकात रेल्वे पोलिसांनी अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेत ‘यमराज’च्या वेशातील पोलिसाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेत सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला. ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे पोलीस (GRP), दिवा रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली.
दिवा स्थानकात अनेक प्रवासी रुळावर उतरून फलाटाच्या दुसऱ्या बाजूने गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारामुळे अनेकदा गंभीर अपघात होऊन जीवितहानीच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी जनजागृतीचा अनोखा मार्ग अवलंबला.
सकाळी १० ते ११ या गर्दीच्या वेळेत स्थानक परिसरात ‘यमराज’च्या माध्यमातून प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडण्याचे धोके समजावून सांगण्यात आले. रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना तेथेच थांबवून समुपदेशन करण्यात आले. तसेच जीवन अमूल्य असल्याचा संदेश देत त्यांना गुलाबाचे फूल देण्यात आले.
या अनोख्या उपक्रमामुळे दिवा स्थानकातील प्रवाशांचे लक्ष वेधले गेले असून अनेकांनी पोलिसांच्या या प्रयत्नाचे स्वागत करून कौतुक केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने म्हणाल्या, “रेल्वे रूळ ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. तुमच्या मागे तुमचा परिवार घरी वाट पाहत असतो. सुरक्षित प्रवास करा आणि नियमांचे पालन करा.” रेल्वे अपघात रोखण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा जनजागृती मोहिमा प्रभावी ठरत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.
