ठाणे : दरवर्षी प्रमाणे या वर्षी येत्या रविवारी २१ जूनला समता विचार प्रसारक संस्थेचा एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रम ठाण्यात स्टेशन रोड येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात सकाळी १० वाजता संपन्न होत आहे. या वेळी ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या उप आयुक्त डॉ. मिताली संचेती, जनरल एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष शैलेश साळवी आणि स्टारलाईट एड इंडिया चे रिजनल हेड व संस्थेचे माजी एकलव्य विद्यार्थी पंकज गुरव हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेच्या संस्थापक आणि विश्वस्त लतिका सुप्रभा मोतीराम असतील. या कार्यक्रमाच्या संयोजक संस्थेच्या विश्वस्त मनीषा जोशी आहेत.
ठाणे महानगर पालिकेच्या आणि अन्य शाळेत शिकत, घरातील आर्थिक चणचणीचा आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दहावी पास करणाऱ्यांचे यश हे एकलव्याच्या साधने सारखेच आहे असे मानून या एकलव्यांचा सन्मान संस्थेतर्फे दर वर्षी केला जातो. हे एकलव्य गौरव पुरस्काराचे ३५ वे वर्ष आहे. यंदा ११६ मुलांचा सन्मान प्रशस्ती पत्र आणि बक्षीस देऊन होणार आहे. तसेच, या सर्व एकलव्यांना बक्षीस म्हणून संस्थेतर्फे या वर्षी २५ ते २८ जून या काळात घेण्यात येणाऱ्या ‘समता संस्कार शिबिरात’ विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. सहृदय आणि संवेदनशील ठाणेकरांनी नेहमीप्रमाणे या वर्षीही या कार्यक्रमाला आवर्जून यावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर (९९२०१८११०५) यांच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *