शिवसेना शिंदे व ठाकरे गट आक्रमक
कल्याण : कल्याणमध्ये कचरा वेचून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड आणि माया कांबळे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. महेश गायकवाड म्हणाले, “ही घटना कल्याण-डोंबिवलीसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला आम्ही सर्वतोपरी मदत करू.”
दरम्यान, ठाकरे गटाने या घटनेवरून सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे अॅडव्होकेट नीरज कुमार यांनी महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. “कल्याण पूर्व भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. घटना घडल्यानंतर नेते आणि लोकप्रतिनिधी पोलीस ठाण्यात येतात, मात्र महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, “लाडक्या बहिणींच्या नावाने राजकारण केले जाते, पण महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते,” अशी टीकाही त्यांनी केली. या घटनेनंतर कल्याणमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
