विहिंप-बजरंग दलाचे प्रशासनाला निवेदन

कल्याण : टिटवाळ्यातील बल्याणी परिसरातील एका निवासी घरात कथितरित्या विनापरवाना मदरसा सुरू करण्यात आला असून, त्यानंतर त्याच ठिकाणाचा मशिदीप्रमाणे वापर केला जात असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाने राज्य सरकार व प्रशासनाला निवेदन सादर करून निष्पक्ष चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित निवासी इमारतीत धार्मिक उपक्रम सुरू असून तेथे ध्वनीक्षेपक (भोंगा) वापरला जात आहे. आवश्यक शासकीय परवानग्यांशिवाय निवासी घराचा धार्मिक स्थळ म्हणून वापर होत असल्यास तो नियमांचा भंग असल्याचा दावा संघटनेने केला आहे. विहिंप-बजरंग दलाने प्रशासनाकडे संबंधित जागेची मालकी, बांधकाम परवानगी, वापरातील बदल, मदरसा किंवा मशिदीसाठी आवश्यक वैधानिक परवानग्या तसेच ध्वनीक्षेपकाच्या वापरासंदर्भातील परवानग्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अनधिकृत बांधकाम असल्यास तत्काळ तोडक कारवाई करावी आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती नागरिकांसमोर पारदर्शकपणे जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास किंवा अनावश्यक विलंब केल्यास संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

0000000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *