महेंद्रशेठ घरत यांचे अफाट दातृत्व!
उलवे : सध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, मानवी मूल्यांचे जतन करणारी एक अनोखी घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपले वाहनचालक मेहबूब लदाप यांना सव्वा कोटी रुपये किमतीचा, सर्व आधुनिक सुविधा असलेला ‘मयुरेश व्हिला’ हा बंगला अधिकृतपणे नावावर करून दिला आहे. द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बंगल्याचे सोमवारी सोनाली रिअॅलिटीचे डायरेक्टर मयुरेश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि मेहबूब लदाप याच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत आणि त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत, कुणाल घरत उपस्थित होते.
ही घटना श्रमाचा गौरव करणारी आणि संपत्तीचा वापर सामाजिक न्यायासाठी कसा करावा, याचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे. कष्टाचे मूल्य केवळ पैशात न ठरवता त्याला कौटुंबिक भावना देणे ही गोष्ट आजच्या काळात अत्यंत दुर्मीळ मानली जात आहे. पाच वर्षांच्या सेवेमध्ये एका कर्मचाऱ्याला थेट सव्वा कोटी रुपयांचा बंगला भेट देण्यामागे महेंद्रशेठ यांची कोणतीही जात-पात न मानता माणूस म्हणून सर्वांना समान मानण्याची भूमिका दिसून येते. स्वतःला एकच मुलगा असून त्याला राहण्यासाठी एक बंगला पुरेसा आहे, या विचाराने दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांनी धर्म, प्रांत किंवा भाषा असा कोणताही संकुचित विचार मनामध्ये आणला नाही, तर केवळ तिशीतील एका सामान्य तरुणाचे आणि त्याच्या कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. शेलघर येथील त्यांचा ‘सुखकर्ता’ हा बंगला गरजू लोकांसाठी नेहमीच हक्काचे ठिकाण राहिला असून तिथून कोणताही गरजू माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही, हा जनमानसातील विश्वास या घटनेमुळे अधिक दृढ झाला आहे.
या अनपेक्षित भेटीमुळे भारावून गेलेले चालक मेहबूब लदाप यांनी वृत्तप्रतिनिधींशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, २८ एप्रिल २०२१ रोजी गव्हाण येथील शांतादेवी यात्रेच्या दिवशी मी कामाच्या शोधात महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील ‘सुखकर्ता’ बंगल्यावर गेलो होतो. तेथे महेंद्रशेठ यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी चालक म्हणून काम करण्याची मला संधी दिली. गव्हाणच्या शांतादेवी यात्रेचा तो दिवस माझे संपूर्ण जीवन बदलणारा ठरला आणि शांतादेवीच मला प्रसन्न झाली. आपण केवळ साहेबांची गाडी चालवत होतो, पण ते आपल्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत आहेत. मेहबूब लदाप यांनी पुढे सांगितले की, मी कोण आणि कुठल्या गावचा, याचा महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांनी कधीही विचार केला नाही. केवळ पाच वर्षांच्या सेवेमध्ये आपल्या कर्मचाऱ्याला आलिशान बंगला थेट भेट म्हणून देणारी अशी दानशूर व्यक्ती महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांनी हे स्वप्न माझ्यासारख्या तिशीतील तरुणासाठी प्रत्यक्षात आणले आहे. आजचा दिवस माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी मोठा आनंदाचा असून ‘मयुरेश व्हिला’ हा बंगला नावावर करून साहेबांनी एक आदर्श निर्माण केला आहे. जनसेवेचे हे काम असेच सुरू राहण्यासाठी महेंद्रशेठ आणि शुभांगीताई यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना मेहबूब आणि त्यांच्या कुटुंबाने केली आहे.
महेंद्रशेठ घरत यांचे हे काम केवळ याच घटनेपुरते मर्यादित नसून त्यांच्या सामाजिक जीवनाचा तो एक भाग आहे. त्यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून आतापर्यंत सुमारे १५०० लोकांना हक्काच्या घरांसाठी लागणारे साहित्य किंवा थेट आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. अनेक गरजू व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच, त्यांनी अनेक अनाथ आणि गरीब मुले दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक फी, कपडे आणि इतर आवश्यक गरजांचा खर्च स्वतः उचलला आहे. आर्थिक अडचणींमुळे ज्या पालकांना आपल्या मुलांना जास्त शुल्क भरून इंग्रजी माध्यमात शिकवणे शक्य नव्हते, अशा सर्वसामान्यांसाठी त्यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गव्हाण येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना करून शिक्षणाची दारे खुली केली आहेत. याशिवाय त्यांनी आजवर अनेकांना चारचाकी गाड्या आणि महागडे मोबाईल फोन देखील भेट दिले आहेत.
महेंद्रशेठ घरत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची कौटुंबिक मूल्ये आणि लिंगसमानतेविषयीची स्पष्ट भूमिका होय. समाजात मुलगा आणि मुलगी समान मानण्याच्या केवळ गप्पा मारल्या जात असताना, त्यांनी आपल्या स्वतःच्या कमाईतील चार हिस्से केले आणि मुलीला, मुलाला आणि शुंभांगीताईंनाही समान वाटा दिला. मुलीचाही समान अधिकार असतो, हे महेंद्रशेठ घरत यांनी कृतीतून सिद्ध केले. नवी मुंबई परिसरामध्ये साडेबारा टक्के जमिनींच्या वाटणीवरून, अनेक कुटुंबात वाद निर्माण होऊन नाती कोर्टकचेऱ्यांत अडकल्याचे त्यांनी जवळून पाहिले होते. अनेक रक्ताची नाती तुटली आहेत. आपल्या कुटुंबात असा प्रसंग येऊ नये म्हणून त्यांनी पत्नी शुभांगी आणि मुलगा कुणाल यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
मालमत्ता किती मूल्याची आहे यापेक्षा ती देण्याची मानसिकता महत्त्वाची असते, हेच त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. यासोबतच, त्यांना मिळालेली सर्व वडिलोपार्जित संपत्तीही भावांना, बहिणींना व्यवस्थित वाटप केली. तसेच त्यांनी आपल्या आईच्या नावाने यमुना सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्ट स्थापन करून समाजसेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे.
संपत्तीपेक्षा कौटुंबिक शांतता, सामाजिक न्याय आणि नैतिक मूल्ये किती श्रेष्ठ असतात, याचा एक नवा पायंडा महेंद्रशेठ घरत यांनी या संपूर्ण कार्यातून घालून दिला आहे. यावेळी एम. जी. ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी मेहबूब लदाप याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
००००००००
