ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसानंतर महापालिकेच्या यंत्रणेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारची संकटे आल्यास महापालिकेने हाताळण्याची परिस्थिती, उद्भवलेल्या अडचणी, त्या दूर करण्यासाठी आलेले अपयश, भविष्यातील उपाययोजना आदींबाबत सविस्तर अभ्यास करण्याबरोबरच पावसाळ्यातील आपत्तीसंदर्भात महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी केली. ठाण्यात आठ दिवसांच्या मुसळधार पावसानंतर झालेल्या हालांच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या पावसामुळे २६ जुलै २००५ रोजीची आठवण झाली, असे त्यांनी नमूद केले.
`अल निनो’मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत महासभेत दिवसभर चर्चा झाली होती. त्यावेळी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र, त्यानंतरही ठाणे शहरात आठ दिवसांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली, याबाबत नगरसेविका नम्रता कोळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी ठाणे शहरात ठराविक ठिकाणांवर पाणी साचत होते. परंतु, नैसर्गिक नाले व वाढत्या बेकायदा बांधकामांमुळे दरवर्षी पाणी साचण्याची नवनवीन ठिकाणे तयार झाली आहेत, याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नम्रता कोळी यांनी केला. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून पूरनियंत्रणासाठी नालेसफाई, साचलेले पाणी उपसण्यासाठी पंप आदी तरतूदी केल्या. मात्र, काही भागात साचलेले पाणीउपसा करणारे पंप पहिल्याच पावसात बंद पडले, याकडे नम्रता कोळी यांनी लक्ष वेधले.
राज्यातील ब वर्गाची श्रीमंत महापालिका म्हणून आपली ओळख आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे. आपल्या शहराचा ६ हजार २२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. पण १ ते ८ जुलैपर्यंत हतबल प्रशासन आणि अगतिक ठाणेकर नागरिक असे चित्र पाहावयास मिळाले, हे दुर्देव आहे, अशी खंत नगरसेविका नम्रता कोळी यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्र. २२ मध्ये १ जुलै रोजी झाडाच्या फांद्या पडल्यानंतर त्या हटविण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे तक्रार केली. सततच्या पाठपुराव्यानंतरही तब्बल १४ दिवसांनंतर गाडी आली. अशीच स्थिती ठाणे शहरात सर्वत्र होती. याबाबत माहिती केल्यावर वृक्ष प्राधिकरण विभागाची १० माणसे व एक गाडी एका विशिष्ट प्रभागात तैनात करण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे यापुढे वृक्ष प्राधिकरण वा आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना जीपीएस ट्रॅकर लावावा, अशी मागणी नम्रता कोळी यांनी केली.
महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे. या ठिकाणी मेडिकल हॉस्पिटल असून, तज्ज्ञ डॉक्टर तैनात केले आहेत. परंतु, सतत गंभीर रुग्ण मुंबईला पाठविले जातात. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. परंतु, कळवा हॉस्पिटलचा कारभार सुधारलेला नाही. त्याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी नम्रता कोळी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *