शहरासह ग्रामीण भागात प्रचार रॅलीला प्रतिसाद

मुरबाड : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी काढलेल्या भव्य रॅलीला मुरबाड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीच्या माध्यमातून मुरबाडवासियांनी महायुतीवर विश्वास दाखवत अलोट गर्दीत रॅलीचे स्वागत केले. या रॅलीमुळे मुरबाडमध्ये महायुतीचा माहौल तयार झाला आहे. अनेक वर्षांपासूनचे कल्याण-मुरबाड रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार असल्याबद्दल ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून मोदी सरकारचे आभार मानले गेले.

महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याबरोबरच भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाड तालुक्यात बुधवारी रॅली काढण्यात आली. तालुक्याच्या सीमेवरून पोटगाव येथून निघालेली रॅली, तीन हात नाका, शिवळे, सरळगाव, टोकावडे, धसई, नारिवली, म्हसा, कान्होळ, सासणे येथे जमलेल्या गर्दीने वातावरण भारून गेले होते. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. या रॅलीत शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार,

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, प्राजक्ता मोहन भावार्थे, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदुराव, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद नार्वेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेंद्र जाधव, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास देसले, मनसेचे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

मुरबाड, टोकावडे, धसईबरोबरच विविध ठिकाणी उमेदवार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोचविली. यापुढील काळात कल्याण-मुरबाड रस्ता आणि कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गामुळे तालुक्याची प्रगती होईल. भविष्यात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे नगरपर्यंत विस्तारीकरण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. पंतप्रधान मोदींकडे केलेली मागणी निश्चितच पूर्ण होते. त्यामुळे नगरपर्यंत रेल्वे धावेल, असे आश्वासन कपिल पाटील यांनी कॉर्नर मीटिंगमध्ये दिले. केंद्र व राज्य सरकारमुळे मुरबाड तालुक्याच्या विकासाची दिशा बदलली असून, गावागावांमध्ये विकासाची नांदी पोचली आहे. मुरबाड तालुक्याने महायुतीवर विश्वास कायम ठेवून भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. या वेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील व कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांचीही भाषणे झाली.

चौकट

माळशेज घाटाच्या पायथ्याशी ‘चाय पे चर्चा’

माळशेज घाटाच्या पायथ्याशी टोकावडे परिसरात प्रचार करताना भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत टोकावडे नाक्याच्या टपरीवर चहा घेतला. तसेच प्रचाराच्या लगबगीतून वेळ काढत सहकारी नेत्यांसमवेत चाय पे चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *